chittaranjan bhat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
chittaranjan bhat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कुणी टाकला डाका

कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे


कवी - चित्तरंजन भट

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?

आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा

"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा


कवी - चित्तरंजन भट

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

पटवती साऱ्या पुरातन ओळखी
कुठुन हे आले नवे माथेफिरू ?

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)


कवी - चित्तरंजन भट

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


कवी - चित्तरंजन भट