माझा देव

‘जग हे मंगल
म्हणे मदंतर
‘देव तो दयाळ
म्हणे मदंतर
येताच निराशा
चित्त हे अशांत
जरा येता चिंता
अशांत मानस
‘लहरी हा देव
जीवन भेसूर’
‘जग हे वाईट
असे म्हणे मनी
श्रद्धा जी ठेविली
क्षणात ती जात
निराशेत आहे
निराशा ही लोटी

जग हे सुंदर’
आशेमाजी
देव परमोदार’
आशेमाजी
जरा जीवनात
परी होई
जरा होता त्रास
माझे होई
कठोर निष्ठुर
म्हणू लागे
अमांगल्य-खनी’
संतापोनी
होती अंतरात
मरोनिया
सदगुण-कसोटी
दुर्मार्गात

श्रद्धेचा चंद्रमा
हृदयाकाशात
दु:ख-संकटात
गोड जो हासत
ईश्वराची कृपा
जीवन पवित्र
सदा श्रद्धावंत
सदा सेवारत
मंगलाच्यावर
सुखाची हा सृष्टी
अवघाची संसार
मनी हे ठेवून
तोची माझा देव
हृदयायी ठेवीन

निराशानिशेत
शोभे ज्याच्या
घोर विपत्तीत
तोची धन्य
पाही जो सर्वत्र
त्याचे धन्य
सदा आशावंत
धन्य तोची
सदा ठेवी दृष्टी
करु पाहे
सुखाचा करीन
झटे सदा
त्याला मी पूजीन
भक्तिप्रेमे


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३४

प्रभु मम हृदयि आज येणार!

प्रभु मम हृदयि आज येणार!
मम जीवन-मरुभूमीत अता शत पाझर फुटणार
परम शांतिचे परम सुखाचे अमित मळे पिकणार।। प्रभु....।।

मुक्या बिचा-या जीवपिकाला कंठ आज फुटणार
हृदयमंदिरी नवगीतांचा मधुरध्वनि उठणार।। प्रभु....।।

प्रभु- करुणेचा वसंतवारा जीवनवनि सुटणार
वठलेल्या मत्सदवृत्तींना नव अंकुर फुटणार।। प्रभु....।।

मालिन्याची कार्पण्याची मग वस्त्रे गळणार
पोषाख मला नवतेजाचा नवरंगी मिळणार।। प्रभु....।।

भ्रम मम जातिल संशय शंका आज सकल फिटणार
शतजन्मांची चिरचिर माझी कायमची मिटणार।। प्रभु....।।

सकल बंधने आज तटातट तुटुन धुळित पडणार
मन्नयनांतुन भावभक्तिची गंगा घळघळणार।। प्रभु....।।

म्लान असा मद्वदनचंद्रमा सकल आज खुलणार
सुकलेले मम बागबगीचे सहज सरस फुलणार।। प्रभु....।।

कुविचारांचे धुके सकल ते आज उडुन जाणार
हृदयमंदिरी चित्सूर्य अता चिर मंगल जळणार।। प्रभु....।।

जीवात्माचे शतजन्माचे ग्रहण आज सुटणार
चिदंबरी मज उंच उडाया पंख दिव्य फुटणार।। प्रभु....।।

दैन्य दुराशा निराशा सकल आज हटणार
अभिनव- मंगल- मधुर- मनोहर तेजे मी नटणार।। प्रभु....।।

अमित युगांची येरझार मम आज सकल खुटणार
परमैक्याच्या परमानंदा अगणित मी लुटणार।। प्रभु....।।

परमैक्याच्या झोल्यावरती प्रभुसह मी झुलणार
प्रेमसमाधी लागुन माझी परममुदे डुलणार।। प्रभु....।।

शब्द अंबरी तडित अंबुदी प्रभा रवित शिरणार
तरंग अंभोधीत तसा मज्जीव शिवी मिळणार।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

फुलाची आत्मकथा

फुलापरी या जगात सुंदर एक हासरे मुल
दुसरे सज्जनमन कोमल
फुलापरी साजिरे गोजिरे तिसरे तारक वरी
चौथे स्मित सतिवदनावरी
इतुकी पवित्रता कोठली
इतुकी सुंदरता कोठली
इतुकी परिमलता कोठली
निष्पाप अशी फुले शोभती पवित्र आत्म्यापरी
पसरिति मोद धरित्रीवरी।।

फुला पाहुनी सदैव माझे जळते पापी मन
भरती पाण्याने लोचन
स्पर्श कराया धैर्य नसे मज थरथरती मत्कर
लज्जित मेल्यापरि अंतर
माझा स्पर्श विषारी असे
माझी दृष्टी विषारी असे
लावू हात फुलाला कसे
मलिन होउनी जाइल जळुनी हात लागला तरी
ऐसे वाटे मज अंतरी।।

एके दिवशी प्रात:काळी माझ्या मार्गावर
फुलले होते सुम सुंदर
दंवबिंदूंनी न्हाले होते मधुर गंध दरवळे
रविने शतकिरणी चुंबिले
माझी दृष्टि तयावर बसे
वाटे पुढे न जावे असे
पाहुन मज सुम जणु ते हसे
गंगायमुना मन्नयनांतुन आल्या गालांवरी
लज्जा भरली माझ्या उरी।।

फुला पाहुनी मदीय हृदयी विचार शत उसळती
थरथर मदगात्रे कापती
मज्जीवन मज दिसे दिसे ते फूलहि दृष्टीपुढे
भेसुर विरोध आणी रडे
मत्कर सुमना मी जोडिले
खाली निज शिर मी नमविले
भक्तिप्रेमे मग विनविले
‘सुंदर सुमना! सखा, सदगुरु, परब्रह्म तू मम
माझा दूर करी हृत्तम।।

तुला कशाने अशी लाभली सुंदर जीवनकळा
सांगे मजला तू निर्मळा
लहानशा या तुझ्या जीवनी इतुकी निर्दोषता
आली कोठुन वद तत्त्वता
आचरलासी तप कोणते
केले अखंड जप कोणते
सांग स्वकीय जीवनकथे
त्वदीय जीवनरहस्य मजला कळेल बापा जरी
जाइन मीहि तरोनी तरी’।।

बहुत दिसांनी मूल आइला पाडस वा गायिला
भेटे, तैसे होइ फुला
पुलकित झाले, डोलु लागले, प्रेमे वदले मला
“ये ये जवळी माझ्या मुला!
माझा हृदयसिंधु हा अता
करितो तुझ्यापुढे मी रिता
परिसावी मज्जीवन-कथा”
तद्वच ऐकुन कर जोडुन मी स्थिर झालो अंतरी
बोले सुमन बानरीपरी।।

“होतो प्रभुच्या पायांपाशी सदैव मी अंबरी
त्याची कृपा सदा मजवरी
सूर्याच्या सोनेरी करावर बसुनी एके दिनी
आलो प्रभुपद मी सोडुनी
पृथ्वी पाहू आहे कशी
ऐसा मोह धरुन मानसी
सोडुनी आलो मी स्वामिसी
झरझर सरसर नाचत नाचत रविकिरणांचेवरी
उतरु लागे धरणीवरी।।

खाली खाली जो जो बाळा! येऊ लागलो
तो तो अंध होउ लागलो
विकास गेला, सुगंध सरला, सुंदरता संपली
शंपाहपशी तनु कंपली
तारा अस्मानातुन तुटे
त्याचे तेज उरते का कुठे?
माझा धीर सकळही सुटे
दयासुंदरा वसुंधरेने निजकर केले वरी
झेलुन ठेवी पर्णांतरी।।

अंध जाहलो, बंधी पडलो, अंधार सभोवती
न कळे काय असे मदगती
हाय! हाय! मज मोह कशाला शिवला बोलुन असे
रात्रंदिन मी किति रडतसे
बोले मनात तुज कुणितरी,
‘आता रडुन काय रे परी
तप तू थोर अता आचरी
प्रभुचरणच्युत फुला! विकसास्तव तप तू आदरी
त्याविण गति ना या भूवरी’।।

अश्रु पुसुन मग गंभीर असा निश्चय केला मनी
झालो ध्यानस्थ जसा मुनी
दिव्य असे प्रभुचरण अंतरी दृष्टिपुढे आणुन
गेलो ध्यानमग्न होउन
सगळी बाह्य सृष्टी विसरत
केवळ चिंतनात रंगत
जणु मी प्रभुसिंधुत डुंबत
अशा प्रकारे मुला! तपस्यासमारंभ मी करी
करुनी रडगाणे निज दुरी।।

कधी कधी गज किरणी भास्कर भाजुन तो काढित
कधि ती थंडी गारठवित
मारुन मारुन गाल कोवळे लाल करित मारत
पाउस कधि भिजवुन रडवित
दु:खे हीची हासवतिल
रविकर हेची रंगवतिल
वारे हेची डोलवतिल
प्रभुप्रसादे थबथबलेले दु:ख दु:ख ते वरी
धरिला धीर असा अंतरी।।

जशी तपस्या वाढु लागली विकासही वाढला
तप सद्विकासजननी, मुला!
मंद मधुरसा गंध मदंगी लागे रे यावया
लागे लावण्य फुलावया
वारे देती कधि बातमी
‘सतत बसशिल न असा तमी
वेळ तुझा तू मोदे क्रमी’
तिकडे माझे लक्षच नव्हते, ध्यास एक अंतरी
होवो स्वीय तपस्या पुरी।।
किति दिन रात्री ऐशा नेल्या ध्यानरसी रंगुन
मजला काळाचे भान न
तपस्या करी, आपोआप प्रकटेल विकास तो;
फसतो जो ना विश्वासतो
श्रद्धा अमर असावी मनी
आशा अमर असावी मनी
श्रद्धा जीवन- संजीवनी
श्रद्धा, बाळा! जिवा नाचवी चमत्कारसागरी
देई मौक्तिक अंती करी।।

घाली प्रिय भूमाय सदोदित माझ्या वदनी रस
मज मत्तपस्येत सौरस
सुंदर मज निज पर्णांचा ती आश्रम दे बांधुन
गेलो ध्यानी मी रंगुन
माझी तहानभूकच हरे
माझे भानच मजला नुरे
चिंतन एक मात्र ते उरे
सौंदर्याच्या महान सागरी तन्मय झालो जणू
माझा अहं न उरला अणु।।

सुगंध मग तो भरुन राहिला सा-या मज्जीवनी
पाहे प्रकटायालागुनी
सुंदरता रंगली अंतरी आत कळा लागती
प्रभुची सृष्टि पहायाप्रति
तरि मी आवरीत मानसा
उल्लू होउन जाइन कसा
होता प्रभुवर मम भरवंसा
अधीर होता कार्य बिघडते, अधीर होणे अंध
न कधी अधीर होई बघ।।

अधीर होउन अंडे फोडी विनता, मग पांगळा
लाभे अरुण तिला तो लुळा
सहस्त्र वर्षे वाट बघोमी दुसरे फोडी मग
प्रकटे गरुत्मान् सदा बघ
कर्मी रंगावे माणसे
फळ ते चिंतु नये मानसे
लाभेल परी भरले रसे
कष्ट संकटे सोसुन सतत सेवाकर्मी रमा
येइल चरण चुराया रमा।।

बाळ घालितो रुजत बी, बघे उकरुनिया सत्वर
येइल कैसा वरि अंकुर?
जरा जाहली नाही तुमची थोडी जी चळवळ
तोची मूर्ख विचारिति फळ
घालित जावे बीजा जळ
सेवेमध्ये न पडो खळ
सुंदर डोलेल वरी फळ
अधीर म्हणुनी मी ना झालो फुलविल परमेश्वर
होते सश्रद्ध मदंतर।।

रविकर आता प्रेमे स्नेहे मजलागी चुंबिती
वारे प्रदक्षिणा घालिती
अधीर जणु मज बघावयाला झाल्या दिशा
सरली जणु मज्जीवन-निशा
तरिही शांत राहिलो मनी
अधिकचि तपस्येत रंगुनी
बाळा! तपचि सुखाची खनी
तरस्येतची आनंद खरा तत्त्व धरावे उरी
फळ ते वांछु नये लौकरी।।

एके दिवशी सायंकाळी किरण वदति कोमळ
‘उदयिक विकास तव होइल’
ऐसे सांगुन, मोदे चुंबुन, गेले निघुनी कर
उत्सुक पवन करी भिरभिर
हळुहळु उषा जवळ येतसे
माझी पाकळी ती खुलतसे
दुसरी फुलते, तिसरी हसे
निशा संपली, अमृतत्वाची उषा झळकली वरी
अमृतसिंचन मजवर करी।।

उषा देविने मला चुंबिले धरणीमांडीवरी
भास्कर माझे जातक करी
आनंदाने कृतज्ञतेने मुके मदीयांतर
विश्वी देखे विश्वंभर
करुणा सकळ तयाची असे
प्रभु मदरुपे दावि जगा निज पवित्रता माधुरी
माझा हक्क नसे त्यावरी।।

सुगंध माझा सुंदरता मम त्याची ही देणगी
म्हणुनी ठेवित उघडी जगी
मला कशाला संचय- मति ती? माझे काहिच नसे
प्रभुचे प्रभुस समर्पीतसे
माझे लुटोत सारे धन
हेची वांछी माझे मन
त्यागे परमेश्वर पूजिन
सेवा करुनी सुकुनी जाइन, जाइन प्रभुच्या पदी
मग ती पतनभीति ना कधी।।

अशी मुला ही ऐकिलीस का माझी जीवनकथा
रुचेल तरि आदर मत्पथा
कल्याण तुझे होवो बाळा! अश्रु आपुले पुस
बेटा रडत असा ना बस
करि तू मुका पाहुन श्रम
साहुन दु:खे संकट तम
न शिवो मना निराशा भ्रम
पुरी तपस्या होता ठेवी प्रभु फळ हातावरी
न कधी अधीर हो अंतरी”।।

पवित्र सुमना नमना करुनी, सदगद साश्रू असा
होतो कापत मी वेलसा
सतेज सुंदर गंभीर मंगल विमल भावनाबुधि
हेलावे मम हृदयामधी
‘ही मम शेवटची आसवे
आता रमेन कर्मासवे
लागे विवाह श्रद्धेसवे
कर्म करावे सदा तपावे’ निश्चय धरिला उरी
‘आहे जगदंबा मग वरी’।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३०

मयसभा राहिली भरुन

मम दृष्टीला भेसुर दिसते भुवन
मयसभा राहिली भरुन।।

जे दिसते असे रुप वस्तुचे वरुन
जे आत न येते दिसुन
मम डोळे हे निशिदिन जाती फसुन
त्यामुळे जात मी खचुन
जे वाटतसे जाउ उराशी लावू
ते बघ प्राण मम घेऊ
दंभ हा जगाचा धर्म
उलटेच जगाचे कर्म
मग मिळेल केवी शर्म
मन्मन होई खिन्न वर्म हे बघुन
मयसभा राहिली भरुन।।

मज ओलावा वरुन मनोहर दिसला
जाताच जीव परि फसला
मद्दग्ध जणु प्राण तिथे मी नेले
येईल टवटवी गमले
मज्जीवन जे म्लान फुलापरि होते
ते तेथे नेले होते
तो आग अधिकची उठली
जीवाची तगमग झाली
वंचना रक्तांची कळली
जे आर्द्र दिसे, टाकि तेच करपवुन
मयसभा राहिली भरुन।।

कुणी मज दिसला दिव्यज्ञानांभोधी
वाटले करिल निर्मळ धी
मज मोक्षाचा दाविल वाटे पंथ
वाटले हरिल हा खंत
नव चक्षु मला देइल हा गुरु गमले
जाऊन चरण मी धरिले
तो गुलामगिरिगुरु ठरला
मज अंधचि करिता झाला
अघपंथ दाविता झाला
मम आशेचे अंकुर गेले जळुन
मयसभा राहिली भरुन।।

जे सुधारले ऐसे वाटत होते
जे भाग्यगिरिवर रमते
जे निजतेजे दिपवित होते डोळे
अभिनव नवसंस्कृतिवाले
जे कैवारी स्वातंत्र्याचे दिसती
जे समत्वगीते गाती
परि जवळ तयांच्या गेलो
तो दचकुन मागे सरलो
वृक व्याघ्र बरे मी वदलो
ते करिति सदा समतादींचा खून
मयसभा राहिली भरुन।।

ते शांतीची सूक्ते गाती ओठी
परि काळकूट ते पोटी
ते एकिकडे तोफा ओतित नविन
परि वरुन शांतीचे गान
ते एकिकडे दास्यी दुनिया नेती
स्वातंत्र्यभक्त म्हणवीती
चराचरा चिरुन इतरगळे
ते स्वतंत्रतेचे पुतळे
उभविती कसे मज न कळे
हा दंभ कसा प्रभुवर करितो सहन
मयसभा राहिली भरुन।।

जे पावन, ते जगती ठरती पतित
परि पतित, पूतसे गणित
यत्स्पर्शाने श्रीशिव होइल पूत
अस्पृश्य ते जगी ठरत
जे आलस्ये दंभे दर्पे भरले
ते स्पृश्य पूज्य परि झाले
दुनियेचा उलटा गाडा
जे सत्य म्हणति ते गाडा
जे थोर म्हणति ते पाडा
हे दंभाला पूजिति धर्मच म्हणुन
मयसभा राहिली भरुन।।

मज दीप गमे आहे तेथे भव्य
दावील पंथ मज दिव्य
त्या दीपाचा पंथ सरळ लक्षून
चाललो धीट होऊन
मज दीप अता दिसेल सुंदर छान
पडतील पदे ना चुकुन
परि तिथे भयद अंधार
ना अंत नसे तो पार
ना पंथ नसे आधार
या अंधारा भजति दीप मानून
मयसभा राहिली भरुन।।

मृदू शीतलसे सुंदर दिसले हार
सर्प ते प्राण घेणार
किति सुंदरशी सुखसरिता ती दिसत
परि आत भोवरे भ्रमत
जे अमृत मला जीवनदायी दिसले
ते गरल मृतिप्रद ठरले
मृगजळे सकळ संसारी
होतसे निराशा भारी
ही किमर्थ धडपड सारी
ते कांचन ना कांत दिसे जे वरुन
मयसभा राहिली भरुन।।

जे जगताला जीवन अंबुद देती
त्यामाजी विजा लखलखती
या जगति जणू जीवनगर्भी मरण
परि देइ जीवनामरण
ज्या मखमाली त्यातच कंटक रुतती
परी कंटक कोमल फुलती
हे कसे सकल निवडावे
परमहंस केवी व्हावे
जलरहित पय कसे प्यावे
हे कोण मला देइल समजावून
मयसभा राहिली भरुन।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, फेब्रुवारी १९३३

खरा धर्म

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे। जगाला....।।

जयांना कोणी ना जगती
सदा जे अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे। जगाला....।।

समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे। जगाला....।।

सदा जे आर्त अति विकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे। जगाला....।।

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला....।।

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला....।।

जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे। जगाला....।।

असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे। जगाला....।।

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे। जगाला....।।

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थ प्राणही द्यावे। जगाला....।।

जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा!
तयाने प्रेममय व्हावे। जगाला....।।

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

कशासाठी जगावे?

असे का जीवनी अर्थ?
असे रे, जो जगी चिंता
असे, जो आपदा व्याधी
असे, जो दुर्दशाभूता।।

असे, जो गोरगरिबांच्या
न गेले ज्ञान झोपडीत
असे, जो गोरगरिबांची
मुले थंडीत कुडकुडत।।

असे, अज्ञान जो जगती
असे, जो अश्रु या जगती
असे, जो बंधु लाखो हे
उपाशी नित्य रे मरती।।

असे, जो त्रास मत्तांचा
असे, जो राजकी जुलुम
असे, जो दीन दुबळ्यांचा
जगी उच्छेद रे परम।।

असे, जो दु:ख या जगती
असे, जो खिन्नसे वदन
समीप प्रीतिने जाता
हसे जे जेवि ते सुमन।।

असे, जो जाणण्या काही
असे, जो कार्य करण्याला
असे, स्वातंत्र जो जगती
कृतीला आणि रे मतिला।।

असे, जो दुष्ट त्या रुढी
असे, जो जाच धर्माचा
असे, जो घाण सर्वत्र
असे, जो सूर शोकाचा।।

असा हा जीवनी अर्थ
असा हा जीवनी हेतू
विपददु:खाब्धि- तरणाला
जगाला होइ तू सेतू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२७

जीवनातील दिव्यता

आयुष्याच्या पथावर। सुखा न तोटा खरोखर
दृष्टी असावी मात्र भली। तरिच सापडे सुखस्थली
सुंदर दृष्टी ती ज्याला। जिकडे तिकडे सुख त्याला
आशा ज्याच्या मनामध्ये। श्रद्धाही मंगल नांदे
सदैव सुंदरता त्याला। फुलेच दिसतील दृष्टीला

प्रचंड वादळ उठे जरी। गगन भरे जरि मेघभरी
तरी न आशा त्यागावी। दृष्टी वर निज लावावी
वारं शमतिल, घन वितळे। नभ मग डोकावेल निळे
निशेविना ना येत उषा। असो भरंवसा हा खासा
दयासागर प्रभुराजा। सकलहि जीवांच्या काजा
आयुष्याच्या पथावरी। रत्नांची राशी पसरी
दृष्टी असावी परि विमला। फुलेच दिसतील दृष्टीला

माणिकमोती अमोलिक। होती आपण परि विमुख
संसाराच्या पथावरी। माणिकमोती प्रभु विखरी
मुलावरिल ते प्रेम किती। मातेचे त्या नसे मिती
मायलेकरांचे प्रेम। बहीणभावांचे प्रेम
मित्रामित्रांचे प्रेम। पतिपत्नीचे ते प्रेमे
गुरुशिष्यांचे ते प्रेम। स्वामिसेवकांचे प्रेम
माणिकमोती हीच खरी। डोळे उघडुन पहा तरी

तृषार्तास जरि दिले जल। शीतल पेलाभर विमल
क्षुधार्तास जरि दिला कण। हृदयी प्रेमे विरघळून
ज्ञान असे आपणाजवळ। दिले कुणा जरि ते सढळ
कृतज्ञता त्या सकळांचे। वदनी सुंदर किति नाचे
कृतज्ञतेचे वच वदती। तेच खरे माणिकमोती

कृतज्ञतेसम सुंदरसे। जगात दुसरे काहि नसे
रत्ने अशि ही अमोलिक। मागत आपण परि भीक
आयुष्याचे हे स्थान। माणिकमोत्यांची खाण
रत्नजडित मुकुटाहून। त्रिभुवनसंपत्तीहून
अधिक मोलवान हा खजिना। रिता कधिहि तो होईना
कुणास चोराया ये ना। कुणास पळवाया ये ना
माणिकमोती ही जमवा। जीवन सुंदर हे सजवा
प्रभु- हेतुस पुरवा जगती। करी करोनी शुभा कृती
सत्य मंगला पाहून। संसार करु सुखखाण
हृदयी ठेवु या सुविचारी। विश्व भरु या सुखपूरी
काट्यावरि ना दृष्टी वळो। काटे पाहून मन न जळो
आशा अपुली कधि न ढळो। फुलावरिच ती दृष्टि खिळो
सोडून हा मंगल मार्ग। उगीच पेटविती आग
चिंध्या पाहुन ओरडती। आतिल रत्ना ना बघती
उगीच रडती धडपडती। बोटे मोडिति कडकड ती
रागे खाती दात किती। डोळे फाडुन किति बघती
जीवनपट विसकटवून। सुंदर तंतू तोडून
कशास चिंध्या या म्हणती। खोटी दुनिया ते वदती
असे नसे परि जीवन हे। सुखसरिता मधुरा वाहे
सुखास नाही मुळि तोटा। संसार नसे हा खोटा
दृष्टी करावी निज पूत। निराळेच मग जग दिसत
दिसतील मग माणिकमोती। मिळेल सकळा श्रीमंती
ही श्रीमंती सर्वांना। सदैव देतो प्रभुराणा
तत्त्व असे हे मनि आणा। नांदा मोदे ना गाना।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२८

मित्रांसाठी प्रार्थना

विशुद्ध मत्स्वांत सदैव राहो। विचार चित्तांत पवित्र येवो
न पापसंपर्क मना असावा। न लोभलेश प्रभुजी! दिसावा।।

करी सदा सत्कृति तीच व्हावी। अशी मला उत्सुकता असावी
नको मला मत्स्तुतिलालसा ती। घडो जनांचे हित नित्य हाती’
असे प्रभो प्रार्थियले अनंत। विलोकिसी काय मदीय अंत
न चित्त होई विमल प्रशांत। अधी रमे सतत विश्वकांत।।

न ऐकशी हाक मदीय काय। दयार्द्र तू कोमल देवराय
विमार्गगामी मज बाळकाते। न सत्पथी आणिशि काय होते?।।

जरी अध:पात मदीय व्हावा। सदैव पंकांतच हा रुतावा
अशी त्वदिच्छा जरि ती असेल। कसा तरी बाळ वरी चढेल?।।

तुझ्या मतीच्या नच मी विरुद्ध। सहावयास सर्व सदैव सिद्ध
मदर्थ आता न कधी वदेन। बुडेन किंवा प्रभुजी! तरेन।।

मदुद्धृतीचे मज नाहि काही। अता न प्रार्थीन मदर्थ पाही
परी सखे जे मम स्नेहपूर्ण। तदर्थ रात्रंदिन आळवीन।।

जयावरी प्रेम अपार केले। यदर्थ अश्रू नयनांत ठेले
दिले जयाते सगळे मदीय। असे सखे जे मम लोभनीय।।

जयाविना ना मजला विसावा। मनात ज्यांच्याजप म्या करावा
झुरे अहोरात्र यदर्थ जीव। जयावरी जीव जडे मदीय
जयाविणे शून्य उदास वाटे। जयाविणे मानस फार दाटे
जयांवरी जीव मदीय लोल। हिरेच माझे जणु जे अमोल।।

मदीय जे देव धरेवरील। मदीय पूजा मन हे करील
यदीय सौख्य मम सौख्य नांदे। यदीय दु:खे मम जीव फुंदे।।

जयांस आनंद अपार द्यावा। विचार रात्रंदीन हा करावा
यदर्थ हे जीवन अर्पण्याला। कितीकदा हा प्रभु सिद्ध झाला।।

मलाच येवो दुखणे तयांचे। यदर्थ वाटे मज हेच साचे
मला जयांची प्रभुराज सेवा। गमे सुधेचा स्पृहणीय ठेवा।।

प्रसन्नता यत्प्रिदर्शनाने। मनास वाटे न तशी कशाने
बघून ज्या दृष्टि मदीय तप्त। निवे सुखावे मम जीव तप्त।।

बहिश्चर प्राण जणू मदीय। सखे असे जे मम आंतरीय
तया तरी सत्पथि देव ठेवी। अधोगतीला न कधीहि नेई।।

तदुन्नती सतत होत राहो। उदार तच्चित्त पवित्र होवो
कृतार्थ होवोत असोत धन्य। न कोणताही मज काम अन्य।।

अनन्यभावे करितो प्रणाम। प्रभो! करा हा मम पूर्ण काम
मदीय जे मित्र तयां सदैव। करा कृती मागत एकमेव।।

तया दयाळा निज देइ हाता। निवारि आघात बनून माता
तदीय चारित्र्यकळी फुलू दे। तदीय कीर्ति त्रिजगी भरू दे।।

असोत अंतर्बहि रम्यरुप। सखे प्रभो! ठेवि सुखी अमूप
सदा पवित्रा कृती तत्करांनी। घडो न जावोत कधीहि रानी।।

त्वदीय कारुण्यवसंत- वात। सुटो सुहृज्जीवनकाननात
फुलो डुलो, हा मम एक काम। पुरा करावा, रघुवीर राम!।।

जनात होवोत पवित्रनाम। पुरा करा हा जगदीश! काम
नसे मला रे मम जीवनाशा। तयार मी तो मम सर्वनाशा।।

मदर्थ मी प्रार्थिन ते न आता। मदर्थ ना मी नमवीन माथा
मदर्थ ना प्रार्थिन मी कधीही। परी सख्यांच्यास्तव याचना ही।।

प्रभो! सखे जे प्रिय प्रेमधाम। तदर्थ चिंता मज हेच काम
सुखात ठेवी प्रभु ते सदैव। पुन:पुन्हा मागत एकमेव।।

मदर्थ नाहे रडतील डोळे। तदर्थ होतील सदैव ओले
न जीवनाची मम आस माते। सदैव जावोत सखे सुपंथे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली, सप्टेंबर १९३०

संत

भरो विश्वात आनंद। शांती नांदो चराचरी
म्हणून जळती संत। महात्मे भास्करापरी।।

असो विकास सर्वांचा। हरो दैन्य सरो तम
म्हणून जळती नित्य। महात्मे भास्करासम।।

नसे सौख्य विलासात। त्यात ना राम वाटत
हरावयाला जगत्ताप। तपती संत सतत।।

फळे लागोत मोदाची। लोकांच्या जीवनावरी
म्हणून जळती नित्य। महात्मे भास्करापरी।।

सुखासीन विलासात। पाही मरण तन्मन
मरण्यात तया मौज। जळण्यातच जीवन।।

पेटलेले होमकुंड। संताचे तेवि जीवन
परचिंता सदा त्यांना। करिती प्राण अर्पण।।

राम ना ऐषारामी। राम ना लोळण्यामध्ये
राम तो एका गोष्टीत। परार्थ जळण्यामध्ये।।

परार्थ जळती तारे। रविचंद्रहि तापती
परार्थ पळती वारे। नावेक न विसावती।।

परार्थ जगती मेघ। परार्थ तरु तिष्ठती
परार्थ पर्वत उभे। कदा काळी न बैसती।।

परार्थ सरितासंघ। परार्थ सुमने तृणे
परार्थ फळधान्यादी। परार्थ भवने वने।।

तसेच हे महा संत। परार्थ जळती सदा
तोच त्यांना सदानंद। प्रणाम शत तत्पदा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३२

मेघासारखे जीवन

काय करावे
मी मेघासम विचरावे।।

तनुवर दु:खाचे कांबळे
चिंता-चपला हृदयी जळे
शांति क्षणभर मज ना मिळे।। काय....।।

कधि सन्मित्रसंगतीमधे
घटकाघटका रमती मुदे
कधि मी फटिंग कोठे उडे।। काय....।।

कधि मी शुभ्र रुप्याच्या परी
कधि सोनेरी वेषा करी
परि ना ओलावा अंतरी।। काय....।।

कधि मी जनमतवा-यासवे
जाऊ देतो मजला जवे
होतो सुज्ञ परी अनुभवे।। काय....।।

कधि किति अधोगती पावतो
थोराथोरांशिहि झगडतो
टपटप अश्रू मग ढाळितो।। काय....।।

कधि मी वरवर किति जातसे
मन हे चिदंबरी रमतसे
इवलेही मालिन्य न दिसे।। काय....।।

कधि मी होतो मुनि जणु मुका
बघतो प्रसन्न प्रभुच्या मुखा
लुटितो अनंत आंतर सुखा।। काय....।।

कधि मी जगा सुपथ दावितो
मोठ्यामोठ्याने गरजतो
हाका मारुन मी शिकवितो।। काय....।।

येते कधि मन ओसंडुन
येतो प्रेमे ओथंबुन
तप्ता शांतवितो वर्षुन।। काय....।।

कधि गगनाहुन गुरु होतसे
कधि बिंदुकले मी बनतसे
ब्रह्मस्वरुप अनुभवितसे।। काय....।।

कधि मी हासतो रडतो कधी
कधि मी पडतो चढतो कधी
कधि कुमती मी परि कधि सुधी।। काय....।।

कधि वाक्पटू केवळ कोरडा
कधि मी भरलेला हो घडा
कधि जनसंगत कधि मी सडा।। काय....।।

ऐशा अनंत करितो कृति
अनुभवितो मी विविध स्थिति
अंती मिळविन परि सदगति।। काय....।।

जीवन यापरि मी नेइन
दिन मी ऐसे मम कंठिन
मजला आणिक ते मार्ग न।। काय....।।

कधि तरि पूर्णत्वा पाहिन
रसमय अंतर्बहि होइन
सेवा करुनी मग राहिन।। काय....।।

गळेन शिणलेली तनु यदा
सिंधुत बुडेल हा बुडबुडा
मिळविन मंगल सच्चित्पदा।। काय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२६

वंदन

मी वंदितो पदरजे विनये तयांची
ज्यांची मने विमल सुंदर सोनियाची
जे संकटास न भिती न जयास पाश
आशा सदैव अमरा न कधी उदास।।

कार्ये करून, वदती न कधी मुखाने
उत्साहमूर्ति मति सांद्र दयारसाने
जे ठेविती निजसुखावरती निखारा
त्या वंदितो नरवरा विमला उदारा।।

स्वार्थी खरोखर तिलांजलि देउनीया
संतोषवीत पर कष्टहि सोसुनीया
श्रद्धा जया अविचला रघुनाथपायी
माझी नमून मति जात तदीय ठायी।।

ज्या मोह ना पडतसे पदवीधनांचा
ज्या धाक ना कधि असे रिपुच्या बळाचा
अन्याय ना कधि बसून विलोकतील
ते वंदितो नरमणी गुणि पुण्यशील।।

ना पाहतील नयनि कधि सत्यखून
ना दीनभंजन तसे बघती दुरुन
जाळावयास उठती सगळा जुलूम
ऐशा नरांस करितो शतश: प्रणाम।।

त्यांच्यापरी मति मदीय विशुद्ध राहो
त्यांच्यापरी हृदय कष्टदशास साहो
त्यांच्यापरी परहितास्तव मी झिजावे
त्यांच्यापरी जगि जगून मरुन जावे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२७

मदीय त्या नमस्कृती

विशुद्ध भाव अंतरी
कृती उदार यत्करी
सदैव जो असे व्रती
मदीय त्या नमस्कृती।।

न पापा यन्मना शिवे
शिवे तरी झुरे जिवे
करी सदा निजोन्नती
मदीय त्या नमस्कृती।।

परोपकार आवडे
स्तुती जयास नावडे
सुनिर्मळा सदा मती
मदीय त्या नमस्कृती।।

सदैव ईश्वरस्मृती
स्वदेशकारणी रता
तयास वर्णु मी किती
सदैव त्या नमस्कृती।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२८

नवीन संन्यास

उत्साहसिंधु थोर। चित्तात नाचवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास हालवील

मालिन्य संहरुन। स्फूर्तीस पेटवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास चेतवील

कर्मात रंगुनिया। लोकांस रंगवील
संन्यास हा नवीन। आलस्य घालवील

सेवेत राबुनिया। लोकांस राबवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास शोभवील

सेवेत रंगुनिया। वस्त्रे न रंगवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास जागवील

दास्यास दूर करुन। चैतन्य खेळवील
संन्यास हा नवीन। मोक्षास पाववील

राष्ट्रास उद्धरील। दैन्यास भंगवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास हासवील

क्षण एक ना बसेल। बंधूस जीववील
संन्यास हा नवीन। देशास भूषवील

बांधील कारखाने। शाळा उभारवील
संन्यास हा नवीन। राष्ट्रास वाचवील

रस्ते करील नीट। संडास साफ करील
संन्यास हा नवीन। घाणीस संहरील

अस्पृश्य बाळकांना। जाऊन तो धुवील
संन्यास हा नवीन। भेदास घालवील

सर्वत्र आत्मतत्त्व। आचारि दाखवील
संन्यास हा नवीन। न वदेल फक्त बोल

गायींस पोषुनिया। भरपूर दूध करील
संन्यास हा नवीन। आरोग्य वाढवील

ऐक्यास निर्मुनिया। सत्प्रेम दाखवील
संन्यास हा नवीन। सत्पंथ शिकवील

राष्ट्रास भूषवील। विश्वास तोषवील
संन्यास हा नवीन। सन्मुक्ति चाखवील

संन्यास हा नवीन। सूत्रांस हालवील
संन्यास हा नवीन। संसार चालवील

राहूनिया अ- सक्त। सेवा सदा करील
संन्यास हा नवीन। सत्पंथ हा वरील


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३२

विपत्ति दे तीहि हवी विकासा

करुन माता अनुराग राग। विकासवी बाळ- मनोविभाग
फुले करु सेवुन उष्णशीत। जगी असे हीच विकासरीत।।

पिका हवे ऊन तसे पाणी। तरीच ते येइल भरभरोनी
प्रभो! न संपत्ती सदैव मागे। विपत्तिही दे मज सानुरागे।।

कभिन्न काळे घनमेघ येती। परी जगा जीवनाधार देती
विपत्ति येतील अनेक घोर। परंतु देतील विकास थोर।।

विपत्ति ही चित्तविकास- माता। दुजा नसे सदगुरु बोधदाता
विपत्ति मानीन सदा पवित्र। विपत्ति माझे घडवी चरित्र

विपत्ति मानीन मनी अमोल। विपत्ति माझे बनवील शील
विपत्ति आकार मनास देई। विपत्ति खोटे भ्रम दूर नेई।।

विपत्ति आणील जळास डोळा। मिळेल पाणी तरि जीवनाला
विपत्ति डोके जरि तापवील। स्वजीवना ऊबच ती मिळेल।।

विपत्ति मांगल्यखनी खरीच। विपत्तिरुपे मिळतो हरीच
उराशि मी लाविन ती विपत्ति। कधी न जाईन जळून चित्ती।।

विपत्तिमाजीच विकासबीज। घनांतरी वास करीत वीज
विपत्तिंतून प्रकटेल तेज। विपत्तिपंकी शुभचित्सरोज।।

कधी न लागे झळ ज्या नराला। न आच लागे कधि यन्मनाला
तया न पूर्णत्व कधी मिळेल। गंभीर त्या जीवन ना कळेल।।

विपत्ति ही जीवनवीट भाजी। विपत्ति संजीवनधार पाजी
विपत्ति आणी रुचि जीवनाला। विपत्ति दे स्फूर्ति सदा मनाला।।

प्रकाश अंधार, तरीच वाढ। सदा न मारा न सदैव लाड
विपत्ति द्या, द्या मधुन प्रकाश। प्रभो! असे मागतसे पदांस।।

विपत्ति दे तीही हवी विकासा। सदैव देशील करील नाशा
सदैव थंडी, तरि गारठेल। कळी, न ती सुंदरशी फुलेल।।

सदैव दु:खे तरि ये निराशा। दिसे न मांगल्य दिसे न आशा
मनी शिरे द्वेष तशीच चीड। भरे तिरस्कार मनी उदंड।।

म्हणून देवा! प्रणती पदास। विपत्ति ना संतत दे कुणास
करुन कारुण्य करुन कोप। विकसवी जीवन- रम्यरोप।।

प्रभो! विनम्र प्रणती पदांस। विपत्ति दे तीहि करी विकास
परी कृपाळा! न सदैव ती दे। तरीच मांगल्य मनात नांदे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

दु:ख आनंदरुप

कर्तव्याला करित असता दु:ख आनंदरूप
व्हावे माते, मजसि भरु दे अंतरंगी हुरूप
जावे दु:खे खचुन न, वरी सर्वदा म्या चढावे
व्हावे क्लेशे विचलित न मी, धीर गंभीर व्हावे।।

दु:खे व्हावे जळुन सगळे चित्तमालिन्य खाक
सदभावांची शुभ झळकु दे तेथ लावण्यझाक
दु:खे व्हावे विमलतर मन्मानसांबु प्रसन्न
दु:खे व्हावे स्थिरमति अति स्वांतरंगांत धन्य।।

दु:खे येता, हृदयी भरु दे शाश्वताचा विचार
दु:खे येता, उठुन पुस दे दीननेत्रांबुधार
दु:खे येता सहज मम हा जीव चंडोल व्हावा
जावा ध्यानांबरि उडुनिया दिव्य गानी रमावा।।

दु:खावीणे जगति न असे जीवना पूर्णता ती
दु:खे होते हृदय सरस, प्राणि ते धन्य होती
दु:खे उल्लू मतिस करिती खोल गंभीर धीर
दु:खे दृष्टी विमल करिती नेत्रिं आणून नीर।।

आपत्तीला सतत समजा दूत हा ईश्वराचा
व्हावे ना हो विमुख, करणे नित्य सत्कार तीचा
आशीर्वाद प्रभुजि वितरी देउनी दु:ख- वेष
सत्कारावा मुदित हृदय्, क्लेश मानून तोष।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली फेब्रुवारी १९३१

प्रेमधर्म

हिंदू आणिक मुसलमान ते भांडत होते तदा
राष्ट्रावरती महदापदा
जिकडेतिकडे हाणामारी दंगेधोपे सुरु
माझा जीव करी हुरहुर
परस्परांच्या खुपशित होते पोटामध्ये सुरे
ऐकुन माझे अंतर झुरे
गेले बंधुभाव विसरुन
गेले माणुसकी विसरुन
गेले पशुच अंध होउन
अविवेकाने परस्परांचे कापित होते गळे
माझ्या डोळ्यांतुन जळ गळे।।

खिन्न होउनी, उदास होउनी निराश होउन मनी
बसलो होतो मी त्या दिनी
एकाएकी अन्यत्र मला आहे बोलावणे
नव्हते शक्यच ते टाळणे
सायंकाळी गाडी होती तिकिट तिचे काढुन
बसलो गाडीत मी जाउन
नव्हते लक्षच कोणीकडे
येई पुन:पुन्हा मज रडे
भारति माझ्या का कलिकिडे
विचार नाना काहुर उडवित मानस शोके जळे
प्रभु दे सुमति कधी ना कळे।।

देव मावळे पश्चिमभागी लाल लाल ते दिसे
रक्तच का ते तेथे असे
काय तिथेही खून चालले? रवि का कुणि मारिला?
कुणि तत्कंठ काय कापिला?
भेसुर ऐसा विचार येउन मनि गेलो दचकुन
पाहू लागे टक लावुन
विरले लाल लाल ते परी
तारका चमकू लागत वरी
शांती पसरे धरणीवरी
लाल लाल रुधिरानंतर का शांति जगाला मिळे
काहिच मन्मतिला ना कळे।।

गाडीमध्ये दिवे लागले, तारका वरि जमकले
तिमिरी प्रकाश जगता मिळे
भारतीय जनता हृदयांबरि प्रेमतारकातती
केव्हा चमकु बरे लागती?
प्रेमदीप कधि भारतीय-हृन्मंदिरि पाजळतिल?
केव्हा द्वेष सकल शमतिल?
वरती ता-यांना पाहुन
ऐसे विचार करि मन्मन
मधुनी पाझरती लोचन
खिडकीच्या बाहेरच मन्मुख जे अश्रूंना मळे
डोळे प्रभुचरणी लाविले।।

गाडीमध्ये नानापरिचे होते तोथे जन
तिकडे नव्हते माझे मन
एकाएकी खिडकीतुन परि आत वळविले मुख
विद्युद्दीप करित लखलख
गोड गोड मी शब्द ऐकिले भरलेले प्रीतीने
गेलो मोहुन त्या वाणिने
होती एक मुसलमानिण
होती गरीब ती मजुरिण
दिसली पोक्त मला पावन
आवडता तत्सुत बाहेरी पुन:पुन्हा पाहत
होती त्याला समजावित।।

गरीब होती बाई म्हणुनी नव्हता बुरखा तिला
होता व्यवहार तिचा खुला
प्रभुच्या सृष्टीमधे उघड ती वागतसे निर्भय
सदय प्रभुवर ना निर्दय
खानदानिच्या नबाबांस ती आवरणे बंधने
गरिबा विशंक ते हिंडणे
होती तेजस्वी ती सती
दिसली प्रेमळ परि ती किती
बोले मधुर निज मुलाप्रती
मायलेकरांचा प्रेमाचा संवाद मनोहर
त्याहुन काय जगी सुंदर?।।

“नको काढु रे बाळा! डोके बाहेरी सारखे”
बोले माता ती कौतुके
“किति सांगावे फार खोडकर पुन्हा न आणिन तुला”
ऐसे बोले प्रेमे मुला
“ये मजजवळी मांडीवर या ठेवुन डोके निज
बेटा! नको सतावू मज
झाली भाकर ना खाउन
जाई आता तरि झोपुन
डोळ्यांमध्ये जाइल कण”
असे बोलुन प्रेमे घेई बाळ जवळ ओढुन
ठेवी मांडीवर निजवुन।।

पाच सहा वरुषांचा होता अल्लड तो बालक
माता करिते तत्कौतुक
क्षणभर त्याने शांत ठेविले डोके मांडीवरी
चुळबुळ मधुन मधुन तो करी
पुनरपि उठला, गोड हासला, मातेसही हासवी
जाया संमति जणु त्या हवी
का रे उठसि लबाडा अता
डोळे मिटुनी झोपे अता
ऐसे अम्मा ती बोलता
फिरुन तिच्या मांडीवरती बाळ गोड झोपला
त्याचा मुका तिने घेतला।।

मुसलमान बाईशेजारी होती एक कुणबिण
होते करुण तिचे आनन
लहान अर्भक बसली होती मांडीवर घेउन
पाणरलेले तल्लोचन
एकाएकी मूल रडाया मोठ्याने लागले
पाजायास तिने घेतले
घाली पदर तन्मुखावरी
लावी स्तनास तन्मुख करी
अर्भक आक्रंदे ते परी
पुन:पुन्हा ती स्तनास लावी अर्भकमुख माउली
परि ते तोंड लाविना मुळी।।

“पी रे बाळा! ही वेल्हाळा! नको रडू रे असा
रडुनी बसला बघ रे घसा
किति तरि रडशिल उगी उगी रे काय तुला जाहले
गेले सुकुन किती सोनुले
उगी उगी रे पहा पहा हे दिवे लागले वरी”
राहे बाळ उगा ना परी
त्याला पायावर घालुन
हलवी आई हेलावुन
बघते अंगाई गावुन
रडे तयाचे कमि न होइ परि अधिकच रडू लागला
वाटे मरण बरे जननिला।।

चहा चिरुट चिवडा भजि यांचे भक्त तदा कोपले
मातेवरि गुरुगुरु लागले
“किति रडविशि गे त्या पोराला ट्यांहा ट्यांहा करी
होतो त्रास इथे किति तरी
दांडक थोपट टाक निजवुनी
घंटाभर रडतसे
लाजच बायांना या नसे”
ऐकून निर्दय ते बोलणे
बालक आपटिले जननीने
बाकावरती निष्ठुरपणे
“तूहि कारट्या आईला या आलास छळावया”
बोले माया विसरुनिया।।

पुन्हा उचलिले तिने तान्हुले प्रेम न रागावते
क्षणभर जणु ते भांबावते
“उगी उगी रे तुला नाहि हो बाळा! मी बोलल्ये
दैवच फिरले रे आपुले
पी रे राजा, पी हो थोडे, वाटेल तुल बरे”
ऐसे बोले ती गहिवरे
बाळ स्तना न लावी मुख
माता खाऊ पाहे विख
करुनी पायांचा पालख
बसली हलवित फिरुनी त्याला अगतिक भरल्या मने
वदवे काहि न तिज वाणिने।।

केविलवाणी हताश होउनि बसली ती माउली
रडते बाळक मांडीवरी
मनात म्हटले मी देवाला ‘बाळ करी रे उगी’
परि मद्वाणी ती वाउगी
प्रेमे हृदयी वोसंडोनी स्वपर सकल विसरुनी
हाती बालक ते घेउनी
असते जरि मी समजाविले
असते किति सुंदर जाहले
नव्हते भाग्य परी तेउले
मदहंकारे दूर राहुनी आळविला मी प्रभु
दंभचि परि तो जाणे विभु।।

मुसलमान बाईचे त्या असे हृदय खरे आइचे
गेले कळवळुनी मन तिचे
पुत्रप्रेमाचा तिज होता पावन तो अनुभव
सुमधुर मंगल सुंदर शिव
मांडीवरती डोके ठेवुन बाळ तिचा झोपला
होता हळुच तिने उचलिला
तेथे चिरगुट मग पसरुन
त्यावर निज बाळक निजवुन
उठली बाई मुसलमानिण
हिंदू बाइच्या जवळी गेली बोले मधुर स्वरे
कुणबिण फारच ते गहिवरे।।

“द्या मजजवळी, द्याच जरासा, घेते त्याला जरा”
ऐसे बोलुन पसरी करा
“फारच आहे रडत सारखा दृष्ट काय लागली
घामाघूम तनू जाहली
रडुनी रडुनी दमला तरिही रडणे ना थांबवी
दूधही अंगावर ना पिई
द्या मजजवळ जरा लेकरा
संकोच न तो इवला करा
घेउन बघते मी त्या जरा”
प्रेमाचे अनकंपेचे ते गोड शब्द बोलुन
घेई बाळक ती ओढून।।

गोड बोलते मुलाजवळ ती “रडू नको रे असा
रडुनी रडविसि आइस कसा”
टिचक्या वाजवि, दिवे दाखवी, हातांनी नाचवी
त्याचे हातपाय खाजवी
कानी त्याच्या कुर्र करितसे भांडे ती वाजवी
अम्मा अर्भक ते खेळवी
तेव्हा चांद उगवला नभी
फुलवी बालकवदनच्छबि
“रो मत उगि हां बेटा अबी”
प्रेमे बोलुन, बाळ डोलवी वात्सल्ये खेळवी
त्याचे रडणे ती थांबवी।।

चमत्कार जाहला खरोखर बाळ-रडे थांबले
हासू खेळू ते लागले
अम्मा त्याला वरती उडवी घेइ करी झेलुन
बाळक हसते ते खेळुन
गोड गोड ते हास्य तयाचे डब्यात पसरत असे
इतरांनाही सुखवीतसे
येती चंद्रकिरण गाडित
अर्भक गोड तसे हासत
माझे मानस मोहावत
कृतकृत्य तया अम्मेलागी मनात जणु वाटले
अमित प्रेम मनी दाटले।।

“उगा राहिला, खेळु लागला, पाजा त्याला अता
झोपले क्षण न लागता”
असे बोलुनी अम्मा देई अर्भक जननीकरी
घेई माता मांडीवरी
पाजायाला मूल घेतले स्तनास लावी मुख
बाळ प्राशी होई सुख
भरले मातेचे लोचन
भरले मातेचे ते स्तन
भरले गहिवरुन तन्मन
बाळराज तो राजस होता पीत पोटभर पय
झाले मातृहृदय सुखमय।।

पुन:पुन्हा ती त्या बाळाला घट्ट आवळुन धरी
माता सुखावली अंतरी
बाळाने हे रिते करावे भरलेले स्वस्तन
ऐसे वांछी किति तन्मन
पोटभरी तो प्याला धाला पदर दूर सारित
बालक निजमुख-शशि दावित
हसणे मधुर किति मनोहर
काळेभोर नयन सुंदर
मुख मोहाचे माहेरघर
अमित सुखाचे भरले आले घेइ मुके कितितरी
माता, तृप्त न परि अंतरी।।

“काय लबाडा! झाले होते, रडावयाला मघा
आता गुलाम हसतो बघा
मघा कोणते आले होते भूत गुलामा तुला
चावट कुठला वेडा खुळा
पहा पहा हो किति तरी हसतो, तुम्हि याला हसविले
अमृत त्याच्यावर शिंपले
ओळख पूर्वजन्मिची जणु
संशय मज न वाटतो अणु”
ऐसे बोलुन हलवुन हनु
मुका तयाचा घेइ आई बाळक ते हासले
पोटी प्रेमाने घेतले।।

कृतज्ञतेने कुणबिण किति ती हृदया भरली असे
गहिवर पोटी मावत नसे
हासत खेळत बाळक निजला क्षणात मांडीवर
आइस आवरे न गहिवर
अम्मेचे मुख कृतज्ञतेने भरल्या नेत्री बघे
शब्द न बाहेरी परि निघे
“तुम्ही हासविला मद्बाळक...”
परि तिज वदवेना आणिक
पाहे भरल्या नेत्री मुख
अम्मेचा ती हात आपुल्या हाती प्रेमे धरी
त्यावरि गळती अश्रुच्या सरी।।

भरलेल्या अंतरातून त्या वच बाहेर न फुटे
नयनी प्रेमझरा परि सुटे
हृदयामधला भाव सकल तो विमलाश्रू दाविती
तेथे शब्द सकळ खुंटती
मुकेपणा तो बेलुन दावी अनंत हृदयातले
अन्योन्यासचि सगळे कळे
थोडी ओसरली भावना
झाला अवसर संभाषणां
पुशिती पदराने लोचना
दोन अशा त्या माता दिसल्या गंगायमुनांपरी
नति मी केली दुरुनी करी।।

कुणबिण मग ती हळुच सोडिते पदराच्या गाठिस
काढी त्यातून सुपारिस
अम्मेला द्यावयास जवळी दुसरे काहिच नसे
कुणबिण दीन दरिद्री असे
कृतज्ञतेला प्रकट कराया उत्सुकता मानवा
त्याविण समाधान ना जिवा
करण्या कृतज्ञता प्रकट ती
पुरते पोद्यांची मूठ ती
असु दे वस्तु कशी वा किती
कृतज्ञतेचा सिंधु मावतो बाह्य-चिन्ह-बिंदुंत
जैसा विश्वंभर मूर्तित।।

सुपारिचे ते खांड काढिले अम्मेला ते दिले
भरले कृतज्ञतेने भले
साधे नव्हते खांड, अमोलिक मंतरलेले असे
जिविचा भाव त्यात तो वसे
माणिकमोत्यांच्या राशीहुन त्रिभुवनलक्ष्मीहुन
अधिकचि कृतज्ञतेची खुण
होती कठिण सुपारी जरी
प्रेमे भिजलेली ती परी
अम्मेच्या ती देई करी
देउन पाही पुन्हा तन्मुखा भरलेल्या लोचनी
अम्मा विरघळली ती मनी।।

होते मांडीवरती निजले मूल गोड गोजिरे
साजिरे दमले रडुनी खरे
रडावयाचे कसे थांबले? काय जादु जाहली
माझी वृत्तिच ती गुंगली
क्षणात पडला प्रकाश माझ्या हृदयी सुंदर परी
कळली गोष्ट मला अंतरी
नवपिढिचा तो बालारुण
होता करित अमित रोदन
होता भुका, न परि घे स्तन
भेदातीत प्रेम पिउन तो बालप्रभु तोषला
खुलला फुलला मग हासला।।

मुसलमान मी, मी हिंदू, हे माता त्या विसरल्या
प्रेमसमुद्री त्या डुंबल्या
माता तेथुन एकच, त्यांचा धर्म एकची असे
एकच वत्सलता ती असे
हास्य, अश्रु ते एकच असती सगळ्यांना समजती
हृदये हृदयाला जोडिती
एक प्रेमधर्म तो खरा
कळतो सकळांच्या अंतरा
परि ना रुचतो अजुनी नरा
हृदयांतील या सद्धर्माला दडपुन पायातळी
जगि या माजविती हे कली।।

परस्परांची वैरे विसरा विरोध ते मालवा
प्रेमे जीवन निज रंगवा
परस्परांची उणी न काढा परगुणगौरव करा
कर धारुनी सहकार्या करा
परस्परांच्या संस्कृतिमधले हितकर मंगल बघा
बघु दे दृष्टि सुंदर शुभा
होऊ प्रभुचे यात्रेकरु
सगळे सुपंथ आपण धरु
जग हे आनंदाने भरु
कधी परी हे होइल? कधि का होइना मी तरी
पूजिन प्रेमधर्म अंतरी।।

मोठे मोठे आग लावणे हाच धर्म मानिती
प्रेते उकरुन ती काढिती
इतिहासातिल जनांपुढे हे भुतावळिच मांडिती
मंगल शिव ना ते दाविती
विझवतील ना वणवे कोणी तेलच ते ओतिती
सार्थक ह्यांतच ते मानिती
खोट्या स्वाभिमान-कल्पना
खोट्या धर्माच्या कल्पना
करिती स्मशान नंदनवना
न अहंतेचे महंत व्हावे धर्म अहंता नसे
धर्म प्रेमी नांदत असे।।

धर्माचे सत्प्रेम हेचि हो सुंदर सिंहासन
दिसती धर्म तिथे शोभुन
द्वेषमत्सरांचे ते आहे धर्माला वावडे
धर्मा प्रेम एक आवडे
प्रेमरुप तो परमेश्वरही प्रेमे त्याला पहा
पूजा प्रेमाची त्या वहा
सकळही देवाची लेकरे
कोठे भेद तरी तो उरे
झाले पाप अता ते पुरे
जीवनपंथा उजळो आता प्रेमदीप शाश्वत
पावू मंगल मग निश्चित।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३३

परी बाळाला सकळ ती समान

तीन वर्षांचा बाळ गोड आला। नसे सीमा जणु त्याचिया सुखाला
हास्य त्याच्या मुखि गोड किति साजे। मूर्ति गोंडस ती गोजिरी विराजे।।

अधर मधुर तसे गोड गाल डोळे। सुखानंदाने भरुन जणू गेले
काय झाले सुख एवढे अपूर्व। तया बाळा, ज्यापुढे तुच्छ सर्व।।

“काय सापडले? हससी का असा रे। लबाडा सांग सांग सारे”
प्रश्न ऐकुन लागला हसायाला। अधिक निज मोदा दाखविता झाला।।

खिशामाजी तो बाळ बघू लागे। “काय आहे रे त्यात मला सांगे”
फिरुन हसला मत्प्रश्न ऐकुनी तो। कौतुकाने परि पुन्हा तो पहातो।।

हास्य ओठांतुन दाबल्या निघाले। बाळकाने मग फूल काढियेले
खिशातूनी ते गोड गुलाबाचे। दिव्य सुंदर सदधाम सुगंधाचे।।

काढि बाळक ते प्रथम फूल एक। दुजे काढी मग त्याहुनी सुरेख
आणि तिसरे ते कण्हेरिचे लाल। सकल संपत्ति प्रकट करी बाळ।।

परी राहे सुम अजुन एक आत। खिशामाजि पुन्हा घालि बाळ हात
फूल चौथे बाहेर काढियले। सर्व सुकलेले वाळुन जे गेले।।

चार पुष्पे मज दाखवून हासे। चार पुष्पे मज दाखवून नाचे
पुन्हा चारीही ठेवि ती खिशात। हसुन बाळक तो दूर निघुन जात।।

तीन पुष्पे रमणीय गोड छान। परी चवथे ते गलित शुष्क दीन
तुम्ही म्हटले असतेच तया घाण। परी बाळाला सकळ ती समान।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२९

ग्रंथमहिमा

दु:खाला जे विसरवनिया दिव्य आनंद देती
एकांती जे परम निकट स्नेहि सप्रेम होती
चित्ती ज्यांच्या मुळि न शिवतो भेद हा साव चोर
सर्वांनाही सुखवित सदा ग्रंथ हे संत थोर।।

कोणी येवो पुरुष वनिता बालिका बाल वृद्ध
सर्वा देती सुरस, करिती बुद्धिते जे समृद्ध
गांभीर्याते किति तरि पहा जीवनी आणितात
आपन्मग्ना हत-जन-मना ग्रंथ हे तातमात।।

तुम्हां द्याया सतत असती ग्रंथराजे तयार
पावित्र्याची परम विमला ज्ञानपीयूष-धार
जी संसारी तृषित हृदये ग्रंथ हे ज्ञानसिंधु
त्यांना होती मधुर, निवती सेविता एक बिंदु।।

झाले गेले कितिक परि ते ग्रंथ आहेत नित्य
आनंदाला वितरुन जगा दाविताती सुपंथ
सेवा धामी विपिनि करिता ग्रंथ तैशीच कारी
नाही सा-या भुवनि असले मित्र नित्योपकारी।।

रात्री प्रात:समयि उघडा ग्रंथ केव्हाहि वाचा
युष्मत्सेवा विपुल करणे हाच आनंद त्यांचा
हिंडायाची अविचलमने काळसिंधूवरून
ज्याला इच्छा, फिरविति तया ग्रंथ हातात धरून।।

नानालापे रमविति मना ग्रंथ ही गोड वेणू
जे जे वांछी मन वितरिती ग्रंथ ही कामधेनू
मातीलाही कनक करिती लाजवीती परीस
नाही मोठा हितकर सखा अन्य ग्रंथापरीस।।

आयुष्याची हितकर दिशा ग्रंथ हे दाखवीती
जीवित्वाची शिकविति कला नूतना दृष्टि देती
उन्मत्तांना नमविति विपदग्रस्त त्या हासवीती
प्रज्ञावंत स्थिर करुनिया मूर्ख त्या लाजवीती।।

संबोधूनी करिति जगदुत्कर्ष हे ग्रंथ साधे
ग्रंथलोके मनुजमतिला कार्यकौशल्य लाधे
नि:स्वार्थी हे अखिल-भुवनाचार्य सदग्रंथ दिव्य
मानव्याला उचलिति वरी पंथ दावीत भव्य।।

माता भ्राता प्रियसख गुरु तात वा रम्य कांता
नानारुपे रमविति पहा ग्रंथ हे मानवाता
जे ना कोणाप्रतिहि कथिले ग्रंथकारे विचार
ते या ग्रंथी प्रकट, उघडे अंतरातील सार।।

सांगे ना जी प्रियतमजनापाशिही ग्रंथकार
ओती ती हो खळबळ इथे, विवृत स्वांतदर
पापुद्रे ते सकळ दिसती चित्तकंदावरील
येई सारे हृदय कळुनी गूढ गंभीर खोल।।

ग्रंथाकारे विमल अमरा दिव्यरंगा समाधी
लावण्याची परम मधुरा लेखक स्वीय बांधी
कैसे तेथे झळकति हि-यांसारखे सद्विचार
जैसे नानाविध मणि तसे भावनांचे प्रकार।।

ग्रंथामाजी अमर असती दिव्य चैतन्यरुप
कर्ते, विश्वा सुखविति सदा मोद देती अमूप
केव्हाही ना मृति शिवतसे थोर सदग्रंथकारा
लोकोद्धारा निशिदीन उभा द्यावया ज्ञानधारा।।

त्रैलेक्यी या फिरविति तुम्हां ग्रंथ देऊन पंख
तत्त्वज्ञानी कवि मुनि तसे भेटती राव रंक
अंतर्यामी उसळविति ते गोड आनंदपूर
केव्हा केव्हा रडविति किती गाउनी दु:खसूर।।

संसाराचे त्रिविध मनुजा दाविती ग्रंथरुप
नाना रुपे मनुजहृदया ज्ञान देती अमूप
छेडोनीया तरल हृदयी सूक्ष्म तारा अनंत
जीवात्म्याला परिसविति ते दिव्य संगीत ग्रंथ।।

जे जे काही घडत असते मानवी जीवनात
अंतर्बाह्य प्रकट करिती ग्रंथ सामर्थ्यवंत
अंत:सृष्टी गुरु किती तरी बाह्यसृष्टीपरीस
ते सदग्रंथांवरुन कळते होइ अंतर्विकास।।

केव्हाही दुर्मुख न दिसती ग्रंथ नित्य प्रसन्न
ना कोणाला कथितिल कधी गोष्टी त्या भिन्न भिन्न
ग्रंथांऐसे परमसुख ना देखिले या जगात
ग्रंथी होता निरत मज तो होउ दे मृत्यु प्राप्त।।

आदर्शाला, शुभ अशुभ वा स्वीय रुपा बघाया
देती ग्रंथ स्वकरि मनुजा, या मिषे उद्धाराया
‘सत्याचा तो विजय ठरला, सत्य पूजा सदैव’
सदग्रंथी हे सतत असते सूत्र हो एकमेव।।

माते ना ते विभव रुचते राजवाडे नको ते
नाते गोते मजसि नलगे नाम मोठे नको ते
वस्त्रांची ती तलम न रुची ना अलंकार काम
व्हावे माझ्या निकट परि हे ग्रंथ कैवल्यधाम।।

रात्री माझ्या निकट असु दे तैलसंपूर्ण दीप
इच्छा नाही इतर असु दे ग्रंथराजे समीप
कोठे रानी मग सदनि वा अन्य देशी तुरुंगी
आनंदाने परिहरिन मी काळ सदग्रंथ-संगी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

गुढीपाडवा

नूतन संवत्सर आला। मोद मनाला बहु झाला
घालुन सुंदर सडे पथी। शोभा करिती लोक किती
उंच गुढी ही उभारली। चमके तेजे नभ:स्थळी
सुंदर पट सुंदर माळा। गुढी सजवली सुमंगला
मंद वायुने कशी डुले। जनमतिकलिका मुदे खुले
विसरा मागिल शुभाशुभ। नूतन करणे आरंभ
विसरा मागिल कलहाना। विसरा मागिल अपमाना
विसरा दुष्कृति मागील। टाका पुढती पाऊल
मागिल मंगल घेऊन। पुढेच जाऊ चालून
निर्मा उज्ज्वल आकांक्षा। निर्मा हृदयी शुभ वांछा
नूतन जीवन सजवावे। आशेने पुढती जावे
दु:ख दैन्य नैराश्य कथा। हरु संहरु जगदव्यथा
आनंदरसा निर्मू या। विपुल समस्ता देऊ या
आनंदाचे साम्राज्य। स्वातंत्र्याचे साम्राज्य
मांगल्याचे साम्राज्य। भूवर निर्मू या आज
चला सकल सवंगडे तुम्ही। आपणास ना काहि कमी
स्वर्ग धरित्रीवर आणू। पृथ्वी मोदाने न्हाणू
विजयध्वज उभवू दिव्य। स्वातंत्र्याचे ते भव्य
चला उभारा गुढी उंच। कुणी न राहो जगि नीच
करु वर अपुल्या या माना। घेऊ सन्मानस्थाना
गुढी नाचते गगनात। श्रद्धा नाचे हृदयात
सदैव आशा बाळगुन। सदैव विजयी होऊन
गुढीपाडवा शुभंकर। करु साजरा खरोखर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९९९

नागपंचमी

अजि नागपंचमीचा। आला पवित्र वार
निज अंतरंगी आज। राखा मुळी न वैर
हृदयात प्रेमपूर। भरपूर आज वाहो
आनंद सर्व जीवा। जगतात आज राहो
हा नागपंचमीचा। दिन थोर थोर साचा
जो सर्प मूर्त मृत्यु। त्यालाहि पूजण्याचा
मृत्युहिही गोड माना। सर्पाहि पूज्य माना
जो दुष्ट घेइ चावा। त्यालाहि देव माना
सर्वांतरी सदंश। सर्वात सच्चिदंश
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
प्रेमा सदैव देऊ। अवघ्या चराचरास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
नागाहि पूज्य मानू। त्या प्रेम गोड देऊ
मग बंधुबंधु आम्ही। किति गोड रीति राहू
हा थोर थोर दिवस। दिधला तुम्हां आम्हांस
घालून पूर्वजांनी। प्रेमा शिकावयास
वर्षात एक दिवस। ना सुष्ट दुष्ट पाहू
दिनी ह्या तरी निदान। सर्वांस प्रेम देऊ
अद्वैत तत्त्व थोर। कर्मात आणण्यास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
ती संस्कृती उदात्त। अपुली शुभा अनंत
जणु साठवीत एका। ऋषि नागपंचमीत
त्या थोर पूर्वजांची। पाहून थोर दृष्टी
मज येतसे भरुन। ही होइ अश्रुवृष्टि
डोळ्यांमधून आज। वाहोत प्रेमगंगा
सौख्यांबुधीत सारे। या रे विशंक डुंबा
वाणीमधून आज। माधुर्य ते स्त्रवू दे
करणीमधून सर्व। स्नेहामृता झरू दे
वेलीवरील फूल। तेही न आज तोडा
हिरव्या तणांकुराला। त्याही न आज तोडा
काडी न आज मोडा। लावा कुणा ढका न
प्रेमात आज राहो। सृष्टी उभी बुडून
घ्या फावडे न कुदळ। असतील जीवजंतू
दुखवा न त्यांस आज। आणा न त्यांस अंत
भूमाय ही क्षमेची। मूर्ती तिला न दुखवा
न खणा मुळीच आज। गाऊन गीत सुखवा
जगतात आज कोणा। भयभीति ती नसू दे
आजी परस्परांत। विश्वास तो वसू दे
लघु जीव कीड मुंगी। तृणपर्ण मृत्कणाही
दुखवी न आज बंधो। सर्वत्र देव पाहि जीव
सर्वत्र आत्मतत्त्व। समदृष्टि थोर ठेव
सकलांहि त्या सणांत। ह्या नागपंचमीस
आहे महत्त्व फार। वाटे मदंतरास


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

दसरा

आला दसरा, रमणीय सुखाचा हसरा।। आला....।।

माझे मम ही सीमा लंघा
शमवा अंत:कलिचा दंगा
परोपकारामाजी रंगा
दु:खा विसरा।। रमणीय....।।

अज्ञानाची संपो रात्री
लावा ज्ञानाच्या त्या ज्योती
भू-मातेची मंगल किर्ती
भुवनी पसरा।। रमणीय....।।

सदगुण-सोने आज लुटू या
दुर्गुण सारे दुरी घालवु या
निज-चित्तावर मिळवू विजया
हे ना विसरा।। रमणीय....।।

मनावर जरी विजय मिळेल
स्वातंत्र्यादिक सहज येतिल
भाग्यश्री ती धावत येइल
शंका न धरा।। रमणीय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

संक्रांत

मकर-संक्रांत
सुखाच्या सुकाळा
चला हलवा करु
या रे सारी जणे
कलह-मत्सर
शेगडी पेटवा
कळकळ तळमळ
शेगडीच्यावर
स्नेहाचे घ्या तिळ
भक्तीच्या शर्करे
औत्सुक्याच्या हाते
सुंदर हलवा
प्रेमाचे रोमांच
पितळी ती फुले
दयेचा श्रद्धेचा
रंग केशराचा
दिव्य हा हलवा
मने जोडणारा
चला एकमेकां
गोडीने या राहू
आली शुभ वेळा
चला करु
मोढ्या आनंदाने
श्रमावया
कोळसे जमवा
हृदयाची
पितळी सुंदर
द्या ठेवून
निर्मळ साजिरे
पाक करा
हळूच हलवा
होऊ लागे
काटा हाच खुले
हलव्याने
सहानुभूतीचा
हाच शोभे
मने मोहणारा
अभिनव
देऊ घेऊ खाऊ
संसारात


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

लहान मित्राबद्दल!

असे माझा मित्र हो लहान। तदगुणांचे परि सकल करिति गान
ऐकुनीया किति सौख्य होइ माते। असे ठाव ते फक्त मन्मनाते।।

दृष्टी निर्मळ मुखमंडल प्रसन्न। दिसे न कधी तो कुणालाहि खिन्न
दु:ख निज लपवी, अन्य दु:ख जाई। हरायाते तो सदोदीत पाही।।

वीणिमाजी वाहते प्रेमगंगा। करि न कोणाच्या कधी मनोभंगा
हृदय हाळु त्यांचे फुलापरी रम्य। कार्यशक्ति परी तदीया अदम्य।।

शील त्याचे सर्वांशि निष्कलंक। करी जवळ सदा गोरगरिबरंक
गर्व चित्ताला नसेच तो ठावा। जगन्मित्र जणू कुणाशी न दावा।।

अंतरंगी खेळवी सद्विचार। घडे हातुन सर्वदा सदाचार
जरी घडली हातून अल्प चूक। अश्रु आणिल लोचनी करिल शोक।।

निज स्वल्पहि अपराध घोर मनी। परी दुस-याचा चित्ति कधी नाणी
जरी दुस-याचा अल्प गुण दिसेल। स्तवन त्याचे करुनिया मनि सुखेल।।

देशभक्तीचा तदंतरी पूर। देशसेवेचा हृदयि उठे सूर
वस्तु परदेशी सदा ठेवि दूर। तया स्वातंत्र्याचीच हूरहूर।।

स्वता वापरुनी शुद्ध साधि खादी। वळवि परमनही गोड वचें बोधी
कार्य करुनी जो ना कधी वदेल। निज स्तुति ऐकुन लाजुन जाईल।।

कार्य दुस-याचे सतत ये कराया। स्वयंसेवक तो स्रवदा सहाया
असा नाही पाहिला युवा अन्य। बघुनि त्याला वाटते धन्य धन्य।।

मुखी त्याच्या ते हास्य सदा गोड। शब्द अमृतासम नाहि तया जोड
प्रेमपूर्ण किती सरळ मधुर डोळे। दिव्य सुंदर ते तेज भाळि खेळे।।

दंत निर्मळ ते जणू मोतियांचे। अधर पातळ जणू वेल पोवळ्यांचे
नाक सरळ परी जरा बाकदार। दिसे मुद्रा दिलदार ती उदार।।

सदा गाठाया ध्येय उच्च पाही। सदा दिनदिन जो वरति वरति जाई
थोर त्याचे ते जीवन मज वाटे। तया पाहुन गहिवरे हृदय दाटे।।

असे त्याला शुभ नाम नामदेवष करो नामासम वर्तना सदैव
नाम अन्वर्थक देवराय होवो। तुझी त्याच्यावर सर्वदा दया हो।।

प्रभो! तुमच्या मी लागतसे पाया।  तयावर ठेवा सदा दया-छाया
मनोरथ त्याचे पूर्ण करा देवा। तच्छिरावरती वरदहस्त ठेवा।।

मदायुष्यहि हे तयालागि द्यावे। असे जे जे मत्सत् तयास द्यावे
प्रभो! सांभाळी त्यास तू कृपेने। सकल संकट मोहादि लयाते ने।।

दयासिंधो हे दीनबंधु देवा। असे माझी प्रार्थना एकमेवा
मित्र माझा मत्प्राण जणू अन्य। कृतार्थ करा तज्जीवनास धन्य।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

लहानपणची आठवण

होतो मी लहान
आनंदाने मनी
नाचता नाचता
क्रीडा-रसपान
टपकन आवाज
जीव माझा भ्याला
भानावरी आलो
अंगणी हिंडलो
देखिले मी दृश्य
माझे तो लोचन
झाडावरुनिया
पडलेसे साचे
लोळा गोळा त्याचे
मन्मना गहिवर
आसन्नमरण
घरात घेवोनी
मऊ कापसाची
झारी आणीयेली
चिमुकली चोच
घातले, हृत्सिंधु
मधून ते पाहे
हृदय कोवळे
बारीक धान्याचे
चोचीत घातले
मज त्या वेळेला
खेळ तो रुचेना
पिलाच्या समीप
कोठेही न गेलो
फिरवीत डोळे
जीव हुरहुरु
हात लावताच
खेळत अंगणी
नाचतयसे
हरपले भान
करीतये
अंगणात झाला
एकाएकी
पाहू मी लागलो
चहूकडे
अत्यंत करुण
ओलावले
पिलू पाखराचे
विव्हळत
पंख ना खंबीर
आवरेना
पिला उचलोनी
शीघ्र आलो
गादी छान केली
पाणियाची
उघडून बिंदु
हेलावत
उघडोनी डोळे
माझे भरे
कण मी आणिले
हळूहळू
काहीही सुचेना
खाणेपिणे
बसून राहिलो
सोडूनिया
दुर्बळ पाखरु
करी माझा
चीं चीं चीं चीं करी
हृदय विदारी
त्याच्या मऊ अंगा
कापूसही टुपे
होते हबकले
वेदना अपार
‘कैसे याचे दु:ख
काय मी रे करू
देवा आळविले
दयेच्या माहेरा
पाखराजवळ
त्याला समजावित
‘खाई दाणापाणी
काय तुज माझा
नको रागवू हो
वाचवाया प्राण
होई बरा नीट
मग जा तू थेट
आठवण तुज
कुशीच्या उबेची
येईल स्मृती हे
जरा होई पाहे
येथे उणे तुज
करांत घेईन
गादी मऊमऊ
त्यावर निजवीन
माझे न ऐकशी
तोंड हे मलूल
आई, बघ कैसे
कैसे काय करू
आई बघ याला
काही तरी करी
उपाय थकले
मिटीत तो डोळा
त्याचा शब्द
हात माझा खुपे
जणू वाटे
उंचावरुन फार
होती त्यास
अजाण मी हरू
देवराया’
‘वाचव पाखरा
विश्वंभरा’
होतो मी बोलत
गोड शब्दी
पी रे माझ्या राजा
राग येतो
मीही रे लहान
झटे तुझे
होई जरा धीट
आईकडे
येते का आईची
गोड गोड
खरे जरी आहे
चांगला तू
पडू ना देईन
कुरवाळोनी
तुला मी घालीन
थोपटून
का रे गोड बोल
का रे केले
करीत पाखरु
सांग मज
होते काय तरी
उपाय तू’
झाला लोळा गोळा
क्षणामाजी
मृदुल ती मान
हृदयरडले
पाखरा राजसा
मजसी तोडून
मी ना कोणी तुझा
आई आहे परी
धाय मोकलील
प्राण ती सोडील
चोचीमध्ये दाणा
तुला न बघून
रडेल ती शोके
घिरट्या घालील
तुझ्या आईसाठी
नको ताटातुटी
मऊ मऊ तुला
टाकून तू प्राणा
संबोधिले ऐसे
पावले ते मृती
मी माझ्या लहान
“मूठमाती यास
आईजवळून
घेतले पवित्र
सोवळ्याची होती
फाडून घेतली
रेशमाच्या वस्त्री
गुंडाळून, गेह
बागेमध्ये गेलो
जेथे त्या फुलती
मोग-याजवळ
रडत खणली
आसवांच्या जळे
पवित्र ती केली
दगडधोंड्यास
टाकून पडले
माझे किती
गेलास सोडून
क्षणामध्ये
वाटे तुला जरी
घरी तुझी
टाहो रे फोडील
तुझ्यासाठी
येईल घेऊन
रडेल ती
वेडी ती होईल
भिरीभिरी
तिच्या प्रेमासाठी
करु राजा
घातला बिछाना
जाशी परी
पाखरास किती
हाय गेले
बोललो भावास
चल देऊ”
रेशमाचे वस्त्र
गुंडाळाया
जुनी एक चोळी
धांदोटी मी
पिलाचा त्या देह
सोडियेले
मोगरे शेवंती
तेथे गेलो
जागा नीट केली
खळगी एक
भूमी ती शिंपिली
जणू आम्ही
बाजूस करोनी
देह उचलोनी
फुले ठेवीयेली
अश्रू ते नेत्रीचे
शेवटले स्नान
पिलाला प्रेमाचे
डोळ्यांतील धारा
लोटिली ती माती
मऊ मेणाहून
त्यावर लोटून
डोक्यावर तेव्हा
शोकाने भरलेला
पिलाची ती आई
वर घिरट्या घाली
“तुझे बाळ गेले
नको ओरडोनी
त्याला नाही काही
मातृप्रेमाविणे
दिले त्याला पाणी
दिले बिछान्यास
नको ग ओरडू
माझी कासाविशी
बैसली पक्षिणी
करी आर्तस्वर
उरलेली माती
माता ती पहाते
कठोर वाटले
डोळ्यांतून लोटे
माती लोटुनिया
माता येई तीर
हुंगीतसे माती
डोळ्यांतून पाणी
प्रदक्षिणा घाली
मातीत खुपसूनी
ठेवियेला
शेजारी तयाचे
थांबती ना
घातले अश्रूंचे
दु:खाचे ते
स्नान त्या घालिती
मोठ्या कष्टे
मऊ लोण्याहून
दिली माती
पक्षी ओरडला
त्याचा शब्द
पहावया आली
केविलवाणी
गेले हो पक्षिणी
फोडी टाहो
पडू दिले उणे
सारे दिले
दिले त्याला घास
मऊ मऊ
माऊली तू अशी
होई फार”
वरी डहाळीवर
आरडून
लोटिली मी हाते
भरल्या नेत्री
कर्तव्य ते मोठे
अश्रुपूर
झालो आम्ही दूर
तैशी खाली
प्रेमळ पक्षिणी
माझ्या आले
पिलास पक्षिणी
चोच राही
शेवटला घास
शेवटल्या बोला
गेली ती माउली
माझा शोके ऊर
गेली ती पक्षीण
करित आर्तस्वर
बळे शोकपूर
आलो हो निघून
आईस म्हणालो
माझे गेले आज
दहा दिन त्याचे
आसवी भिजवीन
मोग-याजवळ
तेथे मी रडेन
आई म्हणे, “वेड्या,
कर्तव्य तू केले
पाखराला रोग
सुतक कशाला
मोग-याला तुझ्या
त्यात ते बसेल
तुम्हांला बघेल
सुगंध अर्पील
जा ये हातपाय
नको करु कष्ट
जेवायचे झाले
श्रमलासी फार
आईचे बोलणे
माझी मी धुतले
हातपाय माझे
जेवाया बैसलो
पोटामध्ये एक
भरोनीया येई
घास नेता वर
पिला जणू दिला
बोले जणू
पुन्हा डहाळीवर
फुटू पाहे
उडूनिया दूर
गेली गेली
आम्ही आवरुन
घराप्रती
“शिवू नको मज
पाखरु ते
सुतक धरीन
जागा त्याची
रोज मी जाईन
दोन्ही वेळा”
सुतक कसले
ये घरात
नव्हता कसला झाला
तरी त्याचे
फुले जी येतील
येऊनिया
प्रेमाला देईल
गोड गोड
धुवून ते नीट
आता मनी
घेई घास चार
पंढरी तू”
ते तदा ऐकिले
हातपाय
धुवुन मी आलो
खिन्न मनी
घासही न जाई
अंतरंग
तोंडाच्या जवळ
वरुन ते जळ
खाऊन बळेच
सदगदीत झालो
काही दिन चैन
पुढेपुढे त्रास
शोकापूर गेला
खेळात बुडाली
संसारसागरी
करी चमत्कृती
आज तो प्रसंग
लिहून काढला
लहानपणीचे
आहे का अजून
का झाले पाषाण
जगी वावरुन
सोनियाचा घडा
ठेवावा भरुन
सत्स्मृतींची सुधा
प्राशावी पाजावी
गोड आठवणी!
आज नाही साचा
करी माझे मन
प्रेमाने भरलेले
जीवनात माझ्या
आणावी निर्मळा,
प्रेम मानवांना
प्रेम सर्व प्राण्यां
प्रेम देऊ दे गे
पाषाण मृत्कणां
सर्वत्र पाहू दे
वर्षु दे सत्प्रेमा
घळघळे
थोडेसे मी गेलो
पुन:पुन्हा
पडेना जीवास
ओसरला
आठवण गेली
वृत्ती पुन्हा
संस्मृती विस्मृती
अभिनव
पुन्हा आठवला
भरल्या मने
प्रेमळ मन्मन
जैसे तैसे?
भावनाविहीन
इतुकी वर्षे?
मानवी जीवन
सतस्मृतींनी
भरुन ठेवावी
स्नेह्यांसख्यां
लहानपणीचा
राहिलो मी
पुन्हा आज ओले
करी पुन्हा
पुन्हा प्रेमकळा
आठवणी!
प्रेम पाखरांना
देऊ दे गे
झाडा माडा तृणा
देऊ दे गे
मला माझा आत्मा
निरंतर


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२६

मृत्युमित्र

( कोलेरिज कवीने एका अर्भकाच्या मृत्युप्रसंगी चारच ओळींचा श्लोक लिहिला, त्याचा अनुवाद.)

अद्याप पातकाने। नाहीच स्पर्शिलेली
अद्याप दु:खदैन्ये। नाहीच भाजिलेली
तो येइ मृत्युमित्र। कळि गोड ही खुडीत
फुलली न पूर्ण तोची। देवासमीप नेत
‘देवासमीप आता। कलिके फुले सुखाने
येथे किडी न खाती’। मृत्यू वदे मुखाने


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर १९२८

शांति कोण आणते?

(जगात मोठमोठ्या लढाया होताता. शेवटी तह होतात. शांती येते. परंतु हे तह, ही शांति कोण घडवून आणते? सतीचे अश्रू व संतांची प्रार्थना. एका इंग्रची कवितेच्या आधारे.)

शस्त्रास्त्रांनी सुटती न कधी प्रश्न ते जीवनाचे
ना केव्हाही मिटतिल लढे संगराने रणाचे
शांती येते भुवनि न कधी बाँबतोफादिकांनी
अर्की निर्मी अमृतरस हे ऐकिले काय कोणी?।।

युद्धी जाई पति मरुनिया होइ पत्नी अनाथा
बाळा घेई जवळि रडते फोडूनी स्वीय माथा
शोकावेगे अगतिक अशी सोडिते अश्रुधार
त्या अश्रूंनी सकल जगती शांतिचा येइ पूर।।

“येवो देवा! सकल भुवनी प्रेम, दावी सुपंथ
मद्वंधना, सतत चुकती, तू क्षमा मूर्तिमंत”
ऐशी अंत:करणि करि जी प्रार्थना नित्य संत
आणी तीच प्रशमुनि रणे शांततेचा वसंत।।

जे कारुण्ये कढत कढत श्वास तो संत सोडी
त्यांच्यामध्ये अभिनव असे तेच त्याला न जोडी;
धर्मग्रंथांमधिल सगळे सार ते मूर्तिमंत
सत्यश्रू तो उभय मिळुनी होतसे आपदंत।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

गायीची करुण कहाणी

रवि मावळला, निशा पातली, शांत दिसे हे जग
संपुन कामाची भगभग
तमे हळुहळु पहा पसरिले पट काळेसावळे
त्यात त्रिभुवन गुरफटविले
गगनी लुकलुकती तारका
अवलोकनास सुखकारका
न परी अंधकार-हारिका
चांदोबा बालकानंदकर आज दिसेना वरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

“वियेल आजी गाय आपुली, बाबा! सोडू नका
कोणी लाविल तिजला ढका
भरलेले गोजिचे दिवस तिज पाडस होइल नवे
आम्ही खेळू मग त्यासवे
गोजी दूध बहुत देइल
खर्वस, आई! तू करिशिल
आम्हां नाही ना म्हणशिल
गंमत होइशल मोठीच करु मजा अता लौकरी”
प्रभु तव कठोर करणी खरी।।

बाप म्हणे निज मुलांस “मजला विचार करणे पडे
गोजिस उपवास घरी घडे
दोन चार दिन जातिल अजुनी चिंता काहि न करा
देवा हृदयामाजी स्मरा
जाइल जर गाय फिरावया
तृण तिज मिळेल ते खावया
काडी एक न घरि द्यावया”
ऐसे बोलुन विचारपूर्वक दावे करि तो दुरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

मंद मंद पाउले टाकिते धेनु सुखाने चरे
पोटी गर्भ वाटले फिरे
प्रसवसमय ये जवळ तिचा मग तृण खाणे संपले
पोटी कळा, अंग तापले
पुढती तदगति ती खुंटली
तेथे गरिब गाय थबकली
पथ गाडिया असे पदतळी
विचार तो न, प्रसववेदना तिजला कष्ट करी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

दहा वाजुनी गेले होते रात्रीचा समय तो
अधिकचि अंधकार दाटतो
त्या मार्गाने गाडी जाई वेळ तिची ती असे
परि ते धेनुमानसी नसे
पुढचे कोणाला कळतसे
मी मी म्हणणारा चुकतसे
ही तर गाय बिचारी असे
या मार्गाने जाइल गाडी विचार न तदंतरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

रागाने फणफणे भगभगे गाडी येई जवे
येणे जाहिर करि निजरवे
उशीर झाला जणु जायाला बेफामपणा दिसे
स्वैरिणि धावपळ करीतसे
‘मार्गातून दूर हो सरा
जरि परिसाल न होइल चुरा
जावे लागे मग यमपुरा’
प्रचंड ऐसा घोष करित ये, घसा न बसतो परी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

हाकेवरती गाडी आली शब्द तिचा ऐकला
धेनुस टाकवे न पाउला
सर्व गर्भ बाहेर न आला प्रसवसमयवेदना
होत्या होत तिला दारुणा
जो जो निकट गाडि येतसे
तो तो चित्त तिचे उलतसे
बळ हलण्यास जागचे नसे
मरणाचा अति दु:खद आला विचार धेन्वंतरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

मृत्युभयाने धेना दचकली, खचली, थरके मन
मानस मृदुल निघे पोळून
बहुतेक तिचा गर्भ येत चो बाहेरी भितिने
तो तिज गाठिलेच गाडिने
विलंब पळभर तेथे नसे
करुणा दया न काही वसे
झरझर गाडी ती जातसे
जसा विजेया लोळ कोसळे गदारोळ ती करी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

दीन गायिने मरणकाळचा हंबरडा फोडिला
गगनी विलयाला पावला
जवळ न कोणी करुणासागर म्हणती परमेश्वर
परि ते कठिण तदीयांतर
अंग च्छिन्नभिन्न जाहले
चेंदुन जाइ वत्स कोवळे
तेथे रक्त-तळे तुंबले
क्रूर गाडिने बळी घेतला घेइ असे कितितरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

वज्रालाही पत्थरासही पाझर फुटते तदा
पाहुन धेनूची आपदा
प्रात:काळी करुण दृश्य ते पाहुन पुलकित जन
भरती पाण्याने लोचन
हळहळताती नारीनर
करिती गमन मग घरोघर
वदती किती एक परस्पर
सुखदु:खाच्या द्वंद्वामधुनी सुटली ही लौकरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

केविलवाणी करुण कहाणी धन्यास जेव्हा कळे
मानस त्याचे शोके जळे
म्हणे मनी “निज बाळाचे नच हितवच मी ऐकिले
कटु हे फळ मज देवे दिले”
येती अश्रू डोळ्यांतुन
स्फुंदस्फुंदत बाळकगण
घरात रडती नारीजन
असे कोण तारिता, मारणे त्याच्या चित्ती जरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर,१९२८

जीवनमित्रास!

(मरण ज्याच्या जवळ आले आहे, परंतु जो जगू इच्छित आहे, असा एक तरुण आपल्या जीवनास उद्देशून म्हणतो. इंग्रजीत अशी एक लहान कविता मी वाचली होती. ती कल्पना मनात येउन ही मी मराठीत लिहिली आहे.)

“चिरमित्र सखा सहोदर
मम तू मित्र उदार सुंदर
सहसा निघतोस सोडुनी
मम माया सगळीच तोडुनी।।

वदु काय कसे कळेच ना
वच कंठातुन ते निघेच ना
सगळे स्वचरित्र आठवे
हृदयी शोक अपार साठवे।।

सदया सखया! मनोहरा!
वद केवी उघडू मदंतरा
मज सोडुन ना गड्या निघे
मम आशा मम हेता तू बघे।।

किति येता विचार मोहना!
प्रिय मित्रा मम गोड जीवना
सखया! मज एक ठाउक
घडली भेट तुझी, न आणिक।।

जमली तव नित्य संगती
परि केव्हा कधि वा किमर्थ ती
न कळे न वळे मला लव
सगळे त्या प्रभुचेच लाघव।।

धरिली तव फार आवडी
किति माझी जमली तुझी गडी
दिनरात्र सदैव सन्निधी
तुझी माझी नव्हती तुटी कधी।।

हसलो रडलो कितीकदा
परि देशी मज धीर तू सदा
सुखदु:खरसी सखा खरा
मज देशी न कधीहि अंतरा।।

रडवीत अनंत आपदा
परि तू मन्निकटी उभा सदा
पुशिशी स्वकरे मदश्रुते
प्रियबंधो किति केवि वर्ण ते।।

सखया! सकला मदंतर
स्थिति तू जाणिशि जेवि ईश्वर
सदसत् मम जे तुजप्रती
कळलेले तुज सांगु मी किती।।

विहरून अभिन्न आपण
भुवनी जो मिळाला कधी कण
कटु गोड तसाच चाखिला
न दुजा भाव मनात राखिला।।

बघता तरि तू अमूर्तसा
हृदयी राहुन निर्मिशी रसा
तव रूप न देखिले जरी़
तव तो वास सदा मदंतरी।।

नयने नयनांत पाहणे
तुज बाहेर तसे विलोकणे
वरिशी मशि एकरूपता
असशी व्यापुन पूर्ण हृतस्थिता।।

कधि शुभ्र सुरेख चांगले
कधि काळे तुज रंग मी दिले
सजवीत तुला जसे सुचे
नटशी तूही तसा, तुला रुचे।।

न कधी तुज रुष्ट देखिले
किति तू प्रेम मला सदा दिले
चढशी पडशी बरोबर
बसशी वा पळशी भराभर।।

प्रगती अथवा अधोगती
त्यजिली तू न मदीय संगती
गगनी चढवूनिया वरी
तुज मी दाखविली पुन्हा दरी।।

कधि वैभवता तुला दिली
कधि कष्टस्थिति तीहि दाविली
तुज ना कुरकूर माहिती
तव निष्ठा तरि वर्णु मी किती।।

कधि रम्य विलास मांडिले
झणि सारे परि ते झुगारिले
वदशी परि एक शब्द ना
करु मित्रा तव केवि वर्णना।।

मम बाल्य तसेच यौवन
बघुनी जाशिल काय सोडुन
न मदीय विकास जोवरी
सखया तू न वियोग आदरी।।

मज सोडुन घोर या तमी
नच जाई, वरती चढेन मी
तुजला नटवीन मी बघ
पसरीन त्रिजगात सौरभ।।

घसरेन न मी अत:पर
मम कर्तृत्व दिसेल सुंदर
धवलोज्वल कांति देइन
तुजला जाउ नकोच सोडुन।।

पुरवीन गड्या तुझे लळे
पिकवीतो बघ मुक्तिचे मळे
बघ हे दिसती मुके कळे
न फुलावे वद का? तुला कळे।।

कसुनी खपुनी किती बरे
बघ केली मृदु शुद्ध भूमि रे
झणि येइल खास पाउस
सखया जाइ न तू, न रे रुस।।

जरि मी फिरलो इतस्तता
क्षण मी ना दवडीन रे अता
घडली जरि हातुनी अघे
मज कंटाळुन जाइ ना, बघे।।

करितो अध- मार्जनाप्रती
सखया! नित्य करीन सत्कृती
अजिपासुन नूतना दिशा
मज लागे, मग सोडिशी कसा?।।

अपुले रमणीय गोड ते
स्मरणीय स्मर तू प्रसंगी ते
भरसागरि तू न सोडिले
दिसते तीर न सो, ना भले।।

किति रे अनुरक्त आपण
कधि झालो न वियुक्त रे क्षण
अशनी शयनी जिथे तिथे
अविभक्त, स्मर, अंतरंगि ते।।

जरि वृंत गळून जातसे
जगती या जगणे फुले कसे?
जरि नीर समग्र आटले
तरि ते नीरज केवि रे फुले?।।

रुसुनी जरि जाइ अंबर
च्युत नक्षत्रतीहि सुंदर
तरुला जरु मळ ना धरी
तरि कैसे फळफूल ते वरी?।।

खुडिता स्पृहणीय अंकुरा
मिळते ते न कणीस ना तुरा
जरि निर्झर बंद होइल
तरि वापी सुकुनीच जाईल।।

करिता दुरि जीवनाश्रया
मग पावे झणि वस्तु ती लया
न तुझ्यावर का विसंबून?
करि, मित्रा! न कठोर रे मन।।

तुज निष्ठुरता न शोभते
तवठायी मम दृष्टि लोभते
तुजवीण जगी न मी उरे
मज आधार तुझाच एक रे।।

जगी होइन नीट चांगला
मग सारे म्हणतील हा भला
जगतास सुखास देइन
न जगाला मुळि भार होइन।।

मम गोड फुलेल जीवन
मग तदगंध सुटेल पावन
जगता वितरीन मी रस
जगता या नटवीन नीरस।।

फुलवी सुमनांस भास्कर
नटवी जीववि सृष्टि सुंदर
फुलवीन तशी जनांतरे
मनि माझ्या किति ये असे बरे।।

किति खेळवितो मनी अशा
मधु आशा, परि मारिशी कशा?
मम हेतु अपूर्ण राहती
किति वाटे मनि खेद ना मिति।।

न तुला दिसली सरस्वती
मम संगे, न तशी रमा सती
दिसली न उमाहि चिन्मया
म्हणुनी काय अधीर जावया?।।

मजला जगि मित्र ना कुणी
मज गेले सगळेच सोडुनी
मजला तव आस होति रे
परि तूहि त्यजिशी कसा बरे?।।

गळले सगळे मनोरथ
मम आशा सगळ्या पदच्युत
पुरवी न जगात एकही
मम सद्धेतु कठोर देवहि।।

सगळा मम धीर मावळे
किति नेत्रांतुन नीर हे गळे
दिधले मम सर्व मी तुला
परि जाशी अजि सोडुनी मला।।

जगि जन्म मदीय जाहला
तव मी स्नेह तदैव जोडला
तुज मी दिनरात्र पूजिले
परि माते अजि तूच टाकिले।।

रडण्यास्तव मात्र जन्मलो
जगता केवळ भार जाहलो
मज सोडुन जाशि, जीवना!
किति जाळी, बघ, शोक मन्मना।।

मज सोडु नयेच ती, असे
जरि वाटे बहु, ते घडे कसे?
मजपासुन जाशि जै दुरी
पहुडोन क्षितिला हतापरी।।

जगतास समीप ओढले
परि माते जगतेच सोडिले
अपवाद तुझा तरी कसा?
नशिबाता मम खेळ हा असा।।

करु मी तरि काय हाय रे!
मम उदध्वस्त समस्त हाय रे
पुरला मम हेतु एक ना
मज जाशी रडवून, जीवना!।।

किति रे हुरहूर मानसी
हृदयी क्रंदन धीर ना मशी
मम स्वप्न समस्त संपले
जणु शंपाहत चित्त कंपले”।।

विनवून सुदीन जाहलो
सखयाच्या किति कंठि झोंबलो
करुणा नुपजे मनामधी
मम हेलावुन ये हृदंबुधी।।

फिरुनी वदलो सगदगद
“मम मित्रा! धरितो तुझे पद”
परु तो न बघेहि निष्ठुर
अति झाला गमनार्थ आतूर।।

वच ऐक सख्या मदंतिम
परम प्रेम तुझ्यावरी मम
न मज, त्यज मत्सवे रहा
बघशी मन्मुखही न रे अहा।।

सकल प्रियबंध लोपले
तव माझ्यावर नेत्र कोपले
तुटते अजि भावबंधन
गळते मदहृदयावलंबन।।

सखया! जरि जाशि जा परी
वदतो एकच, ठेव अंतरी
तुजला पकडीन मी पुन्हा
करुनी जाशि मदीय तू गुन्हा।।

किति देख अनंत काळ हा
तुजला ओढिन मी पहा पहा
जगता वितरीन मी सुख
मग आझे करिशील कौतुक।।

करुनी जगदापदा दुरी
भरु सारी धरणी सुखस्वरी
वितरुन मुदा शुभा जनी
कलहद्वेष समूळ मारुनी।।

जगतात समस्त बंधुसे
बघ, नांदू अम्ही सर्व सौरसे
सकळा समता स्वतंत्रता
करु भूमीवर स्वर्ग नांदता।।

करुनी निज-कार्यपूर्णता
तुजलाही वितरीन धन्यता
तरि जाइ, विलंब ना करी
स्थिर मी शांत विकंप अंतरी।।

मज सोडिशि तू, न मी तुला
जननी सोडुन जातसे मुला
न फिकीर, पुन:पुन्हा परी
तुज भेटेन रवींदु जो वरी।।

शतवारहि जन्म घेइन
मम हेतूप्रति पूर्ण पाहिन
तुज खेचिन मी पुन:पुन्हा
दमवी कोण बघूच ये कुणा।।

तरि ये, मम रामराम घे
हृदयी स्नेह धरून तू निघे
परतून तुलो विलोकिन
अविलंबे, हृदयासि लाविन।।

जरि जाशि विशंक जा परी
वितरी हा मज आशि अंतरी
तुज शेवटचेच मागणे
करि ते पूर्ण गड्या न ना म्हणे।।

‘घृतिचा न झरा सुको, झरो;
मरताही तम ना मनि शिरो’
मज दे सखया असा वर
मग जाई तुज जायचे जर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

कसे तरी मग जग दिसते?

नसती जगी या जरी मुले
नसती जगी या जरी फुले
नसते अंबरि वरि तारे
नसते गाणारे वारे
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

जरी जगती या जल नसते
रविचे तेज जरी नसते
नसते जरि ते तरुवेल
नतसे दिनरजनी- खेळ
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

नसती जरि ही वसुंधरा
धनधान्यवती मनोहरा
विहंगम जरी हो नसते
गाय बैल हे जरि नसते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

नसत्या प्रेमळ जरी माता
प्रेमसुधेच्या त्या सरिता
परोपकारी जन नसते
परदु:खे यन्मन जळते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

कृतज्ञता जरि ती नसती
प्रेमबंधुता जरि नसती
अश्रु जगी या जरि नसते
हास्य जगी या जरि नसते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

सुंदर सकळहि या वस्तु
मधुर मनोहर या वस्तु
जगणे म्हणुनी धरेवर
सह्य होतसे खरोखर
हे वैभव हे सुख नसते।
कसे तरी मग जग दिसते।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२७

प्रेमाचे गाणे

(भूतकाळ भविष्यकाळाला उद्देशून गाणे म्हणतो)

बा नीज, सख्या! नीज गड्या लडिवाळा!
राजसा परम वेल्हाळा।।

या सकळ जगी उठले विषमय वारे
द्वेषाचे उडत फवारे
ही अखिल मही सूडबुद्धिने भरली
हृदयेच जणु कुणा नुरली
जगि झाला रे सुळसुळाट कामाचा
क्रोधाचा मात्सर्याचा
परि भिऊ नको तू, बाळ!
धरि प्रेमवृत्ति तू अढळ
प्रेम हेच तव दिव्य बळ
या प्रेमाच्या सामर्थ्ये जगताला
देशील वळण नव, बाळा।। बा नीज....।।

सत्प्रेमाची आहे अदभुत शक्ती
प्रेम हीच खरि चिच्छक्ती
या प्रेमाचे वर्णन कोण करील
तोकडे शब्द पडतील
तू प्रेमाचा सागर हृदयी जमवी
सुकलेले जग हे फुलवी
शमवाया विश्वद्वेष
ये घेउन तू प्रेमास
भरपूर वाटि जगतास
तू देशील प्रेम जरी जगताला
बदलशिल आजच्या काळा।। बा नीज....।।

ना जगति कधी प्रेम दिल्याने सरते
हे प्रेम कधी ना मरते
ते दिधल्याने वाढतसे, जागविते
परहृदयि सुप्त जे असते
परहृदयाचा विकास करिते प्रेम
प्रेम एक जगदभिराम
बाळ तू नजोनी आज
प्रेमाने हृदयी साज
हो सज्ज पुढे किति काज
तू नीज अता येइल तव कृतिवेला
करि तेव्हा प्रेम-सुकाळा।। बा नीज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, डिसेंबर १९३०

आत्मा ओत रे ओत

आत्मा ओत रे ओत
निर्मावा दिव्य तेजाचा झोत।। आत्मा....।।

फुलवी रे फुलवी
सुकला फुलवी
हलवी रे हसवी
विद्या हसवी
राष्ट्रात पेटव निर्मळ ज्योत।। आत्मा....।।

होऊ दे होऊ हो
राष्ट्रविकास
होऊ दे होऊ हो
शास्त्रविकास
वाहु दे शतमुख संस्कृतिस्त्रोत।। आत्मा....।।

प्रकट करी रे
अंतरिचा देव
प्रकट करी रे
अंतरिचा भाव
असशी तू दिव्य रे वतनाचा खोत।। आत्मा....।।

परमात्म्याचा
पुत्र तू अभिनव
बळवंताचा
पुत्र तू अभिनव
निर्भय असशी तू केसरिपोत।। आत्मा....।।

स्वातंत्र्याचे
मंदिर सुंदर
शास्त्रकलांचे
कळस मनोहर
दैदीप्यमान त्याला झळकोत।। आत्मा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, फेब्रुवारी