जोगवा(कवितासंग्रह) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जोगवा(कवितासंग्रह) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,
भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली
भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,
गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,
भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे
शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

माळ

हिरव्या माळापुढे निळा गिरि
गिरवित काळी वळणे काही
छप्पर झाले लाल अधिकच
धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर
काठावरति ढग थोडासा
थोडासा पण तीच हेळणा
पिवळा झाला फ़क्त कवडसा

हिरव्या माळापुढे निळा गिरि
मावत नाही इतुका फ़िक्कट
अबरळ्त चाललि पुढेच टिटवी
माळ ओसरे मागे चौपट


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

गंध

हिरव्याशा गवतात
हळदिवी फुलें,
हलकेंच केसरात
दूध भरूं आले.

उभ्या उभ्या शेतांमधें
सर कोसळली,
केवड्याची सोनफडा
गंधें ओथंबली.

बकुळीच्या आसपास
गंधवती माती,
उस्कटून रानपक्षी
काही शोधिताती.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

जोगवा

गंध