पत्री समर्पण

श्रीराम

अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा।।

कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची।।

म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, २८-२-२५

हृदय मदीय तव सिंहासन होवो

हृदय मदीय तव सिंहासन होवो।।
अभिनवतम रमणीया गुणनिधान
मूर्ति तुझी विलसत राहो।।हृदय....।।।

दंभ दर्प काम क्रोध
बहु करिती विरोध
उपजे न ज्ञानबोध
तिमिर सकल जावो।।हृदय....।।।

भक्तिभाव-गंधाची
सद्विचार-सुमनांची
मंगलमय-गानांची
पूजा तुज पावो।।हृदय....।।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

मजवर कृपा करावी

प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी।। मजवर....।।

भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी ।। मजवर....।।

नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी।। मजवर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

एक किरण

एक किरण मज देई
केवळ एक किरण मज देई।।

कोटी रवि-शशि
तू पेटविशी
विश्वमंदिरी पाही
परि मम हृदयी
तिमिर सदाही
श्रमुनी जीव मम जाई।। एक....।।

किती कृमि-कीटक
रोगोत्पादक
बुजबुजाटा जणू होई
दे सौभाग्या
दे आरोग्या
तम मम विलया नेई।। एक....।।

मी धडपडतो
मी ओरडतो
कोणि न धावो भाई
आस तुझी मम
हरि झडकारि तम
मुळी न सुचे मज काही।। एक....।।

एक किरण ना
मागे फार
एक किरण शुभ
देऊन तार
प्रणति तुझ्या शुभ पायी
तेज:सिंधो!
प्रकाशबिंदु
दे, होईन उतराई।। एक....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

माझी बुडत आज होडी

माझी बुडत आज होडी
मज कर धरून काढी।। माझी....।।

तुफान झाला सागर सारा
मज सभोती वेढी।। माझी....।।

लोटितील मज भीषण लाटा
खचित मृत्यु-तोंडी।। माझी....।।

शांत करी रे तुफान दर्या
काळमुखी न वाढी।। माझी....।।

अपराध तुझे रचिले कोटी
परि धरी न आढी।। माझी....।।

पुनरपि माते राहीन जपूनी
करीन कधी न खोडी।। माझी....।।

रागावली जरी माय मुलावरी
संकटी न सोडी।। माझी....।।

ये करुणाकर ये मुरलीधर
हात धरुनी ओढी।। माझी....।।

किती झाले तरी मूल तुझे मी
प्रेम कधी न तोडी।। माझी....।।

इतर कुणी ते धावान येतील
आस अशी न थोडी।। माझी....।।

बाळ तुझा हा होऊन हतमद 
हाक तुजसि फोडी।। माझी....।।

आजपासुनी तव करि राया
सोपवीन होडी।। माझी....।।

मुरली वाजव सागर शांतव
वादळास मोडी।। माझी....।।

मुरली वाजव, वादळ लाजव
दाव गीतगोडी।। माझी....।।

जीवन तव पदी वाहून बालक
हात तात! जोडी।। माझी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

अति आनंद हृदयी भरला

अति आनंद हृदयी भरला
प्रियकर प्रभु मम हृदयी आला
शोक पळाला
खेद गळाला
पापताप दूरी झाला।।अति....।।

मम तनमनधन
मम हे जीवन
अर्पिन पदकमला।।अति....।।

चिंता सरली
भीती नुरली
त्रास सकळ सरला।।अति....।।

प्रेमरज्जुने
प्रभुला धरणे
जाईन मग कुठला।।अति....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मम जीवन हरिमय होऊ दे!

मम जीवन हरिमय होऊ दे
हरिमय होवो
प्रभुमय होवो
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।

रुसेन हरिशी
हसेन हरिशी
हरिभजनी मज रंगू दे।। मम....।।

गाईन हरिला
ध्याइन हरिला
भवसागर मज लंघू दे।। मम....।।

हरिनामाचा
पावक साचा
अघवन घन मम जळू दे।। मम....।।

हेत हरीचे
बेत हरीचे
सकल कृतींतून दावू दे।। मम....।।

वेड सुखाचे
लागो हरिचे
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३४