गुरुवर्य बाबूरावजी जगताप यांस अभिवादन

प्रांजळ भावे तुमच्या चरणी अर्पित हे अरविंद,

करितो मी सानंद तुम्हांला अभिवादन ’जयहिंद !’

खडकावरती करुनि मशागत तुम्ही फुलविला बाग

अपूर्व तुमची सेवा, गुरुजी अपूर्व स्वार्थत्याग

तुम्ही उधळिली चैतन्याची किरणे, जाती दूर

आणि उजळिला शिवरायाचा महाराष्ट्र महशूर

पवित्र तुमच्या तपे निर्मिले हे शिक्षणमंदीर

शिवरायाचे नाव ठेवुनी तुम्ही राखिले ब्रीद

वसिष्ठ-सांदीपनीसारखे ’शिक्षक’ आपण थोर

कितीक छोटे तुम्ही शिकविले राघव, नंदकिशोर

तेजस्वी शुक्रासम तुमचे प्रसन्ना जीवन गोड

सुगंध देते अखंड झिजुनी जीवन-चंदन-खोड

शिक्षण-क्षेत्री आघाडीवर सज्ज सदा राहून

समाज जागृत करण्या झटला उदंड कष्ट करुन

पूर्ण साठ पानांचा लिहिला ग्रंथ तुम्ही यशवंत

शतपत्रांचे सुवर्ण-लेखन पूर्ण करो भगवंत

फिटेल न कधी ऋण तुमचे जरि लक्ष अर्पिले होन

करुन घ्यावा गोड आमुचा हा बोरांचा द्रोण !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा