बा. सी. मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर (जन्म-डिसेंबर १, १९०९ मृत्यू- मार्च २०, १९५६) हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. 

त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव रूढ झाले. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले.

बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.

बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत.


मर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.

मर्ढेकर यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार "सौंदर्य आणि साहित्य" साठी प्रदान करण्यात आला.

मर्ढेकरांचे प्रकाशित साहित्य असे : 
कवितासंग्रह −शिशिरागम(१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१) 
कांदबऱ्‍या− रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८) 
नाटक−नटश्रेष्ठ (१९४४) 
संगीतिका−कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७) 
समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्या आणि साहित्य (१९५५). 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा