बाजार

बाजार आज गावचा पहा वाहतो

खिडकीत उभा राहुनी मौज पाहतो

हा गाडयांनी गजबजला गाडीतळ

किति गडबड, गर्दी, गोंगाट नि गोंधळ !

बाजारकर्‍यांची रहदारी ही सुरु---

जाहली, चालती पहा कसे तुरुतुरु !

ध्वनि खुळखुळ घुंगुरमाळांचा मंजुळ

जणु मला वाहतो, करितो मन व्याकुळ

ही शेतकर्‍यांची मुले शिवारातली

घालीत शीळ, मारीत उडया चालली

उगवेल सणाचा दिवस उद्या पाडवा

पैरणी नव्या, पोषाख हवा नवनवा

काकडया लांब, गरगरित गोल टरबुजे

गुळभेली, साखरपेटि, गोड खरबुजे-----

आणिती गाढवे पाठीवर वाहुनी

कशि दुडक्या चाली येती गिरणेहुनी !

जरि सावलीत मी, तहान किति लागली

खायला कलिंगड-खाप लाल चांगली !

मन गेले गेले वार्‍यावर वाहुनी

मज बाजाराला जाऊ द्या हो कुणी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा