नारदाचा वारस

नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

कवी - विंदा करंदीकर

पदवी

जिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर

कवी - विंदा करंदीकर

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

सद्गुरुवाचोनी

करितो आदरे । सद्गुरुस्तवन
ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.
धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन
धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.
धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी
थोर धन्वंतरी । मृत्युंजय.
धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन
ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.
धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता
इतिहासाचा गुंता । सोडवी जो.
धन्य शेक्सपीअर । धन्य कालीदास
धन्य होमर, व्यास । भावद्रष्टे.
फॅरॅडे, मार्कोनी । वॅट, राईट धन्य
धन्य सारे अन्य । स्वयंसिद्ध.
धन्य धन्य सारे । धन्य धन्य मीही!
सामान्यांना काही । अर्थ आहे!
सद्गुरूंच्या पाशी । एक हे मागणे :
भक्तिभाव नेणे । ऐसे होवो.
सद्गुरुंनी द्यावे । दासा एक दान :
दासाचे दासपण । नष्ट होवो.
सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय
तेव्हा जन्म होय । धन्य धन्य.


कवी - विंदा करंदीकर

किलबिललेले उजाडताना

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची


कवी - विंदा करंदीकर

सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर

सांजवेळी सोबतीला

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा...
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा...

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा...

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा...

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा...

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा...

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा...

- इलाही जमादार

तीर्थाटण

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.


कवी - विंदा करंदीकर

देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


कवी - वसंत बापट

या नभाने या भुईला दान द्यावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.

तसेच घुमते शुभ्र कबूतर

मनात माझ्या उंच मनोरे
उंच तयावर कबूतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्‍न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर?
गिरकी घेऊन आपणाभवती
तसेच घुमते शुभ्र कबूतर.


कवी - विंदा करंदीकर

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!


कवी - ना. धों. महानोर

प्रेम करावे असे, परंतू....

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.


कवी - विंदा करंदीकर

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!


कवियत्री - शांता शेळके

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||


कवी - विंदा करंदीकर

विरुपिका

तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये
लघवी केली.

आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे
दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले.


कवी - विंदा करंदीकर

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!


कवी - विंदा करंदीकर

रेबिज

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

सगळ्यात जुना प्राणी

गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू : झेब्रा.

गणपुले सर : असं का बरं?

मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना

देव

संपोजीराव : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.

सायकोलॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?

संपोजीराव : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना अगदी तेव्हापासून.

एक पोट्टी

एक पोट्टी रोज माह्या
सपनामंधी येते
हिचक विचक खाता पेता
उचकी देऊन जाते
थयथय नाचे मनामंधी
मोरनी हाय जशी
येड लावुन जाते
तिचे नखरे बावनमिशी

एक दिवस अशी अचानक
माह्यासमोर आली
पाहुन मले काय सांगु
खुदकन हसुन गेली
म्या म्हनलं काय ती
हिच पोट्टी हाय
कोनबी असुदे यार
पन हिले तोड नाय

सपनामंधली पोट्टी पुन्हा
दिवसा दिसुन जाते
कं दिवसा पाह्यलेली पोट्टी
पुन्हा सपनामंधी येते
काय करु चायला
पुरता लोचा झाला
माह्या मनाच्या डुगडुगीचा
चक्का जाम झाला

एक वाटे सुंदरा मले
एक वाटे अप्सरा
चायला सपनातल्या पोट्टीचं
रुप दिवसा आठवत नाही
तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं
रुप मनी साठवत नाही
डोये खुल्ले तवा माह्या
ध्यानामंधी आलं
दिवसाढवळ्या सपन पाहुन
कोनाचं भलं झालं....

हरकत नाही...

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!


कवी - संदीप खरे

आफ्रिकन आणि पोपट

एक आफ्रिकन निग्रो एका गोंडस पोपटाला आपल्या खांद्यावर बसवून बारमधे घुसला.

'' अरे वा ... ही एवढी मजेदार गोष्ट तू कुठून आणलीस?'' बार टेंडरने विचारले.

'' आफ्रिकेवरुन'' पोपटाने उत्तर दिले.

मग विमान घेऊन ये!

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये!

गर्लफ्रेंड

१० वर्षाचा मुलगा आईला : आई, गर्लफ्रेंड म्हणजे काय ग ?

आई : आता नाही कळणार तुला ,

तू जेव्हा मोठा होऊन चांगलामुलगा बनशील तेव्हा तुला पण १ मिळेल .

मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??

आई : तर मग भरपूर मिळतील

मोबाइल कुणाचा?

चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....
पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे....
.....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे....
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
.....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे....
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग....
.....जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग....... .

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?
पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे?

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !


कवी - केशवकुमार

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले " इलाही" ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

- इलाही जमादार

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.


कवी - विंदा करंदीकर

जगण्यामध्ये ब्रम्हानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - स्वेदगंगा

प्रेम

सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

कवी - विंदा करंदीकर

पेर्ते व्हा

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..


~ आशिष

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

!..प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ...!!१!!
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ....!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!२!!
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!३!!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!