विचारतरंग

नीलप्रभ निर्मल गगनी विशुद्ध वाहे सुरतटिनी

पारावारि समवटुनी रमती विबुधरमणरमणी.

चंद्र सुधामय पुष्करिणी गगनाला शोभा आणी

दीप्तींची लेवुनि दुकुले तारांगण तेथे जमले.

क्षुब्धार्णव जल मग्नाला दाखविती हे मार्गाला

भोगाचा कर्तव्याचा मेळ मनोहर हा साचा !

वाटे, तारा होवोनी विचारावे अवघ्या भुवनी

धरणीच्या ह्रदयावरती ठेउनि कर हसवावी ती !

विहंगमोत्तम की व्हावे आकाशी वरवर जावे !

नूतन नूतन प्राम्ताते आक्रमुनी जावे वरते.

उदयगिरीच्या पलीकडे बालरवीचा किरण पडे

प्रथम करुनि त्याला प्रणती शुभवार्ता कळवू जगती-

"घोर निशा संपुन गेली ! मंगल वेळ जवळ आली !

खंत सोडुनी कामाला लागा, रवि उदया आला

हताश जे झाले स्वजन चैतन्याचे संचरण

करणे त्यांच्या देहात भाग्य हे थोड्यांना प्राप्त !

सोप्या सोप्या शब्दांनी, स्फुर्तिसूत्राने गुंफोनी,

मंजुळ मंजुळशी गाणी रचुनी रसिकान्तःकरणी

हळू शिरावे चोरोनी जावे मीपण लोपोनी,

हौस मनी ही असे परी टीका तीते विफल करी !

अंतःकरणपटावर ती आत्यंतिक वेगे उठती

दिव्य लेख उन्मेषाचे धरावया ते स्मृति काचे.

बुद्धीच्या भिंगावरती बिंबित ज्या प्रतिमा होती

शब्दचित्र त्यांचे कसले नकळे काढिल मन दुबळे

सरस्वती कंठा भरण वाचुनि हे वरचे कवन

गद्गद वदला हासोन धन्य कवी ! कविता धन्य

शब्दचमत्कृति यात नसे, गांभीर्याचा लेश नसे,

सत्याचाही गंध नसे हनुमंताचे पुच्छ जसे !"

वानर होता नर झाला ग्रहण लागले ग्रहगोला

धूमकेतु गगनि आला विषय असे घ्या कवनाला.

सिद्धान्त घेउनि शास्त्रांचे करा कथन त्या सत्यांचे

पुरे पुरे कल्पना पुरे काळ मागला आज सरे.

थांबा थांबा रसिकवरा ! गदारोळ हा पुरे करा !

प्राण कल्पना काव्याला न कळे हे मतिमंदाला

एक न धड भाराभर ती चिंध्यांची खोगिरभरती

तुटपुंज्या ज्ञाने फुगती रसज्ञ अपणाला म्हणती.

पंडितपन ते रसिकपण बहुधा असती ही भिन्न

दोहोंचा अन्वय एकी सांप्रत दुर्मिळ ह्या लोकी !

महाराष्ट्र कवि परंपरा खंड न पडला तिला जरा

उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी.

भौतिक शास्त्री या काव्यी कल्पनाच वैभव मिरवी

अभेद मज दोहोत दिसे कोण शहाणे, कोण पिसे ?

जे जे विश्वी ज्ञेय असे त्यात कल्पना मात्र वसे

करा कल्पना वजा बरे म्हणजे बाकी शून्य उरे

संगम ह्रदयंगम साचा मृणाल अलि या युगुलाचा

अथवा सज्जन रसिकाचा सहजमनोहर कवितेचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा