लता मंगेशकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लता मंगेशकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी




गीत    -    कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
संगीत    -    वसंत प्रभू
स्वर    -    लता मंगेशकर

अनाम वीरा

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !


गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

सागरा प्राण तळमळला !

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला || ४ ||


कवी      -     स्वा. विनायक दामोदर सावरकर
संगीत   -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर      -     लता मंगेशकर,  उषा मंगेशकर,  मीना मंगेशकर
                    पं. हृदयनाथ मंगेशकर