राम गणेश गडकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राम गणेश गडकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

राजहंस माझा निजला

हे कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला'

दुर्दैवनगाच्या शिखरी, नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें, मी उगाच सांगत नाही
जें आनंदेही रडते, दु:खांत कसें ते होई

हे कुणी कुणां सांगावे
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गावा जावें
मग ऐकावें या बोला, 'राजहंस माझा निजला"

मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्का बसला
होउनी कळस शोकाचा, भ्रम तिच्या मानसीं बसला
मग हृदय बधिरची झाले, अति दुःख तिजवी चित्ताला

ते तिच्या जिवाचें फूल
मांडीवर होत मलूल
तरि शोके पडुनी भूल
वाटतची होतें तिजला, 'राजहंस माझा निजला'

जन चार भोंवतीं जमले, मृत बाळा उचलायाला
तो काळ नाथनिधनाचा, हतभागी मना आठवला
तो प्रसंग पहिला तसला, हा दुसरा आतां असला

ते चित्र दिसे चित्ताला
हे चित्र दिसे डोळ्यांला
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां, 'राजहंस माझा निजला'

करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल
मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

हें दूध जरासा प्याला, आतासा कोठें निजला
डोळ्याला लागे डोळा, कां तोच भोवतीं जमलां?
जा, नका उठवुं वेल्हाळा, मी ओळखतें हो सकलां

तो हिराच तेव्हा नेला
हिरकणीस आता टपला
परि जिवापलिकडे याला
लपवीन, एकच मजला, राजहंस माझा निजला

कां असलें भलतें सलतें, बोलतां अमंगळ याला
छबकड्यावरुनि माझ्या या, ओवाळुनि टाकीन सकलां
घेतें मी पदराखालीं, पाहूंच नका लडिवाळा,

मी गरीब कितिही असलें
जरी कपाळ माझें फ़ूटलें
बोलणें तरी हें असलें
खपणार नाहिं हो मजला, राजहंस माझा निजला

हें असेच सांगुनि मागें, नेलात जिवाचा राजा
दाखाविलाही फिरुनी नाहीं, नाहीत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां, राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा
पाहुनी गरिब कोणाला, राजहंस माझा निजला


कवी - गोविंदाग्रज[राम गणेश गडकरी]

एखाद्याचें नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


कवी - गोविंदाग्रज

'विरामचिन्हे'

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !


कवी - गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी