सानेगुरुजींच्या गोष्टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सानेगुरुजींच्या गोष्टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खंडित आत्मा

वीराच्या लहानशा झोपडीत चिनी आपल्या खेळण्याशी खेळत होती. चिनीचे वय पाच वर्षांचे, केस विखुरलेले, फाटके कपडे अंगावर. तिचे तोंड मोहक होते. ते तिचे चिमणे वाटोळे लांब हात! लाकडी बाहुली, मातीची बोळकी ही तिची इस्टेट. खेळात रमली होती, बाहेर ऊन मी म्हणत होते. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. एखादी स्त्री डोक्यावर मडके घेऊन पाण्याला जाताना मधून दिसे. चिनीची आई विहिरीवर गेली होती. तेथे अपार गर्दी. झोपडीपासून अर्धा मैल तरी ती विहीर लांब होती. दरवर्षी उन्हाळयात पाण्याचा दुष्काळ असे. यावर्षी तर आधीच अवर्षण! चिनीची आई विहिरीवर दोन तास बसली तेव्हा कोठे नंबर लागला. घरी मुलीला तहान लागली होती. या मडक्यात बघे, त्या मडक्यात बघे. पाणी नाही. पुन्हा खेळात ती रमली.

इतक्यात तीचा बाप वीरा घरी आला.
''बाबा, पाणी द्या.'' ती म्हणाली.
त्याने तिला जवळ घेतले.
''अजून विहिरीवरून नाही आई आली. कोठे गेली आई?''
तिने विचारले.
''बसली असेल गप्पा मारीत. पोर तहानेने मरत आहे. तिला काय चिंता?'' बाप म्हणाला.

वीरा मोठा शौकीन प्राणी. काळा सावळा सुंदर दिसे. चाळीस वर्षाची उमर तरी तरुण वाटे. त्याचे डोळे सर्वांना आकर्षून घेत. सफेद पेहरण आणि धोतर हा त्याचा पोषाख. पायात चप्पल. त्याचा धंदा चुना तयार करण्याचा. परंतु त्याची पत्नीच ते सारे काम करी. तो मजा मारी. सिध्दाप्पा म्हणून त्याचा एक व्यापारी मित्र होता. सिध्दाप्पा श्रीमंत होता, तरुण होता. तो व्यसनात बुडाला होता. दारू, जुगार इत्यादि विलासात तो मग्न. तरीहि सिध्दाप्पा अब्रूदार मानला जाई. कारण त्याच्याजवळ लक्ष्मी होती. त्याच्या अनेक फंदात वीरा त्याला मदत करी. त्यामुळे सिध्दाप्पा त्याला पैसे पण देई. गरीब लोकात वीराचा दरारा होता. काही बरे वाईट झाले तर सिध्दाप्पा वीराला वाचविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांना वाटे.

वीराचे कुटुंब तीन माणसांचे. तो, त्याची नीलम आणि मुलगी चिनी. चिनीप्रमाणे साखरेप्रमाणेच ती मुलगी गोड होती. नीलमचे वय चौतीस एक वर्षांचे असेल. तोंड सुकलेले, डोळे खोल गेलेले. तोंडावर चिंता नि काळजी. यंत्राप्रमाणे तिचे जीवन चालले होते. चुलीवर काय असेल ते शिजत ठेऊन ती टेकडीवर जाई. चुनखडीचे दगड गोळा करून आणी. दुपारी वीराला ती जेवण वाढी. मुलीला देई. उरेल ते स्वत: खाई. नंतर भट्टी पेटवून ती पाणी आणायला जाई. सायंकाळी जेवण गोळा करायला वणवण हिंडे. अंधार पडल्यावर काटक्या कुटक्या घेऊन घरी येई. रसोयी करी. नव-याला, मुलीला जेवण देई. मग स्वत: खाई. भांडी घाशी. निजायला बारा वाजत. पुन्हा पहाटे उठे. तिची आजी, तिची आई, सा-यांना असेच काम करताना तिने पाहिले होते. आजूबाजूच्या स्त्रियांचे हेच जीवन-काम करीत मरणे हेच स्त्रियांचे जीवन अशीच तिची समजूत झाली होती. पतीसाठी नि मुलींसाठी सतत कष्ट करणारी नीलम म्हणजे करुणामूर्ती होती. चुनखडीचे दगड आणणे, भट्टीत जाळणे, बाजारात विकणे, घरची रसोयी, पाणी उदक, सारे तिलाच करावे लागे. पतीला तीच धोतरे घेऊन देई, मुलीला परकर पोलके तीच करी. स्वत:ची साडी तीच आणी. एवढे सारे करूनही पतीची मर्जी गेली तर पाठीत काठी बसे.

वीरा उद्योगहीन माणूस. ताडीचा वेडा. कोठे नाटक, तमाशा असला म्हणजे जायचा. सरकस आली, रामलीला आली तर पहिल्या रांगेत जाऊन बसेल. लोकांना आश्चर्य वाटे की याची चैन चालते तरी कशी. पत्नीच्या श्रमांतून नि अश्रूंतून ती चैन फुलत होती.

नीलम मडके घेऊन आली. वीराने पाहिले. वादळ होणार नीलमने ओळखले.

''इतका वेळ होतीस कुठे? ही पोर पाण्यासाठी मरत आहे. आणि तू विहिरीवर गप्पा मारीत बसलीस? घरात पाण्याचा टाक नाही. आम्ही मेलो तरी तुला काय पर्वा?'' तो बोलतच होता.

नीलम शांत होती. तिने चिनीला पाणी दिले. ती पोर गेली पुन्हा खेळायला. वीराला तिने जेवण वाढले. आज शेजारच्या गावात यात्रा होती. त्याच्याजवळ पैसे नव्हते. चिनीच्या अंगावर फाटके कपडे होते.

वीरा म्हणाला,
''थोडे पैसे दे. चिनीच्या अंगावर नुसत्या चिंध्या. यात्रेतून नवीन कपडे आणीन.''

''चिनीचे कपडे मी शिवीन.'' ती म्हणाली.

वीरा रागावला. इतक्यांत चिनी रडत येऊन म्हणाली.

''बाबा, मला नवीन आणा परकर पोलकं. आणाल ना?''

''ही पोर रडते आहे. दे ना चार रुपये. तुला का पोरीच्या डोळयांतील पाणी दिसत नाही?''

नीलमने चार रुपये काढून त्याला दिले. चिनी पित्याबरोबर जायला निघाली. ती रडू लागली. नीलम पतीला म्हणाली,

''घरीच रहा ना. मी चुनखडीचे दगड आणायला जात आहे.''

टोपली घेऊन नीलम गेली. आणि वीरा कोठला घरी राहयला? तोही पसार झाला. चिनी रडत होती. शेवटी बाहुलीशी खेळत बसली. आणि तेथे झोपली.

आता संध्याकाळ झाली. चिनी उठली. पुन्हा खेळू लागली. आईही घरी आली. मुलीला एकटी खेळताना पाहून मातेचे हृदय भरून आले. मुलीजवळ खेळांतली जातुली होती. चिनी त्या जातुलीला फिरवीत होती. आणि ओव्या म्हणत होती,
''स्त्रियांचा हा जन्म
नको देऊ सख्या हरी
रात्रंदिवस जन्मभर
परक्याची ताबेदारी॥
स्त्रियांचा हा जन्म
देव घालून चूकला
रात्रंदिवस जन्मभर
बैल घाण्याला जुंपला॥''

चिनीनें कोठे ऐकल्या होत्या त्या ओव्या? त्या ओव्या नीलमच दळताना म्हणत असेल. शेजारच्या बायका म्हणत असतील. त्या ओव्या ऐकत नीलम खिडकीजवळ उभी होती. तिला आपले सारे आयुष्य त्या ओव्यांत दिसत होते. तिची हृदयवीणा वाजू लागली. नाना विचारांचे ध्वनी ऐकू येऊ लागले. फुकट, स्त्रियांचे जीवन फुकट, असे तिचे मन म्हणत होते. आणि माझी ही गोड चिनी! तिच्या जीवनाची हीच दशा व्हायची. याच वेदना, हेच कष्ट तिलाही पुढे भोगणे प्राप्त.

ती निरोशने म्हणाली, ''हरे राम! आपण कशाला जन्मलो? वीराच्या हातची रोज मारझोड!''

ती एकच प्रार्थना करी, ''प्रभो, मी ज्या यातना भोगीत आहे त्या चिनीला भोगाव्या न लागोत.''
नीलमने चुलीवर काही शिजत ठेवले. ती दारात उभी होती. आपण आणखी कोठेतरी थोडे पैसे ठेवल्याची तिला आठवण झाली. सापडली पुरचंडी. थोडे पैसे घेऊन ती बाजारात गेली. तिने स्वत:ला एक साडी आणली. ती घरी आली. चिनीचे फाटके कपडे शिवित बसली. चिनी बापाची वाट पहात होती. तो नवीन कपडे आणणार होता. परंतु वाट पाहून ती झोपली.

मध्यरात्र होत आली. नीलम वीराची वाट पहात होती. दारांतून दूरवर पाही. शेवटी अंधारात झुकांडया खात कोणी येताना तिला दिसले. वीराच तो. नीलमने जेवायला वाढले. वीराने डोक्यावरचा रुमाल फेकला. त्याचे लक्ष एकदम साडीकडे गेले. ती हातात घेऊन म्हणाला,

''केव्हा आणलीस?''
'आजच.''
''किती पैसे पडले?''
'चार रुपये.''
वीराच्या डोळयांत जंगली क्रूरपणा चढला.

''तो पलीकडचा हॉटेलवाला पैसे दिल्याशिवाय मला सोडीत नव्हता. आणि तू नवीन साडी आणतेस! तुझ्याजवळ पैसे आहेत. लपवून ठेवतेस,'' असे बोलून त्याने तिच्या फाडकन तोंडात मारली.

वीराच्या तोंडाला घाण येत होती. चार रुपये दारूत उडवून तो आला होता. त्याची तार आणखी चढत होती.

''मुसमुसु नकोस. ओरडू नकोस,'' असे म्हणून कोप-यातले लाकूड त्याने उचलले. नीलमच्या डोक्यावर त्याने हाणले, पाठीवर मारले. नीलम खाली पडली. त्याने तडाखे हाणले. इतक्यात चिनी उठली. तिने विचारले,

''बाबा, माझे परकर पोलके?''

तो काही बोलला नाही. चिनी बापाजवळ जाऊन रडू लागली. त्याने तिच्या एक थोबाडीत मारली. आणि घराबाहेर निघून गेला. दुर्गादेवीच्या देवळात झोपण्यासाठी एक चादर घेऊन गेला.

नीलम उठली. तिने चिनीला जवळ घेतले. तिच्या केसांवरून हात फिरवीत होती.

''रडू नको हं. तुझ्यासाठी परकर पोलके उद्या मी आणीन हं. उगी, उगी.''

आईच्या मांडीवर चिनी होती. ती आईच्या तोंडाकडे पहात होती. आईच्या डोळयांतील अश्रू तिला बघवत ना. इतक्यात चिनीच्या गालावर एक थेंब पडला! रक्ताचा थेंब. नीलमने तो पटकन पुसला. तिने आपल्या केसांत बोट फिरवले. डोक्यातून रक्त येत होते. नीलम मनात म्हणाली, ''हे भगवान, तू मला स्त्रीचा जन्म कशाला दिलास?''

नीलम दूरच्या भविष्याकडे बघत होती. आणि या चिनीचेही असेच होईल का? असे मनात येऊन तिचे डोळे भरून आले. चिनीच्या तोंडावर ते दयेचे, सहानुभूतीचे, वात्सल्याचे अश्रू पडले.
''आई, तू रडतेस, कां रडतेस?'' चिनीने विचारले.

त्या खोलीत मंद प्रकाश होता. एक माता मुलीच्या केसावरून हात फिरवीत होती. काय होते तिच्या मनात? त्या मुलीच्या केसातून ती आपली बोटे प्रेमाने का फिरवीत होती?

प्रा. सदाशिव वोडीयार यांच्या गोष्टीवरून

आत्म्याची हाक

प्रभाकरने आपल्यापुढे करियरीस्ट हाण्याचे ध्येय कधीच ठेवले नव्हते. त्याचे नाव यामुळे पहिल्या दहा किंवा पाचात कधी झळकले नव्हते. परंतु हायस्कूलपासून तो एक आनंदी परंतु तत्त्वनिष्ठ मुलगा म्हणून सर्वांना ठाऊक होता. देशप्रेम, समाजसुधारणेविषयी आस्था आणि समाजातील अन्याय, विषमता यामुळे त्याचे रक्त उसळे. यामुळेच तो विद्यार्थी जीवनातही अनेक चळवळींत भाग घेत असे. त्याच्या वक्तृत्वांत आणि लेखनात एकप्रकारची धार असे. कॉलेजात गेल्यावर त्याला थोडे व्यापक क्षेत्र मिळाले. त्याच्या बहुमुखी प्रतिभेला मोठे क्षेत्र मिळाले. कॉलेजच्या आवाराबाहेरही प्रभाकर दिसू लागला. वृत्तपत्रांतून त्योच लेख मधून मधून झळकू लागले. त्याला सर्वांत चीड कसली असेल तर सर्वत्र बोकाळलेल्या दांभिकतेची. धर्मात, राजकारणात, एवढेच नव्हे तर शिक्षणक्षेत्रांतही दांभिकता पाहून त्याला वाईट वाटे आणि त्याचा आत्मा बंड करून उठे. समाजाच्या दु:खाचे सर्वांत मूळ कारण म्हणजे दांभिकता असे तो म्हणे आणि समाजाला जर थोडे अधिक सुख मिळवून द्यावयाचे असेल तर ही दांभिकतेची प्रतिष्ठा समाजातून नाहीशी केली पाहिजे असे त्याचे म्हणणे. त्याच्या ह्या नवविचाराने तो कोठल्याच चौकटीत बसत नव्हता.

आपली कॉलेजची चार वर्षे त्याने पुरी केली. घरची गरिबी होती. प्रभारची चार वर्षे कधी पूर्ण होतात याकडे त्याचे वडील डोळे लावून होते. प्रभाकर परीक्षा देऊन घरी आला. वडिलांच्या त्याच्याबद्दल मोठमोठया अपेक्षा होत्या. तो मोठा पगारदार अधिकारी होईल असे त्यांना वाटे. तो परत आला आणि त्यांनी त्याच्यामागे नोकरीचे टुमणे लावले. निकाल लागेपर्यंत थांबायलाही ते तयार नव्हते. त्यांच्या आग्रहाला कंटाळून मग प्रभाकर एकाद दुसरा अर्ज रोज पाठवी. अर्ज पाठविताना त्याच्या मनाला वेदना होत. आपण कॉलेजात समजत होतो तितका जीवनसंग्राम सोपा नाही हे त्याला दिसले. अर्ज करता करता त्याचा रिझल्ट लागला. तो पास झाला. परंतु त्याच्या अर्जाला समाधानकारक उत्तर कोठेच नव्हते. त्याच्याबरोबर मॅट्रिकला बसलेली मुले कुठे कुठे चिकटली होती. वरच्या जागा काहींना मिळाल्या होत्या. काहींनी मायाही बरीच जमा केली होती. प्रभाकरच्या वडिलांच्या समोर ही दृश्ये दिसत.
प्रभाकरच्या निकालाच्याच दिवशी वर्तमानपत्रात एक जाहिरात होती. संपादकाच्या जागेसाठी अर्ज मागविले होते. 'नवसमाज' मासिक निघायचे होते. संपादकाला तीनशे रुपये पगार मिळावयाचा होता. प्रभाकरने अर्ज केला. त्याच्या डोळयांसमोर 'नवसमाज'चे आपण संपादक झाल्याची दृश्ये तरळू लागली. परंतु मनात वाटे, ''माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी लोकांचे अर्ज येतील. तीनशे रुपये पगार म्हणजे मामुली गोष्ट नव्हे. कसची आपल्याला ती जागा मिळते.'' आणि जेव्हा पंधरा दिवस वाट पाहून उत्तर आले नाही तेव्हा तर तो निराशच झाला. पुन्हा दुस-या जाहिरातील शोधू लागला.

पण इतक्यात एक तारवाला आला. 'नवसमाज'चे मालक दीनदयालजी यांची तार होती. आणि प्रभाकरला भेटीसाठी पाचारण केले होते. प्रभाकर लगेच निघाला. जाताना गाडीत त्याने 'नवसमाज' कसे सजवायचे, कोणती सदरे द्यायची, याचा आराखडा तयार केला. सहज एका कागदावर त्याने लिहिले प्रभाकर भारती, बी.ए. संपादक नवसमाज. तो कागद हातात खेळवीत होता. पण मग लाज वाटली. अजून कशाला पत्ता नाही. जर कोणी आपल्याला पाहिले तर काय म्हणेल! त्याने तो कागद लगेच खिशात कोंबला. त्याचे उतरायचे स्टेशन आले. दीनदयालजींचा मनुष्य स्टेशनवर आला होताच. प्रभाकरला त्याने लगेच हुडकून काढले. घरी जाताच दीनदयालजींची मुलाखत झाली. म्हणाले, ''तुमचा स्पष्टवक्तेपणा मला आवडला. इतरांनी अर्जात समाजसेवेची इच्छा आहे वगैरे हजार भानगडी लिहिल्या. पण तुम्ही स्पष्ट लिहिले की, मला नोकरीची गरज आहे. समाजसेवा नोकरी करताना करता आली तर हवी आहे. तुमची कात्रणे पाहिली. चांगले लिहिता तुम्ही. तुमच्या लेखणीत जोश आहे.''

''तसे काही नाही. आपली कृपा आहे.''

''मी उगाच स्तुति नाही करीत. तुम्हीच नवसमाज सांभाळा. पहिला अंक कधी काढायचा? आज आहे जुलैची पहिली तारीख.''

''१५ ऑगस्टला काढू. स्वातंत्र्य दिनापासून 'नवसमाज' सुरू होऊ दे.''

''ठीक. पण जमेल एवढयांत?''
प्रभाकरची निवड झाली. प्रभाकर कंबर बांधून कामाला लागला. १५ ऑगस्टला नवसमाजाचा पहिला अंक निघाला आणि वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या त्याच्यावर. लेख, गोष्टी, कविता उच्च प्रकारच्या आणि मुखपृष्ठ सुरेख आणि अंतरंगाची कल्पना देणारे होते. वृत्तपत्रांतून उत्कृष्ट अभिप्राय आले. एकजात सर्वांनी 'नवसमाज'ची पाठ थोपटली होती. दीनदयालजीही खूश होते. अंक एकापेक्षा एक सरस निघत होते.

सात आठ अंक निघाले असतील नसतील. गावात नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. दीनदयालजी उभे राहिले. त्यांच्या विरूध्द एक पेन्शनर हेडमास्तर उभे होते. हे हेडमास्तर फार लोकप्रिय होते. समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रांत अग्रभागी असत. गावातले कुठलेही सेवाकार्य असो तेथे ते असायचेच.

आणि एक दिवस निवडणुकीनिमित्त सभा झाली. म्युनिसिपल निवडणूक हा विषय होता. प्रभाकर बोलणार होता. लोकांची अफाट गर्दी झाली. प्रभाकरचे प्रवाही आणि प्रभावी भाषण सुरू झाले. कॉलेजमधला दांभिकतेविरूध्दचा सारा जोश त्याच्या अंगात संचारला. म्हणाला, ''नगरपालिका सुधारल्यावाचून स्वराज्य झोपडयांपर्यंत पोचणार नाही. सर्व लोभ, भय सोडून त्यागी समाजसेवकांना निवडून देण्याची हिम्मत मतदारांनी बाळगल्यावाचून नगरपालिका कशा सुधारणार? उद्याच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी दाखविले पाहिजे की, खरे खोटे तुम्ही ओळखता. आपला हितकर्ता कोण ते तुम्हांला समजते. तुम्ही मते कोणाला देणार? तुमच्या सेवेसाठी अखंड तळमळणा-या ह्या हेडमास्तरांना - ज्यांनी लोकशिक्षणाचे कार्य सतत तीस वर्षे केले आहे त्यांना, की केवळ पैसा आहे म्हणून नगरपालिकेचे राजकारण करू पाहणा-या दीनदयालजींना?''

प्रभाकरच्या वक्तृत्वाचा परिणाम जनतेवर झाला आणि दीनदयालजींवरही. दुस-या दिवशी दीनदयालजींनी त्याला बोलाविले व सभेतील भाषणाविषयी विचारले.

ते म्हणाले, ''मी तुमचे काय घोडे मारले होते माझ्याविरूध्द प्रचार केलात!''

''मी नोकरी पत्करली म्हणजे माझी मते विकलीत असे नाही. मला जे खरे वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.''
एवढे बोलून तो तडक घरी आला आणि त्याने राजीनामा पाठवून दिला. तसे न करण्याबद्दल त्याला अनेकांनी सल्ला दिला. हेडमास्तर तर म्हणाले, ''मी आपले नावच मागे घेतो.'' पण प्रभाकरने निश्चय पार पाडला. ज्या स्पष्टवक्तेपणामुळे तो संपादक झाला त्यामुळेच त्याला नोकरी सोडावी लागली.

निवडणुका झाल्या. शेटजींना विजयाची खात्री वाटत होती. आपल्या पैशाचा आणि पुढे पुढे करणा-यांचा त्यांना फार भरवसा होता. पण निवडणुकीत हेडमास्तर निवडून आले. इकडे प्रभाकर राजीनामा देऊन बाहर पडला. त्याला त्याच्याजोगती नोकरी मिळाली नाही. शेवटी तो आपल्या गावी आला. एक छोटेसे दुकान त्याने घातले पण व्यापारी कौशल्य त्याच्यात नव्हते. दुकानातून घरखर्च चालत नसे. शेतीवाडीतही प्रभाकर लक्ष घाली. त्याचे जीवन कसे तरी चालले होते. लोक त्याच्याबद्दल हळहळत होते.

आणि एकदिवस त्याच्या त्या खेडयांतल्या दुकानापुढे एक मोटर उभी राहिले. दीनदयालजींनी विचारले, ''कसे काय चालले आहे दुकान?''

प्रभाकरला वाटले जखमेवर मीठ चोळण्यासाठी हे आले आहेत. चांगले चालले आहे, द्यावे दडपून असा विचारही डोकावून गेला. पण त्याने स्वत:ला सावरले. म्हणाला, ''कसा तरी संसार रेटतो आहे.''

दीनदयालजींनी प्रभाकरला मिठी मारली. ते म्हणाले, ''जीवनाशी खरा प्रामाणिक आहेस. 'नवसमाज' तुझ्यावाचून पोरका आहे. आजही उत्तम साहित्य त्यात आहे. पण ते तेज आज तेथे नाही, आत्मा तेथे नाही. तूच 'नवसमाज' सांभाळ. आत्म्याची हाक ऐकणारा प्रामाणिक, निर्दंभ मनुष्य तू आहेस. 'नवसमाज' चालवायला तूच लायक. माझी चूक झाली. तुझी आत्म्याची हाक दडपून टाकायला मी चुकीने सांगत होतो. तू आपल्या आत्म्याच्या हाकेचा अपमान केला नाहीस. 'नवसमाजा'ला तू लायक आहेस. माझ्या विनंतीचा अव्हेर करू नकोस.''

दुस-या महिन्यापासून पुन्हा प्रभाकरच्या संपादकात्वाखाली 'नवसमाज' निघू लागला.

मेंग चियांग - एक चिनी लोककथा

चीनमध्ये लूपू राजा होता. त्याचे मोठे उद्योग, अचाट आणि विचित्र! मानवी हृदयावर न कोरलेल्या गोष्टी विसरल्या जातात! परंतु घोर पापांच्या कथा, त्या कोण विसरेल? त्या युगानुयुग चालत येतात. शापित अशा कथा.

लूपूने साम्राज्य वाढविले आणि संरक्षणासाठी उत्तरेकडे भिंत बांधायचे ठरविले. भिंतीजवळ हाडांच्या राशी पडत आहेत. दृश्य बघून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. सर्वत्र जुलूम आणि भीति! आकाश रडू लागले, भूमाता रडू लागली. ग्रंथ जाण्यात येत आहेत, पंडितांना ठार करण्यात येत आहे, जिवंत पुरण्यात येत आहे. कायदा नाही, नीतिनियम नाही. धर्म सारा लोपला.

मेंग चियांग  निघाली. ती पतिव्रता सती. तिचा पती कामाला सक्तीने नेण्यात आला. ती रडत बसे. किती कृश झाली आहे बघा. गाल खोल गेले. डोळे निस्तेज. अरेरे. तिचे लक्ष उत्तरेकडे आहे. तेथे कडक हिवाळा आहे! माझा पति! पुस्तकांत रमणारा. नाजुक, सुकुमार! त्याच्याने दगडधोंडे विटा कशा उचलल्या जातील? कोण त्याची कींव करील? कठोर अधिकारी हुकुम सोडीत असतील, वादीचे चाबूक कडाड् उडवित असतील. हे का त्याच्या नशिबी असावे? हे घर स्मशान वाटते. कशी येथे राहू? किती वाट पाहू? हृदय दुभंगते. मी त्याला शोधायला जाणार, भेटायला जाणार! दहा हजार मैल का असेना अंतर! मी जाईन.

ती निघाली. ती कोमलांगी, कृशांगी निघाली. शरीराने दुबळी परंतु आत्मा वज्राचा होता. साधे सुती लुगडे ती नेसली होती. ना अलंकार ना काही. तिचे ते सौंदर्य हाच तिचा दागिना. सौंदर्याचा प्रकाश फेकीत वा-यांतून, वादळांतून, पावसांतून ती निघाली. जवळच्या गाठोडयात काय आहे? पतीसाठी हाताने तयार करून आणलेले गरम कपडे! उत्तरेकडे चावरी थंडी आहे. जात होती. वाटेत नद्या लागत आहेत. दिवस मावळत आहे. गायीगुरे घरी येत आहेत. चूल पेटत आहे, परंतु ती? तिला विसांवा नाही. अनन्त पृथ्वी, अनन्त आकाश! एकटी, हो एकटी. जा एकटीच रडत, अश्रूंचे सडे घालीत. पावले उचलत नाहीत. थकली बिचारी. पदर चिखलात पडत आहे; तिला भान नाही. ओचा सुटला; कळत नाही. ते उघडे हात थंडीने हिरवे निळे झाले.

जातांना तो म्हणाला होता, ''मी परत येईन काय भरवसा? राजाचा हुकुम! कोणी मोडायचा? आता एका उशीवर डोकी ठेवून आपण पाखरांच्या जोडप्यांप्रमाणे पुन्हा प्रेमाने पडणार नाही. प्रिय सखी, पतिव्रते, खोटे स्वप्न मनात नको खेळवू. मनात आशा नको. पुन्हा परत येणे कठिण आहे.''

नाथ, त्या शब्दांत करुणा होती. तुम्ही का माझा मार्ग मोकळा करून जात होता? आपले वैवाहिक जीवन का विसरलात? मासा आणि पाणी तसे आपले एकत्र जीवन. माझे हृदय शुध्द आहे. पातिव्रत्य हेच माझे बळ. मायबापांची शिकवण का विसरू? मी येणार तुझ्या पाठोपाठ, येणार भेटायला, तुला गरम कपडे द्यायला. तुला मदत करायला, दहा हजार मैल अंतर असले म्हणून काय झाले?

दु:खाने ती दग्ध झाली होती. जरा काही सळसळले तरी घाबरे. आज थंड चावरे वारे वहात आहेत. कावळे चालले घरटयांकडे. ही कोठे जाणार? घंटांचा आवाज येत आहे. मिण मिण दिवा दूरचा दिसत आहे. गाव आहे जवळ? गाव नव्हता. त्या जंगलात ते देऊळ होते. त्या लहानशा देवळात ती बसली. देवासमोर अश्रू ढाळित बसली, ''देवा, अश्रूंनी तुझे मंदिर मलिन करित आहे म्हणून रागावू नको. मुलीला क्षमा कर. मी दुर्दैवी आहे. थंडीवा-यात तुझ्या पायी निवारा; उबारा.''

तेथे जागा झाडून दात शिवशिवत ती झोपली. कोठली झोप? तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत! लहान मी. परंतु जाईन त्याला शोधीत.''

गालांवरून अश्रु घळघळले. ती पुन्हा जुडी करून पडली. स्वप्नात अस्थिपंजर पतीला ती बघते.

''कशाला तू आलीस?'' तो म्हणतो.

''नाथ, या, या,'' असे म्हणत त्याला ती हृदयाशीं धरू बघते, तुम्हांला ऊब देतें म्हणते.

बाहेर सों, सों वारा करतो. तिला जाग येते. अनंत तारे चमचम करीत असतात. सभोवती पृथ्वी धुक्यांत वेढलेली. हे स्वप्न दुर्दैवाचे सूचक का? तो नाही भेटणार?

तो स्वप्नात म्हणाला, ''माझी मूठभर हाडे, माझी माती, हीच तुझ्या अनंत श्रमांची भरपाई, दुसरे काय  तुला मिळणार?''

माझे विचार भरकटत गेले असतील. ते स्वप्न प्रचंड नद्या नि उंच पर्वत यांवरून येत होते. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झाले असावे. मी का त्याला मातीच्या खाली पाहीन? हे का माझ्या नशिबी असेल? निदान त्याच्याजवळ मीहि पडेन. हें का कमी?

उजाडले. धुके पडून सारे ओलसर आहे. कावळे हिंडू फिरू लागले. देवाला नमस्कारून ती निघाली. हृदयांत आशा-निराशा. म्हणाली, ''किती संकटे असोत, कष्ट असोत, पतिपत्नीचे ऐक्य - त्याची कसोटी आहे.''

दंवाने तिचे वक्ष:स्थळ ओले झाले आहे आणि अश्रुंनीही. कठोर वारा तिला मिठी मारीत आहे. ती थरथरत आहे. पतीला हांक मारून म्हणते, ''कोठल्या बाजूला वळू, कोठें तुला पाहूं? कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील? माझ्या कानांत कर्णफुलें घालशील? आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का? पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का? जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का? नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें? तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही?''
त्याची बायको तिला विचारी, ''बाई कोठून आल्यात, कोठे जायचे?''

तिचे अश्रू धावत येत. हुंदका आवरून म्हणे, ''भिंत, उत्तरेकडची प्रचंड भिंत! वेठीला धरून माझ्या पतीला त्यांनी ओढीत नेले. त्याला भेटायला जाते. हे गरम कपडे घेऊन थंडीवा-यांतून जात आहे. घरी रडत बसण्यापेक्षा हा दु:खदायक प्रवास बरा. त्याला शोधीत जात आहे. त्याला पाहीन नि शान्त होईन.''

''वेडी तर नाहीस तू मुली? शेकडो हजारो मैल कशी चालत जाशील? थंडीचा कडाका. वाटेत वाटमारे, डाकू, तू सुंदर आहेस. तेच तर भय. नको जाऊ. हे तुझे सुकुमार पाय.''

''सर्व नात्यांत पतिपत्नींचें नातें श्रेष्ठ. सर्व संकटांची मला जाणीव आहे. परंतु माझे वेडे हृदय. त्याला पाहिल्याशिवाय विसावणार नाही. परत नाही फिरायचे या निश्चयाने मी निघाले आहे. मग आमची भेट धरित्रीच्या पोटात व्हायची असेल तरी तेथे होवो.''

ती म्हातारी खानावळी बाई म्हणते, ''मुली; तूं एकटी मी येऊ का सोबतीला? एकीपेक्षां दोघी ब-या. हा थकलेला देह येऊ दे का तुझ्या संगे?''

''नको आजीबाई नको. तुम्ही प्रेम दिलेत, दया दाखवलीत. तुमच्या मरणाला का मी कारणीभूत होऊं? शिवशिव. नाही आजी, ते बरे नाही. तुम्ही मला आईचे प्रेम दिलेत. पति भेटल्यावर परतेन तेव्हा तुमचे ऋण फेडीन हो.''

आजीबाई आणि मेंग चियांग कितीतरी वेळ बोलत बसतात. मग डोळा लागतो. उजाडले आता. रात्रीचे पहा-याचे हांकारे थांबले. कोंबडा आरवला. ती उठली. कपडयांचे बासन घेऊन निघाली.

थंडी, थंडी, कडक थंडी. कशी ही जाणार, कशी चालणार? वारा, चावरा वारा. झोंबतो अंगाला. कशी ही जाणार? पायांची चाळण झाली. अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या झाल्या. कशी राहणार थंडी? धुके, बर्फ, सारे गार गार, तिची हाडे दुखत आहेत. रक्ताळ अश्रू गळत आहेत. सुस्कारे! ते पहा उंच पर्व दिसू लागले. भिंत जवळ आली का? उत्तरेची भिंत? ती पर्व चढू लागली. भिंत कोठे आहे ती विचारी. आणि एक शेतकरी म्हणाला, ''आता जवळच आहे. समुद्रापर्यंत भिंत आता भिडेल. अघोरी काम.''

तिचे हृदय आशेने फुलले. जवळ आली भिंत. समोरचाच रस्ता. त्याला बघेन नि सारे श्रम नाहींसे होतील. अश्रूंची फुले होतील.

भिंतीचे काम लौकर आटपा. अपार खर्च होत आहे. करांखाली प्रजा आहे. लौकर आटपा काम. डोंगरावर पाणी न्यायचे, दगड चढवायचे! पाठीवर कडाड् चाबूक वाजे. हजारो मरत. सभोती हाडांचे ढीग!

आणि फॅन चि लियांगला तर कष्टांची सवय नाही. हातात पुस्तक खेळवणारा, तो दगडधोंडे उरापोटी उचलीत होता. तो कसा वाचणार? त्याची वेठीची मुदत संपण्याआंतच तो मरणार! आणि खरेच काम करताना एक दिवस तो पडला, मेला! कामगार हळहळले. तेथे त्या विटांतच त्यांनी त्याचीहि समाधि बांधली! त्या भिंतीतच!

आज संक्रांत होती. सुटीचा दिवस आणि ती आली. कोणाला विचारणार पत्ता? ते पहा फाटक्या कपडयांतले बिगारी. ती लाज-या धीटपणाने पुढे होऊन म्हणाली,

''एक क्षणभर थांबा मित्रांनो.''
ती थकलेली होती तरी सुंदर दिसत होती. थोरामोठयांच्या घरातील वाटली. ते थांबले.

''येथे टेकडया आणि समुद्र मिळत आहेत. येथल्या कामांत माझा पति होता. फॅन चि लियांग त्याचें नाव. कोठे आहे तो?''

तो बांधकाम करणारे गवंडी होते. ते सद्गदित झाले व म्हणाले, ''त्याच्यासाठीच आज आलो आहोत. तो कोवळा तरुण होता, सुकुमार होता. श्रमाची सवय नाही. तो मेला. त्याचे प्रेत उघडे कसे टाकायचे? आम्ही त्याला पुरले. आज सणाचा दिवस. त्याच्या समाधीला फुले वाहायला, मैत्री दाखवायला आलो आहोत.''

ते बोलत होते, तिचे डोळे निराशेने जवळ जवळ मिटत आले. प्रियजनांचा चिरवियोग यासारखे दु:ख नाही. पतिपत्नींना जोडणारे नाते प्राणमय असते. पति मेला ऐकताच तिचा तडफडणारा, विव्हळणारा आत्मा शरीर फाडून जायला लागला.

शेवटची वेदनामय वाणी मुखातून बाहेर पडत आहे, ''नाथ, नाथ!''

ती पडली!

थोडया वेळाने पुन्हा सचेत होऊन म्हणाली, ''माझा पति किती सद्वर्तनी. तो प्रवचने करी, धर्मग्रंथ सांगे. तो परत येईल म्हणून कितीजण वाट पहात आहेत तिकडे. परंतु पाण्यांत दगड बुडावा तसा तो गेला. नाही, पुन्हा दिसणार नाही! शेवटचा निरोप घेताना तो जे बोलला त्याने पाषाणहि पाझरेल. म्हणाला, 'पतिपत्नींचे अभेद्य नाते असते. दोन पक्ष्यांचा जोडा. परंतु दुर्दैव ओढवले म्हणजे त्यांनाहि विमुक्त व्हावे लागते. पतीने पुरुषार्थ मिळवावा, कधी पत्नीला सोडू नये असे मला नाही का वाटत? परंतु येथे काय इलाज? पूर्वजन्मींच्या पापांची ही शिक्षा! दैवाला कोण जिंकणार? त्या लांब भिंतीपासून पुन्हा यायचा रस्ता नाही. आपण स्वप्नातच भेटू.' नाथ, तुमची वाणी खरी ठरली अखेर. मलाहि परत जायला रस्ता नाही! मला आता घर ना दार... मी मेल्यावर माझ्या देहाचे काय होईल चिंता नको. वारा माझ्या या भग्न हाडांची धूळ जगभर फेकील.'' ते बांधकाम्ये गहिंवरले व म्हणाले, ''नका रडू, पुसा डोळे, विसावा घ्या.''

तिने डोळे पुसले. ती शांत झाली व म्हणाली, ''तुम्ही माझ्या पतीला मूठमाती दिलीत. तुमचे उपकार कसे फेडू? हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत?''

''तुमच्याबरोबर आम्हीहि अश्रूंची तिलांजली द्यायला येतो चला.''

घट्ट पदर बांधून जड गांठोडे उचलून ती निघाली. हृदय फोडून अश्रूंचे पाट वहात येत होते.

ते पहा. भिंतीचे शेवटचे टोक, समुद्राला ते मिळाले आहे. खाली लाटा उसळत आहेत. आकाशाला भेटू बघत आहेत! ती म्हणाली, ''कोठे पुरलेत? दाखवा थडगे.''

ते म्हणाले, ''ही सारी सम्राटाची जागा. त्याची मालकी. येथे कोणाला कसे पुरता येईल? म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती.?''

तिने तो दगड पाहिला. वारा, पाऊस, ऊन यांना पुसून टाकता न येणारे नाव तिने पाहिले. तिची प्रेमज्वाळा पेटली, भडकली. ''नाथ, वेडया आशेने तुम्ही जिवंत भेटाल म्हणून आले. आणि आता का एकटी राहू? शून्य आकाशाकडे बघत? नाही, कधीहि नाही!''

तिचे प्रेम, तिचे पातिव्रत्य आकाशाला भेदून गेली. पातिव्रत्याची शक्ति विश्वाला हलवील. ती आपल्या पतीची हाडे मिळतात का पहात होती. आणि भिंत फाटली! दगड माती जरा दूर झाली. पतीची त्रिभुवन मोलाची हाडे मिळाली. अंमलदाराने सम्राटाला चमत्कार कळविला. सम्राटाने मेंग चियांगला प्रासादराणी करतों कळवले!

सम्राटाची आज्ञा ती धिक्कारते. ती हाडे आपल्या विश्वासू हृदयाशी धरून लांब भिंतीच्या टोकावर ती उभी राहते. खाली समुद्र उसळत असतो.

घेतली तिने उडी! डुब्!
पूर्व समुद्रात ती विलीन झाली.

आणि सम्राटाला तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. तेथे त्या भिंतीजवळ तिचे समाधिमंदीर त्याने उभारले. तिचा दिवस चीनभर पाळण्यात येऊ लागला. तिची पूजा होऊ लागली. मेंग चियांग अमर झाली!

शहाणा झालेला राजपुत्र

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगीतला.

"आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर !" ती रडत म्हणाली.

"तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे." तो म्हणाला.

राणी काय करणार काय बोलणार ? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला "राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये !"

"तुमची आज्ञा प्रमाण " असे म्हणून पित्याच्या पाय पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.

"हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू. " ती म्हणाली.

आईचां आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला रात्र गेली. चालत होता. थकल्यावर दगडाची उशी करून झाडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हात-पाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.

लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली.

"कोण तुम्ही कुठल्या ? या रानावनातून एकटया कुठे जाता ? "

"मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस." ती म्हणाली.

"ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली." तो म्हणाला.

दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडुक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची ? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुणटुण उडया मारीत गेला. सापाची भूक शमली ; बेडकाचेही प्राण वाचले.

भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली नि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरूण येत होता.

"कोण रे तू ? कुठला ? रानावनात एकटा का ?" राजपुत्राने विचारले.

"मला तुमचा भाऊ होऊ दे. " तो म्हणाला.

"ठीक हरकत नाही. " राजपुत्र म्हणाला.

तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला.

"मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका. " तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली. अर्धा अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू; त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने ?

जवळच एक शहर दिसत होते. प्रसादांचे; मंदिराचे कळस दिसत होते. राजपुत्र दोन भावांना म्हणाला "त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती; घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाचे मिरवत नेण्यासाठी या !"

दोघे भाऊ त्या नगरीत गेले. दोन रत्ने त्यांनी विकली. त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला; नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते; ठायी ठायी आसने; फुलांचे गुच्छ होते; पडदे सोडलेले होते. चांदी-सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह; त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले.

आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोडयांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरांतून गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाडयात उतरला. तेथील जीवन सुरू झाले.

"तू रे कोण ?" राजपुत्राने विचारले.

राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक खुशमस्कर्‍या होता. राजाने त्याला विचारले.

"कोण आला आहे राजपुत्र ?"

"मी बातमी काढून आणतो." तो म्हणाला. खुशमस्कर्‍या राजपुत्राकडे गेला. पहारेकर्‍यांनी त्याला हटकले. तो म्हणाला;

"मी येथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे."

नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.

"पाठवा त्याला." राजपुत्र म्हणाला. खुशमस्कर्‍या आला. राजपुत्राची तो करमणुक करू लागला. तो तेथील हास्यविनोद एकून त्याची बहीणही आली. थोडया वेळाने खुशमस्कर्‍या जायला निघाला.

"येत जा !" राजपुत्र म्हणाला.

"राजाने येऊ दिले तर !" तो म्हणाला.

खुशमस्कर्‍या राजाकडे गेला व म्हणाला;

"राजा; राजा; त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा !"

"ठीक आहे." राजा म्हणाला.

दुसर्‍या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला; आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला;

"तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो."

"ती माझी बहीण !"

"ती माझी राणी होऊ दे !"

"मी तिला विचारीन !"

"कळवा मला काय ते !"

राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली. ती म्हणाली.

"राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही !"

राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्कर्‍या आला.

" काय उपाय ? " राजाने विचारले.

" त्याला म्हणावे; तुझी बहीण तरी दे; नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधार्‍या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो; नाहीतर डोके उडवण्यात येईल ! "

राजपुत्राला निरोप कळवण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली;

" दादा का रडतोस ? "

त्याने तो वृतांत सांगितला.

ती म्हणाली; " गावाबाहेर जाऊन दो कोसांवर बसून राहा. चिंता नको करूस ! "

राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावर ती हरिणी बनली. वार्‍याप्रमाणे ती पळत सुटली. अंधार्‍या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले येऊन ती म्हणाली;

" जा; राजाला ही नेऊन दे ! "

राजपुत्राने तार्‍याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुशमस्कर्‍याला म्हणाला; " आता कोणता उपाय ? "

" त्याला सांगा की; बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे; नाही तर डोके उडवीन ! '' खुशमस्कर्‍याने सुचविले. राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला;

" दादा का रडतोस ? "

राजपुत्राने वृज्ञल्तलृांत निवेदिला.

" रडू नकोस; दादा. शहराबाहेर जाऊन बस. चिंता नको करूस !"

राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला नि तो बेडूक बनला. डरांव; डरांव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडुक जमा झाले. तो त्यांना म्हणाला; " त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन: पुन्हा बुडया मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू; राजाच्या अंगणात ढीग घालू ! "

सार्‍या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणार्‍या मोत्यांचे ढीग पडले.

भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला " राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीची मोती निवडुन घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून ! "

राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाडयात परत आला. राजाने खुशमस्कर्‍याला विचारले " आता काय ? "

" त्या राजपुत्राला म्हणावे; बहीण दे; नाहीतर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करावयाला कोणी आहे की नाही ते विचारून येते." खुशमस्कर्‍याने सुचविले.

" तो स्वर्गात कसा जाणार ? "

" तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू ! "

राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला " दादा; का दु:खी ? " राजपुत्राने सारी कथा सांगितली.

" रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा नि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा; की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा ! " राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्या घरी द्या असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला.

" महाराज; या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या." सर्प म्हणाला.

" हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल." शेष म्हणाला. एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले ने तो निघुन गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला; " दादा जा व राजाला सांगा की; त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्कर्‍याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या !"

राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाडयासमोर ही गर्दी ! राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्कर्‍यास बोलावले व सांगितले;

"अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे ! "

"मी कसा जाऊ ?"

"या राजपुत्रास पाठविले त्याच मार्गाने तूही जा !"

लोकांनी टाळया पिटल्या. " दुष्टाची बरी जिरली!" कोणी म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाडयात आला व भावंडांना म्हणाला; "हा राजा लहरी दिसतो. वेडपट दिसतो. येथे राहण्यात अर्थ नाही. चला आपण जाऊ."

रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फारळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला;

"दादा; मला निरोप दे! मी जातो!"

"मला कंटाळलास?"

"दादा; मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा; सुखी व्हा!"

असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोडया अंतरावर फण फण करीत निघून गेला. थोडया अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला; "दादा; मलाही निरोप दे!"

"का रे जातोस ?"

"दादा; मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडूक परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो!" असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुन उडया मारीत निघून गेला.

पुन्हा थोडया अंतरावर बहीण म्हणाली;

"दादा; मलाही निरोप दे!"

"तूही चाललीस ?"

"होय दादा. पादसे वाट पाहत असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते. सुखी हो. असाच दयाळू-मयाळू हो!"

बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वार्‍याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली.

राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशु-पक्ष्यांतही केवढी कृतज्ञताबुद्धी ! असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे;

असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थीत होती.

"कोण आहे ? " पहारेकर्‍यांनी दरडावले.

"मी राजपुत्र."

" माझा बाळ ! माझा बाळ ! " म्हणत राणी घावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला.

" शहाणा होऊन आलास ? " राजाने विचारले.

" होय तात ! " तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा-राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊ या. गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली.

सोनसाखळी

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.

सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई. आपल्या जवळ निजायला घेई. तिच्या जवळ कितीतरी खेळ किती बाहुल्या किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी. छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.

सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे "बाबा मला भरवा. मी मोठी झाले, म्हणून काय झाले ?" मग प्रेमाने बाप तिला घास देई.

सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला "हे बघ मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको मारू नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर."

सावत्र आई म्हणाली "हे मला सांगायला हवे ? तुम्ही काळजी नका करू. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुटया भात जेवायला वाढीन कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन वणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरूप परत या."

सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरू झाला. ती सोनसाखळीचा छळ करू लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी भांडी घाशी. ती विहिरीवरून पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.

एक दिवशी तर तिच्या कोवळया हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरू झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईनं डाळिंबाचे झाड लावले.

काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळयांत पाणी आणून म्हणाली "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा तेथे कोणाचे काय चालणार ?"

बाप दु:खी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना झोपताना डाळयांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे.

त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले ! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी.

शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळिंब. कलिंगडाएवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणार तोच आतून गोडसा आवाज आला "हळूच चिरा मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले.

बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा बाबा पुन्हा मला साडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीकत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही असत्य छपत नाही मला कळले. मी नीट वागेन." पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीनं वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.

बहुला गाय

भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुद्धा कृष्णदेवाला ती विसंबत नसे. नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची मधून मधून त्याच्याकडे बघावयाची.

कृष्णाची मुरली वाजूलागली तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत. एके दिवशी ह्या बहुला गाईचे सत्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापुर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेउन राजेच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही.

सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळ झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्‍या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घूसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली. परन्तु बहुला कोठे आहे बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते .

गोजिरवाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
काळे त्याचे आंग सुंदर
कपळावरी चांद मनोहर
जसा चन्द्रमा निळया नभावर
तैसा जाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
खुंट रुप्याचा बांधायाला
सोन-साखळी घालायाला
डुबा आवडे अति सकळांला
मोहन साना || बहुलेचा बालक तान्हा ||

असा तो डुबा. परंतु आज त्याची आई कोठे आहे? आज त्याला पान्हा कोण पाजणार? त्याचे अंग प्रेमाने कोण चाटणार? डुबा एकसारखा हंबरत होता परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही. डुबा कावराबावरा झाला. केविलवाणा दिसू लागला.

सायंकाळी बहुला भानावर आली. आपण घोर रानात आहोत हे तिला कळले. तिला यमुना दिसेना; कृष्ण दिसेना; गाई-गोप दिसेनात. कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना. बहुला घाबरली. तिला रस्ता दिसेना. सर्वत्र घोर रान माजलेले होते. रानकिडयांचा किर्र आवाज होत होता. अरण्यातील श्रापदांचे भयंकर गदारोळ तिच्या कानी पडत होते. बहुला भगवंताचा धावा करू लागली. देवा तुला सोडून मी आज कशी रे गेल्ये? तू मला का धरून ठेवल नाहीस? तुझी मुरली मला का ऐकू आली नाही? हिरव्या हिरव्या गवताला भुलून मी तुला सोडून गेल्ये. मीच पापी आहे;लोभी आहे देवा. कृष्णा ये. मला भेट. मला थोपट. पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही.'

इतक्यात काय चमत्कार झाला झाडीत सळसळ आवाज झाला. बहुलेला वाटले कृष्णाच्या पीतांबराचाच आवाज. ती आशेने पाहू लागली. ते पाहा दोन हिरे का तारे ? कृष्णाच्या मुगुटावरचे का ते हिरे? छे! ते हिरे नव्हते ते तारे नव्हते. ते वाघाचे डोळे होते. अरे बाप रे! केवढा प्रचंड वाघ. तो वाघ गुरगुरत बाहेर आला. तो वाघ जिभल्या चाटीत होता. गाईला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते.

वाघ पाहून बहुला घाबरली. वाघ बहुलेवर आता उडी मारणार;तिच्या मानेचा घोट घेणार;तोच बहुला करुणवाणीने त्याला म्हणाली;वाघोबा मी तुझ्या तावडीत सापडल्ये खरी. तू मला खा. मी जीवदान मागत नाही;कारण मरणाचं भय मला वाटत नाही. कृष्णाच्या भक्ताला मरणाची डर वाटत नसते, परंतु एक मागणं तुला मागते. माझा बाळ डुबा घरी वाट पाहात असेल. तो हंबरत असले. त्याला शेवटचा पान्हा पाजून; त्याला निरोप देऊन मी येते. मी खचित येईन.

वाघ म्हणाला; 'एकदा निसटून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील? मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्याइतकी मुर्ख तू खचित नसशील. हातातील शिकार भोळेपणाने सोडून देण्याइतका मूर्ख मीही नाही. चल; मी तुला मारणार व खाणार. तुझं काही मांस माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिलांना नेऊन देणार. माझी वाघीण वाट पाहात असेल.'

बहुला म्हणाली; 'वाघोबा तुलाही मुलंबाळं आहेत. मुलांची माया तू जाणतोस. माझ्या मुलांची तुला दया येऊ दे. मी खरंच परत येईन; मी कृष्णदेवाची सखी आहे. मी दिला शब्द पाळीन. सूर्य वरून पडेल पृथ्वी उडेल; सागर कोरडे होतील अग्नी थंड होईल; परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही. माझी परीक्षा तर घेऊन पाहा. वाघोबा दाखव; जवळचा रस्ता दाखव. मी आत्ता जाऊन येंते.'

व्याघ्ररूपी भगवंत म्हणाला;'बरं आज परीक्षाच घेतो. जा लौकर जाऊन ये. मी इथं या दगडावर बासून राहातो. तुझा बाळ भुकेला आहे;तशी माझी बाळेही भुकेली आहेत हे लक्षात ठेव.'

बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला. इतका वेळ तिला कसा दिसला नाही; कोणास ठाऊक ! सन्मार्ग जवळच असतो; परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही. बहुला धावपळ करीत निघाली. पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती. तिचे ते चार सड म्हणजे जणू दुधाने थरलेले चार समुद्रच होते. पृथ्वीला; वाटेतील दगडधोंडयांना दुधाचा अभीषेक करीत ती चालली. पळताना तिला ठेचा लागत होत्या; काटे बोचत होते; परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्ह्ते.

घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता. आज कृष्णदेव आपल्याला आंजारागोंजारायला आला नाही; ह्याचेही त्याला वाईट वाटले. गरीब बिचारा सारखा आईची वाट पाहात होता. ती पाहा हंबरत बहुला आली. डुबा हंबरला. बहुला डुव्याजवळ उभी राहिली. डुबा आईच्या कासेला झोंबला. तो तान्हा अपार पान्हा पिऊ लागला. आज बहुलेचा पान्हा संपता संपेना. डुब्याचे पोट भरता भरेना.

डुबा बहुलेचे दूध पीत होता. बहुला त्याचे अंग चाटत होती; परंतु एकाएकी डुबा चमकला. त्याचे दूध पिणे थांबले. आईच्या डोळयांतील कढत अश्रू त्याच्या अंगावर पडले. डुबा आईच्या तोंडाजवळ आला. आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला; आई का ग रडतेस ? तुला काय झालं ? तू कुणाच्या शेतात चुकून गेलीस होय ? त्यानं तुला मारलं होय ? हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहेत. काटेरी काठीनं तुला कोणी झोडपलं वाटतं ?' बहुला म्हणाली; बाळ मला कुणी मारलं नाही. तुझ्यासाठी पळत येत होत्ये. वाटेतील काटेझुडपे लागली व अंग खरचटलं.'

डुबा : मग तू का रडतेस ? कृष्णदेव तुझ्यावर रागावला ? आज मला खाजवायला तो आला नाही. तुला त्यानं इतर गाईंबरोबर का आणलं नाही ? त्यानं तुला हाकलून दिलं होय ? तुला यायला इतका उशीर का झाला ?

बहुला : कृष्णदेव माझ्यावर रागावला नाही. मीच त्याला सोडून दूर निघून गेल्ये.

डुबा : तू का निघून गेलीस ? तू माझ्यावर रागावलीस वाटतं ? दूध पिताना मी तुला ढुश्या देतो; म्हणून रागावलीस ? मी तुझ्याबरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागावलीस ? आई मी हट्ट करणार नाही. तू वनात नेशील तेव्हाच येईन. आता मी गवत खाऊ लागलो आहे. पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही. आई माझ्यावर रागावू नको. मी का वाईट आहे ?

बहुला गहिवरून म्हणाली; ' बाळ; तुला कोण वाईट म्हणेल ? तू गुणांचा आहेस. सारं जग तुझ्यावरून ओवाळून टाकावं असा तू आहेस. तुझ्यावर का मी कधी रागावेन ? अरे; पिताना मला ढुश्या देतोस; त्यात तर माझं खरं सुख. तुझी एकेक ढुशी लागते व मला अपार पान्हा फुटतो. तुझ्यावर नाही हो मी रागावल्ये.'

डुबा : मग तू का रडतेस ? तुझं दु:ख मला का सांगत नाहीस ? मी का फक्त तुझं दूधच पिऊ ? तुझं दु:ख नको ऐकू ? आई जगात तुला मी व मला तू. तू मला तुझं दु:ख सांगणार नसशील तर मी कशाला जगू ?

बहुला : बाळ; सारं सांगत्ये; ऐक. आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब चरत गेल्ये. कृष्णाला अंतरल्ये. मला मोह पडला. रात्र पडली तेव्हा मी भानावर आल्ये; तो जवळ ना यमुना; ना गाई; ना गोपाळ; ना कृष्ण; सभोवती भयंकर जंगल. मला रस्ता दिसेना. एकाएकी एक वाघ आला व तो मला खाणार; तोच मी त्याला म्हटलं; ' वाघोबा; माझ्या बाळाला मी शेवटचा पान्हा पाजून येते. त्याला निरोप देऊन येते; मग मला खा. मी खरोखर परत येईन.' डुब्या ! वाघाला मी वचन दिलं आहे. आता मला जाऊ दे. मी सत्वापासून च्युत कशी होऊ ? तू एकटा जगात राहाणार; अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटलं; परंतु कृष्णदेव तुला आहे. त्याची कृपा सर्वांना पुरून उरेल. बाळ; आता नीट वाग. फार उडया मारू नकोस. फार झोंब्या घेऊ नकोस. रानात कृष्णाला सोडून दूर जात नकोस; चांगला मोठा हो. देवाचा लाडका हो.' असे म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले. डुबा म्हणाला; 'आई; मीच त्या वाघाकडे जातो. तू जगात राहा. तुला माझ्यासारखी आणखी बाळं होतील. मी तुझ्याच पोटी पुन्हा येईन; तुझं बाळ होईन. मला जाऊ दे. तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोसलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे. माझं सोनं होईल. मी कृतार्थ होईन'

बहुला सदगदित होऊन बोलली; 'बाळ; तू अजून लहान आहेस. वाघाचे कठोर पंजे तुझ्या कोवळया शरीराला कसे सहन होतील ? तू मोठा हो. एक दिवस सत्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लाभेल; परंतु आज हट्ट नको करू. आईचं ऐकावं हो बाळ.'

डुबा म्हणाला; 'आई; तुझं दुसरं सारं ऐकेन; परंतु या बाबतीत नाही. मी एक तोड सुचवतो. आपण वाघोबाकडे दोघेजण जाऊ व त्याला मी सांगेन; 'मला खा.' तू सांग; 'मला खा.' बाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल.'

बहुला व डुबा रानात जाण्यासाठी निघाली. अजून प्रहरभर रात्र उरली होती. आकाशात तारे स्वच्छ चमकत होते . हजारो डोळयांनी आकाश त्या मायलेकरांकडे पाहात होते. डुबा पुढे चालला होता. वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते; त्या खुणेने तो चालला होता. बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पीत होते; परंतु त्या सांपाकडे त्या गायवासरांचे लक्ष नव्हते. रानातील तरुवेलीवर असंख्य फुले फुलली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. मंद वार्‍याबरोबर सर्वत्र पसरत होता. जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता ! वृक्षांच्या पानांवर टपटप बिंदू पडत होते. जणू निसर्गदेवता त्या मायलेकरांसाठी अनंत अश्रू ढाळीत होती.

बहुला व डूबा कोणी बोलत नव्हते; बोलणे त्यांना शक्यच नव्हते. भरलेल्या अंत:करणाने; भरलेल्या डोळयांनी दोघे मुकाटयाने चालली होती. दोघे वाघाच्या जवळ आली. वाघ करकर दाढा खात होता. वाघाला पाहून डुबा जरा घाबरला. तो बहुलेच्या अंगाला बिलगला. बहुला त्याला म्हणाली; 'बाळ माघारी जा.' डुबा म्हणाला; 'मी भ्यायलो नाही काही; हा बघ पुढं होतो.' असे म्हणून उडया मारीत डुबा वाघासमोर जाऊन उभा राहिला. तो वाघाजवळ बोलू लागला.

डुबा : तू का रे तो वाघोबा ? माझ्या आईला खाणारा तूच ना ? वाघोबा; माझ्या आईला खाऊ नकोस. तू मला खा. माझी प्रार्थना ऐक.

बहुला : नको रे वाघोबा. त्याचं काय ऐकतोस ? तू आपला मला खा हो.

वाघ : बहुले; इतका उशीर का झाला ? मी म्हटलं; तू येतेस की नाही ? न येण्याचं ठरवीत होतीस ना ?

बहुला : नाही रे वाघोबा. हा डुबा ऐकेना. रोज सांगितलेलं ऐकतो. इवलासुद्धा हट्ट धरून बसत नाही; परंतु आज ऐकेना. म्हणे; 'मलाच जाउ दे. त्याची समजूत घालण्यात वेळ गेला. शेवटी तो आलाच बरोबर. रागावू नकोस काही. फसवण्याचं स्वप्नातसुद्धा माझ्या मनात आलं नाही. ही मी तयार आहे. तुझी वाघीण; तुझी पिलं भुकेली असतील. त्यांना लौकर माझा ताजाताजा घास नेऊन दे.'

डुबा : वाघोबा; नको रे आईला खाऊ. माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊमऊ आहे माझं अंग तुला आवडेल; तुझ्या पिलांना आवडेल.

बहुला : त्याला खाऊन सार्‍यांची भूक कशी शमणार ? वाघोबा; तू मलाच खा. मी हाडापेरानं मोठी आहे; तुम्हा सर्वांचं पोट भरेल.

वाघ : मी तुम्हाला दोघांना मारून टाकतो. तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो. गोठयात एके ठिकाणी असता; आता पोटात एके ठिकाणी राहा. डुब्याचं मांस - कोवळं कोवळं - माझ्या पिलांना फारच आवडेल. तुझं वाघिणीला आवडेल. चला; तयार व्हा. आता उशीर नको. बहुला; डुबा; माना खाली घालून तिथं बसा. देवाचं स्मरण करा.

मायलेकरे खाली माना घालून बसली; परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला; 'वाघोबा; खायचंच तर मला आधी खा. आईला फाडलेलं माझ्यानं पाहावणार नाही; परंतु आई मोठी आहे. धीराची आहे. तिच्या सत्वाला सीमा नाही. मला फाडलेलं पाहाण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे.'

द्यघ : गप्प बस. बालणं पुरे. मरायची वेळ आली तरी चुरूचुरू बोलतच आहे.

डुबा : मला मरणाची भीती थोडीच आहे.

बहुला : बाळ; आता पुरे. कृष्णदेवाचं स्मरण कर. आता बोलू नको. मरणाच्या वेळेस गर्व नको. फुशारकी नको.

मायलेकरे तयार झाली. मरणाची वाट पाहू लागली. वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात; त्याचे तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडतात; ह्याची वाट पाहू लागली; परंतु छे:; ह्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. कृष्णदेवाचे ध्यान करण्यात ती दोघे रंगली होती. वाघबीघ विसरून गेली होती. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. बहुला व डुबा ह्यांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याएवजी फुले पडली. मायलेकरे चपापली. ती वर पाहू लागली; तो फुलांचा वर्षाव होत होता. वाघाला ती पाहू लागली. वाघ कोठेच दिसेना. बहुला व डुबा उभी राहिली; तो त्यांना समोर कोण दिसले ?

पालनवाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
मोरमुकुट तो माथ्यावरती
मंजुळ मुरली धरली ओठी
गळयात डोले सु-वैजयंती
प्रभुवर आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
रक्षण भक्तांचे करणारा
भक्षण असुरांचे करणारा
श्यामसावळा गिरी धरणारा
धावत आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
उभा राहिला देव येउनी
हृदयी गेला उचंबळोनी
बहुलेच्या सत्वास पाहुनी
अतिशय धाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |


कृष्ण परमात्म्यास समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. डुब्यानेही तसेच केले. कृष्णदेवाने आपल्या अमृतस्पर्शी हस्ताने दुब्याला थोपटले. देव म्हणाला; 'बहुले; बाई कष्टी होउ नकोस. तू माझ्या परीक्षेत उतरलीस. आता मी कायमचा तुझा सेवक आहे आणि डुब्या तूही आईला शोभेसा आहेस. आईची परंपरा पुढे चालवशील. बहुले तुला जे मागावयाचं असेल ते माग. मी प्रसन्न झालो आहे.' बहुला म्हणाली; देवा; हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळुन दूर जाण्याचा मोह मला कधीही न होवो. नेहमी तुझ्याजवळ राहाण्याचीच इच्छा आम्हा मायलेकरांस होवो. दुसरं काय मागू ?'