सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ग्लोबल मेंदीची नक्षी


माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.


गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.


न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.


वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्‍या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्‍याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.


तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्‍या
म्हातार्‍या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.


काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.


मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?



कवी - अजीम नवाज राही

बायको पाहिजे कशी

बायको पाहिजे कशी तर म्हणतात..
जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी..

"तिला समजू नका हो तुमचा नौकर..
जीन जीवन भर कराव तुमची चाकर.".
"पुरुषाच्या मना येव्हडे कसे कळेना..
आणि बरोबर जागेवर लक्ष्य त्याचे वळेना.".
"मग ती कशी पण असो..चालेल.."

अहो कस चालेल..काळी असली तर..
नाही हो देखणी असायला हवी..
आणि हातात लेखणी असायला हवी..
नुसती लेखणी चालणार कशी..
कपा खाली लागत नाही का बशी..

"आता काय नौकरी वाली चालणार.".
मग घरात भाकरी कोण घालणार ..
अहो पाहिजे तर कशी..?

जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी.
असावी ती दहावी पास..
आणि दिसायला पण खूपच खास..

"आधी बघा किती झालाय तुमच वय..
तुम्हा बघूनच वाटेल हो तिला भय.".

वाटूद्याना हो तुमच काय जातंय..
आणि तुमच्या बापच कोण खातंय

"अहो तिचे माय-बाप ऐकून काय म्हणतील..
आणि लोक पण तुम्हा जोड्याने हाणतील"

मग नौकरी वाला म्हणून सांगा ..
बघा कश्या लागतील माझ्या पुढे रांगा.

"थोडी तर वातुद्याहो हो तुम्हाला लाज..
एव्हडा कसा सुटला हो माज."
"दिसायली असली तरी खूपच साजूक..
तीच मन खूप असतंय हो नाजूक.".

मग मला काय करायचंय ..
 फक्त माझ पोट भरायचंय ..
मग नाजूक असो व लहान..
ठेवा म्हणा माझ्या कडे गहान...

"पैश्या चा दाखवून हो नाद..
आयुष्य करू नका तीच बरबाद.."
"वयाला शोभेल अशी बघा..
मग नेसवा तिला झगा
ती पण दिसेल लहान..
आणि लोक पण म्हणतील महान.."

न्हाय न्हाय न्हाय..
मला बायको पाहिजे अशी .
जशी कपा खाली बशी
आणि डोक्या खाली उशी..

"मग काढून टाका तुमची मिशी..
आणि हाकत बस म्हशी"
"तुम्ही म्हणता बायको जशी..
आता  मिळणार नाही तशी..
आता पोरी लय भारी शिकल्यात..
आणि तुमच जग त्या जिंकल्यात..
तुमचा नाद सोडा खुळा
आणि चांगल्या रस्त्यावर वळा"
राहील नुसताच खुळा कप..
मग संन्याश्या सारख करा जप.."


कवी - बळीराम भोसले

आभाळाची आम्ही लेकरे

आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा
धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकर्‍यांची आमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा
गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
कर्म वेगळे नाही आम्हा
मार्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा
संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
श्वास वेगळा नाही आम्हा
ध्यास वेगळा नाही


कवी - वसंत बापट

ग्लोबलायझजेशन

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन
म्हणजे नेमक असत काय?

आमच्या गल्लीत त्यांची दुकाने
गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय!
आणि दुसरे सांगा काय!

आमचा मळा, आमचा माळी
त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली
याहून दुसरे सांगा काय?

 आमचे मास्तर त्यांच्या शाळा
त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर
याहून दुसरे सांगा काय?

त्यांच्या कंपन्या आमची माणसे
बिनभांडवली व्याज आपले
असा ऍडव्हांटेज दुसरे काय?

होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी
भेटवस्तू मेड इन चायना
ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय?

जग म्हणजे एक लहान गाव
मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव
हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे
आणखी काय!

- मुक्तछंदा

जहर खाऊ नका..!


घोर मनाला लाऊ नका..
पाठ जगाला दावू नका..
तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा..
जहर खावू नका..!


आली लग्नाला लाडाची ताई..
हुंड्यावाचून जमेना काही..
असे लाचार होवू नका..
टोपी गहाण ठेवू नका..
ताई तयार आहे लढायला बाबा ..
जहर खाऊ नका..!

कर्ज घेवून दिवाळी आली..
वार यंदाही नापिकी झाली..
नवे कपडे घेवू नका..
काही खायाला देवू नका..
पाणी पिवून दिवाळी करू ना बाबा..
जहर खावू नका..!

आहे साथीला सोन्याची शेती..
घाम गाळून पिकवू मोती
तीर्थ यात्रेला जावू नका,,
चुना खिशाला लावू नका..
आमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..
जहर खावू नका..!!

भिकार्‍यांचा

वीट आला जरी शिसार्‍यांचा
हात होतो पुढे भिकार्‍यांचा

होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्‍यांचा

आज नसतील… काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्‍यांचा

राबती जीवने कुणासाठी
कोण साहेब कर्मचार्‍यांचा

शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्‍यांचा

एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्‍यांचा

एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्‍यांचा

मूक आहेत, मान्य आहे… पण
दोष आहे तुझ्या पुकार्‍यांचा

मी जमाखर्च ठेवला आहे
चोरलेल्या तुझ्या सहार्‍यांचा

आवराआवरी करू दोघे
घोळ आहे तुझ्या पसार्‍यांचा

शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्‍यांचा

तोंड माझे कुठे कुठे होते
सोसतो मी जुगार वार्‍यांचा

फक्त आहे तसे नसावे मी
‘बेफिकिर’सा विचार सार्‍यांचा


- बेफिकिर

पाणपोई

येइं भाई, येथ पाही घातली ही पाणपोई
धर्मजाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही
संसॄतीचा हा उन्हाळा तल्खली होई जीवाची
स्वेदबिंदू, अश्रुधारा यांविना पाणीच नाही

वायुवीची भोंवतीं आंदोलुनी त्या वंचिताती
झोंबती अंगी झळा अन् मूर्छना ये ठायिंठायीं
सांवली नाही कुठेंही, तापतो मार्तंड डोईं
श्रांत पांथा ! बांधिली ही तूझियासाठीं सराई

आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तिच्या ज्या सिंधु गंगा
आणिल्या वाहून खांदीं कावडी त्यांतील कांही
पांथसेवासाधनीं हें व्हावयाचे गार पाणी
मॄत्तिकेचे मात्र माझे कुंभ, ही माझी नवाई

ओंजळी, दो ओंजळी, आकंठ घे ईं वा पिऊनी
हो जरा ताजा तवाना, येऊं दे सामर्थ्य पायीं
पावतां तॄप्ती मना, संचारतां अंगीं उमेदी
जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई


कवी - यशवंत

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कवी - कुसुमाग्रज
चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

आम्हाला साला वेळ कुठे आहे???

अण्णाना काय काम आहे 
धंध्याने तर ते समाज सेवक 
आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

पगार वाढ डोक्यावर टांगली आहे 
टार्गेट्स पूर्ण करायला आमची डोकी बांधली आहेत 
 आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

 घरचे हफ्ते ३ वर्षात उडवायचे आहेत 
चार चाकी घेऊन दारात मिरवायाचे आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सोन्याचे भाव गगनाला पोचले आहेत 
सध्या रेशनाचे भाव बघून डोके उठले आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सगळेच गांधी झालेत तर मग गांधीना महत्व कसे येणार 
 अण्णान सोबत धावलो तर आमची पुढची पिढी श्रीमंत कशी होणार???
 माफ करा अण्णा, तुम्ही चुकताय माझ्यासारख्या नॅतद्रष्टा साठी भिकारड आयुष्य जगताय