" नेमाडपंथ "


ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या "कोसला" या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच…! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले."

तर हिंदू कादंबरी बाबत बोलायचे झाले तर कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृती' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापू  टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ'. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, मिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे.

प्राध्यापक ते सडेतोड समीक्षक या त्यांच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप...

* प्रा. डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे
* जळगाव जिल्ह्यात सांगवीत १९३८ मध्ये जन्म
* पुणे विद्यापीठातून बी.ए. (१९६१)
* मुंबई विद्यापीठातून एम.ए. (१९६४)
* १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचं अध्यापन
* गोवा विद्यापीठात इंग्रजीचे विभागप्रमुख
* तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त

साहित्यसंपदा-

* छंद, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व या नियतकालिकांमधून भालचंद्र नेमाडेंनी कविता लिहिल्या.
* १९६३ मध्ये, उमेदवारीच्या काळात 'कोसला' कादंबरी प्रकाशित... या कादंबरीनं कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडले...
* 'कोसला'नंतर तब्बल एका तपानं, समकालीन मराठी समाजावर भाष्य करणाऱ्या 'बिढार', 'जरीला', 'झूल', 'हूल' या कादंबऱ्यांनी मराठी रसिक वाचकांना वेगळी अनुभूती दिली.
* 'मेलडी' आणि 'देखणी' हे काव्यसंग्रह प्रकाशित... विंदा करंदीकरांच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या कविता... व्यवहारी, अमानुष जगातल्या वास्तवावर उपरोधिक भाष्य...
* मराठी समीक्षेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं श्रेय नेमाडेंना जातं... 'साहित्याची भाषा' हे भाषाविज्ञानपर पुस्तक आणि 'टीकास्वयंवर' हा समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित. 
* २०१० मध्ये 'हिंदू' या महाकादंबरीचे प्रकाशन.  

पुरस्कार- 

* "साहित्य अकादमी पुरस्कार - १९९०"
* "पद्मश्री पुरस्कार"' - २०११"
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "जनस्थान पुरस्कार" व नुकताच जाहीर झालेला "ज्ञानपीठ पुरस्कर"… 


आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कराने अवघे मराठी जन आनंदून गेले आहे, आज पुन्हा एकदा मराठी साहित्यक्षेत्रात एक मनाचा तुरा खोवला आहे.  आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढील आयुष्यास अनेक शुभेच्छा…!!

-
अभिनय महाडिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा