नक्षत्रांचें देणें लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नक्षत्रांचें देणें लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कविता

या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?

माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.
आहे तयारी?
ज्या आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून.
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत.

मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दोन मी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठेचाळतो
तरीही मी का चालतो ? तो बोलतो ना थांबतो

वाकणारया अन मला तो पाहुनिया मोडतो
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखतो

अग्निज्वालेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन अजून आहे ती खरी

कोणते पोशाख त्याचे चोरले मी भर्जरी
विकित बसलो येत हाटीं, आणि खातो भाकरी

तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो
राख होतानाही ओठी गीतगाणी ठेवितो

मैफलीला तो नि मी दोघेही जातो धावूनी
एकतो मी सूर , तो अन दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,

गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.

वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,

कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.

कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?

प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?

कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

नक्षत्रांचें देणें

१. कविता
२. सरणार्थ
३. जाग आली
४. आधार
५. मुंग्यांची रांग
६. ही दोन बकरीचिं पोरें
७. दोन पोक्त पानं
८. संध्याकाळ
९. गवत असते गार हिरवें
१०. मनमोर हिचा
११. फिरो घाणा निरंतर
१२. एक वळसा
१३. पात वाकली भारान
१४. गुच्छ फुलांचे निरिच्छ
१५. भ्रमिष्ट
१६. लुटारू
१७. टप्पोर गजरा
१८. डहाळी
१९. पेरलेल्या दाण्यादाण्यांत
२०. अर्पण करतां येतंय तुला
२१. गाडा
२२. अर्थ
२३. कसा ?
२४. खार
२५. गाणें
२६. वाफ
२७. निस्तब्ध
२८. अर्थ
२९. उदासी
३०. चाहूल
३१. विळखे
३२. गाण्याच्या वेळा
३३. क्षमा केली म्हण न
३४. असो आच इंद्रियांत
३५. कहाणी
३६. सर
३७. गर्व
३८. असा एक  … अशी एक
३९. दूर दिवा
४०. सर्व ठिकाणी
४१. निसर्गचित्र
४२. भविष्य
४३. तुटलेला कडा
४४. सर्सर सर्सरवाजे
४५. ब्रह्मार्पण
४६. भूल
४७. श्रद्धांजली
४८. पुनश्र्य
४९. कुत्रा
५०. बभ्रा
५१. विरंगुळा
५२. कुणाच्या खांद्यावर
५३. रावबाच्या लेकीवरील दोन कविता
५४. राजाराणी
५५. एकत्र गाठू तळ
५६. कृष्ण
५७. आजची तारीख
५८. थोडे चोर थोडे साव
५९. ओंजळ
६०. भुतें
६१. दिवे
६२. वळण
६३.  सर्वत्र काय ?
६४. झाड
६५. तुं
६६. नको
६७. रत्न
६८. लव लव करी पातं
६९. कुठल्या कवितेसाठी
७०. तिसराच कुणी
७१. दुःख ना आनंदही
७२. पारवे
७३. सूर्यास्त
७४. विष
७५. सांजतारा
७६. दाद द्या
७७. अंतरिक्षाचा इषारा
७८. काय मां घ्यावे
७९. कां उदासी
८०. रंग
८१. निष्प्रेम
८२. कां असे येतां
८३. सूचना
८४. मृत्यूंत कोणी हासे
८५. ऊनओल्या
८६. तुं कुणाला मी म्हणू
८७. प्रीत फिरुनी मागते
८८. नवी….जुनी
८९. लकेरताना
९०. दोन मी
९१. जाईन दूर गावा
९२. कल्लोळ अन भ्रमंती
९३. पावरी
९४. टाहो
९५. सांगेल राख माझी
९६. सप्रेम द्या

आधार

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.

ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्‍यासारखा
शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.

जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.

सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

मृत्युत कोणि हासे

मृत्युत कोणि हासे,मृत्युस कोणि हसतो
कोणि हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो

अश्रुत कोणि बुडतो,लपवित कोणि अश्रु
सोयीनुसार अपुल्या,कोणि सुरात रडतो

जनता धरी न पोटी,साक्षात् जनार्दनाला
जनतेस कोणि पोटी,पचवून हार घेतो

विजनी कुणी सुखी न् भरल्या घरात कोणि
वनवास भोगनारा, दु:खात शांत गातो

कोणि जुनेपुराने विसरे पीळधागे
कोणि तुटून पडला सगळ्याच पार जातो

कोणास मेघपंक्ति दाटून गच्च येता
लागे तहान, कोणि नाचून तृप्त होतो

कोणि दिव्याशिवाय होतो स्वत:च दीप
कोणि दिव्यवारी अन् टाकुन झेप देतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

सांगेल राख माझी

संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी गेल्यावरी जळून.

खोटी खरी दुधाची होती कशी बिजे ती,
बरसून मेघ जाता येईल 'ते' रुजून.

रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?
वेळूत संध्यावेळी येईल ते कळून.

लागे मला कशाची केव्हा कशी तहान :
चर्चा कशास? नाव काठास की अजून.

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले?
शेल्यावरी कुणाच्या असतील स्पर्श ऊन?

का ते कशास सांगू मांडून मी दुकान?
शब्दास गंध सारे असतील की जडून.

काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र
केव्हातरी पिकून गळणे नगण्य पर्ण.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा


कवी / गीतकार : आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
गायिका  : आशा भोसले
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

सप्रेम द्या निरोप

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगय्राचा पानी मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा
"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

तू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें