अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे !

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे,

करी प्रेमभावे तुम्हा वंदने

तुम्हांला पुन्हा भेटुनी जीव धाला

मनी पौर्णिमेचे पडे चांदणे

मला अर्पिला शुद्ध सौहार्द ठेवा

अहो, धन्य मी भाग्यशाली खरा !

वृथा दूर सोडून गेलो तुम्हांला

करावी क्षमा दीन या पाखरा

तुम्ही लाविला वृक्ष जोपासिला तो,

किती भव्य आता दिसू लागला

इथे अश्रया पातले बाळपक्षी

फुटू लागला गोड त्यांना गळा

अशा भव्य वृक्षी कुणी एक पक्षी

बसे येउनी दूर देशाहुनी

पुरा रंगुनी जाय मेळयामधे या

कला आपली दाखवी गायनी

कुठे देश त्याचा, कुठे दूर कोठे

कुठे राहिले दूर मातापिता !

लळा लाविला, कोडकौतुक केले

सदा राहिला दक्ष त्याच्या हिता

तयाचे इथे अल्प वास्तव्य झाले

मधु स्वप्न गेले क्षणी भंगुनी

पिसारा उभारुन गेला उडूनी,

तया मारिली हाक सांगा कुणी ?

तुम्ही थोर आचार्य बंधूच माझे

अहो, तूमच्या काय वानू गुणा !

तुम्ही गाळिला घाम, उद्योग केला,

मला अर्पिला मात्र मोठेपणा

अहो, छात्र झाला तुम्ही शिक्षकांनो,

शिकाया नवाध्यापनाची कला

तुम्हा आमुच्यापासुनी ध्येय-दीक्षा

मिळाली, किती स्फूर्ति सांगा मला ?

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे,

तुम्ही लीन शालीन साधेसुधे

जरीला मऊ शुभ्र कापूस तैसा

ऋजू भाव शोभे स्वभावामधे

जणू साखरी मेहरुणीच बोरे

अशी माधुरी भाषणी आर्जवी !

मनाचे तुम्ही मोकळे, संपदा ही

गुणांची, कुबेरासही लाजवी

तुम्ही सर्व पाटील द्यायास आला

’मराठा समाजास’ संजीवनी

जयांनी जुना हाकिला गावगाडा

असे गावचे थोर राजे गुणी !

समाजा, तुझे संपले दैन्य आता

धुरा वाहती सूज्ञ पाटील की

नवा काळ येणार, व्हा शक्तिशाली

नवी चालवायास पाटीलकी

जये स्थापिले हिंदवी राष्ट्र शौर्य

महाराष्ट्रधर्मा जये प्रेरिले

जिजाबाइचा पुत्र तान्हा शिवाजी

तयाचे अम्ही सौंगडी मावळे

महाराष्ट्र त्याचा सुविख्यात, आहो

मराठे अम्ही राज्यकर्ते खरे

नव्या भाग्यकाळामधे भारताच्या

पुढे चालवू आपुले मोहरे

जिथे जन्म झाला शिवाजीप्रभूचा

शिवनेरिच्या त्या शिवारातला

कवि स्फूर्तिने गात राहे पवाडा

करुनी गळा मोकळा आपला !

फुटे तांबडे भारताच्या क्षितीजी

उठा, स्वागताची तयारी करा

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे,

प्रणामांस माझ्या तुम्ही स्वीकरा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा