दिवेलागण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिवेलागण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे
उभा तू उभा तू असा पाठ मोरा
किती जन्म गेले त्वचेचे तमाला
तरी बाहुली रे जपे अश्रु खारा

कहाणी मनाची तुझा शब्द पाळी
मुक्याने वहातो तमी देहमेणा
जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी
नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा

कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबर्‍याशी दिवा रात रात
धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि
किती ऊर ठेवू व्यथा गात गात


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
- १०-५-५९

अश्रु दे तूं

लाविशी तूं कां खुळ्याने येथ वाती?
जा तुझीं तूं लाव दारें; कां उभी तूं?
जागती या अजगराच्या येथ राती;
पालवाया ऊर माझा कां उभी तूं?
तेवत्या डोळ्यांतल्या या बाहुल्यांना
एक साधा अन खरासा अश्रु दें तूं!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

पूर

तुझे गात्र गात्र:
पावसाळी रात्र;
सारे. क्षेत्र ऐसें
झालें पूरपात्र

माझे दोन्ही डोळे:
गाव झोंपलेले;
मला नकळत
पुरांत बुडाले

हृदयाचें बेट:
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

अर्थ

हा भार हा शिणगार
हा उत्सव ही वाटचाल
या सगळ्यावर पसरलेल
अफवेसारख आभाळ

याचा अर्थ सांगण्यासाठी
कुठल्या तरी झाडावर
बसलेला असेल का
एखादा पक्षी उत्सुक-पर? 


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

स्वगत

एका रिमझिम गावी
भरुन आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरुन तिथे
जातां आलं पाहिजे

चालून ज़ाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणें न जाणें तरी कुणाच्या हाती?


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

दिवेलागण

१. ये रे घना
२. नुक्ता प्रारंभ
३. व्यथा गात गात
४. दिशा…व्योम…तारे
५. अर्थ
६. अनुप्रासलो मरणे
७. मीं श्वास पेरिले होते
८. मन
९. शिशीरामधल्या
१०. व्रत
११. राजा
१२. नादली दुरांत घंटा
१३. चंद्र
१४. अंगाई
१५. एक इच्छा
१६. अश्रु दे तुं
१७. शुभ्र रुमाल इवला
१८.सज्जन
१९. वाट
२०. एक
२१. एक पक्षी
२२. ह्ट्ट
२३. उंट
२४. पाणी
२५. गाणें
२६. उत्सव
२७. नातें
२८. छोटे
२९. तू नको
३०. आम्ही पुण्यवंत
३१. पूजा
३२. अहेवपण
३३. विमानउतुंग
३४. देहत्व
३५. वेचुं ये गोवऱ्या
३६. विजेच्या वितींनी
३७. दुभंगता ऊर
३८. मूळ भिंतिंचे
३९. जन्म नि मृत्यू
४०. कधी तो कधी मी
४१. पूर
४२. केवळ वास
४३. नुस्ती
४४. पाषाण
४५. मायदुधउष्ठे ओठ
४६. पान पडतांच
४७. ऊर भरू येतां खोल
४८. घर
४९. मन
५०. झरा
५१. कडेलोट
५२. पावरी
५३. शांताकार
५४. मी आणी मी  
५५. चंद्र : सोहळा
५६. चंद्र : व्यथा
५७. नुस्तीं नुस्तीं रहातात
५८. सूर
५९. स्वगत
६०. जुनें गाणें
६१. एकाचा मृत्यु
६२. चौफेर बंद

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना


गीतकार - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 
गायक - आशा भोसले
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर