प्रेमाचें अव्दैत

होतीस तू त्या दिनी बैसली
         जनानी तुझ्या पायचाकीवरी;
तुझे दण्ड कवटाळुनी मांसल
        खडा मी तुझ्या मागुती पिनवरी!

समोरून मागून सोसाटती
       किती धूरचाक्या तशा फटफटी!
बाजूस गाड्या नि टांगे परी
       तुझ्या हुकमतीला न त्यांची क्षिती!

चकर्ड्यातल्या त्या तुझ्या रुस्तुमी
       भुर्भूरता वायुमाजी बटा,
तयांचा अहा, उग्र कामीनिया
      किती हुंगिला चाखिला चोरटा!

चतुर्शिंङिगच्या त्या उतारावरी
        यदा पावले खूप त्वा मारिली
तदा नेत्र झाकून किञ्चाललो
         तुझ्या स्कन्धि अन् मान म्या टाकिली!

मवाली अहा, गुण्ड वाटेमधे
        किती रोखुनी अङगुल्या दाविती!
तुझे बेडरी धैर्य आलोकुनि
        परी वाकुनी खालती पाहती!

'हटा बाजूला!' तू असे जेधवा
        कुणा भाग्यवन्तास आज्ञापिसी,
ठिकाणी तदा त्याचिया मी न का
       अशी वाटली खंत मन्मानसी!

न मज्नू न लैला अशी हिण्डली!
        बटाऊ न वा मोहनेच्या सवे!
मुषाफीर इष्कामधे रगडले
       असे केधवाही न मद्यासवे!

'हुकम्‌डर' स्वरे तो कुणी ओरडे,
       समाधीतुनी तीव्र ये जागृती!
उभारून बाहू वरी तोच अन्
       पुढे पातली पोलिसी आकृती!

खडी पायचाकी करा या क्षणी
         न गाडीस बत्ती कुठे चालला?
काळोख जाला कधींचा बघा,
        निशेमाजि का कोठल्या झिङ्‌गला!

नसे माहिती का तरी कायदा
         न दोघांस पर्वानगी बैसण्या!
पुढे आणखी तो म्हणे काहिंसे
         नसे योग्य ते या स्थळी सांगण्या!

तदा बोललो त्यास मी, तो नसे
         जरी पायचाकीस या कन्दिल;
पहा हा परि आमुच्या अन्तरी
         कसा पेटला प्रीतिचा स्थणिल!

अरे, प्रीतिच्या या प्रकाशापुढे
          तुझ्या बिझ्‌लिच्या लाख बत्त्या फिक्या!
कशाचे दिवे घेउनी बैससि
          कुठे नौबती अन् कुठे ढोलक्या!

जरी आकृती दोन या पाहसी,
        असू एक आम्ही तरी अन्तरी!
न ठावा कसा प्रीतिचा कायदा
        कुड्या वेगळ्या एक आत्मा तरी!

हसे दुष्ट तो खदखदा अन् म्हणे
       करा गोष्टि या राव चौकीवरी!
जमाखर्च हा प्रीतिचा ऐकवा
        जमादार येईल त्याते तरी!

किती आर्जवे साङ्गुनी पाहिले
         जिवाचे न अद्वैत त्याते कळे,
असावेत ठावे कसे फत्तरा
          अहा, प्रीतिचे कायदे कोवळे?

तदा चामचञ्चीतुनी काढुनी
          तयाच्या करी ठेविले काहिंसे!
धरोनी करी पायचाकी तशी
         घरी पातलो एकदांचे कसे!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा