दूर दूर कोठे दूर

दूर दूर कोठे दूर

मंजुळ मंजुळ चाले सूर

नकळे का ये भरुन ऊर

नयनी चाले अश्रूपूर !

निळ्या क्षितिजी टेकडया निळ्या

कोणत्या स्वप्नी पेंगती खुळ्या

त्याच सुरांनी भारल्या गेल्या

भानावर ना अजून आल्या

गूढ गूढ भारी गूढ

बावरले मन, झाले मूढ

कोण करी तर हे गारुड !

कुण्या जन्मिचा उगवी सूड !

अज्ञात कोणी अद्‌भुत कोणी

वाजवी पावा जादूची राणी

निळ्या क्षितिजी रांगती छाया

त्याच सुरांनी भारल्या गेल्या

भूल भूल अवघी भूल

न कळे कोणाची चाहूल !

त्याच दिशेला हे पाऊल

चालू लागे हलकेफूल !

अंधार मागे अंधार पुढे

चाललो आहो आम्ही बापुडे

भेटो न भेटो जादूची राणी

ऐकत चालू अद्‌भुत गाणी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा