narayan surve लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
narayan surve लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे.....

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखीलेले आहे
माझ्या जगाची एक गन्धवेनाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे,

रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे,

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे,


कवी - नारायण सुर्वे

तोवर तुला मला

याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
नगरवेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे

तुझे कुंतलहि आताच विंचरून ठेव
अंबाडय़ाच्या पेडात फुले मी खोवीन
माझ्या डोळ्यांच्या ऐन्यात पाहून घे रूप
तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन

कालच्या सभेत गाईलेले मी गीत
ज्यात तुझ्या-माझ्या आशांचे खजिने होते
त्या ओळीहि ओठांवर घोळवून ठेव
ज्यात तुझ्या-माझ्या सुखाचे छबिने होते

आणखी एक काम करावे तू लगेच
फाटक्या कोटासहि टाके घालून ठेव
फुले हुंगीतच जाऊ दोघेहि गर्दीतून
तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव

याच वस्तीतून आपले सुख येईल
तोवर तुला- मला जागलेच पाहिजे
दारावर येतील सोनेरी मनोरथ
तोवर प्रिये वाट पाहिलीच पाहिजे.


कवी - नारायण सुर्वे

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.


कवी - नारायण सुर्वे 

क्षितीज रुंद होत आहे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे

आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे

आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे

आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे

आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे

आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे.


कवी - नारायण सुर्वे

विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.


कवि - नारायण सुर्वे

तेव्हा एक कर !

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे चार दिवस-
उर धपापेल , जीव गुदमरेल.
उतू जणारे हुंदके आवर ,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस
खुशाल , खुशाल तुला आवदेल असे एक घर कर
मला स्मरून कर ,
हवे अत्र मला विस्मरून कर.

बेतून दिलेले आयुष्य


बेतून दिलेले आयुष्य ; जन्मलो तेव्हा -
प्रकाशही तसाच बेतलेला
बेतलेलेच बोलणे बोललो . कुरकुरत
बेतलेल्याच रस्त्याने चाललो ; परतलो
बेतल्या खोलीत ; बेतलेलेच जगलो
म्हणतात ! बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर
स्वर्ग मिळेल . बेतलेल्याच चार खांबात

माझे विद्यापीठ

(कविवर्य नारायण सुर्वे यांची ' माझे विद्यापीठ ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्दातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते.)


ना घर होते , ना गणगोत , चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते , मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता....
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे , वाचली पाट्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत ; हातचे राखून कित्येक मारलेले गडी.

हे जातीजातींत बाटलेले वाडे , वस्त्या , दारावरचे तांबडे नंबरी दिवे
सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.

अशा तांबलेल्या , भाकरीसाठी करपलेल्या , उदास वांदेवाडीच्या वस्तीत
टांगे येत होते , घोडे लोळण घेत होते , उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.

" ले , पकड रस्सी-हां-खेच , डरता है ? क्या बम्मनका बेटा है रे तू साले
मजदूर है अपन ; पकड घोडे को ; हां ; यह , वाह रे मेरे छोटे नालवाले. "

याकुब नालबंदवाला हसे , गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई
" अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा. " म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई.

याकुब मेला दंग्यात , नव्हते नाते ; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही
उचलले नाही प्रेत तेव्हा ' मिलाद-कलमा '; च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.

त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले , " हे नारायणा "
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट ; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. "

भेटला हरेक रंगात माणूस , पिता , मित्र , कधी नागवणारा होईन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून.

तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने ; वाटते , अजून काही पाहिलेच नाही ,

नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?
सदंतीस जिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस , गुटगुटीत , बाळसेदार.
आतः खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे , असे ओळीवर टांगलेले उच्चार

जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात
पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत

हे सगळे पाहून आजही वाटते , " हे नारायणा , आपण कसे हेलकावतच राहिलो. '
चुकचुकतो कधी जीव ; वाटते , ह्या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो.

थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता , का आवरला म्यानावरचा हात ,
का नाही घेतले झोकवून स्वतःला , जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.

विचार करतो गतगोष्टींचा , काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक
उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.

किती वाचलेत चेहरे , किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव , बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.

खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची ; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम , कामगारासम निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते ; भरताना तेही बापडे दडतील
स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

वाढले म्हणतात पृथ्वीचे वय , संस्कृतीचेही ; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची
छान झाले ; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.

ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करुन सोडतात.

कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला ?
का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्या गिधाडाने अल्लद उचलला ?

चंद्रा नायकीण ; शेजारीण , केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी
पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुन झुलणारी

अनपड. रोजच विकत घेऊ पेपर , रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई
" खडे आसा रे माझो झील ; ह्या मेरेर का त्या रे ," भक्तिभावाने विचारीत जाई.

कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने , ; जगाचा भूगोल होता जवळ
भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन , बराकीवरुन , मलाच कुशीत ओढी जवळ.

मेली ती ; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन , जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.

निळ्या छताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी
दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरुन पाठी

वरुन शिव्यांचा कचकोल उडे , " सिव्वर , इंडियन , काले कुत्ते. "
हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते

आफ्रिकी चाचा चिडे , थुंके , म्हणे ; " काम नही करेगा. "
चिलमीवर काडी पटवीत मी विचारी , " चाचा , पेट कैसा भरेगा ?"

धुसफुसे तो , पोट-या ताठ होत , भराभरा भरी रेलच्या वाघिणी
एक दिवस काय झाले ; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी

टरकावले घामेजले खमीस , त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्य बोलला ,

" हमारा खून झिंदाबाद ! " वाटले , चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट
खळालल्या नसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला
" बेटा! " गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला.

कुठे असेल माझा गुरु , कोणत्या खंदकात , का ? बंडवाला बंदीशाळेत
अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात

आता आलोच आहे जगात , वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे ; आपलेसे करायलाच हवे ; कधी दोन घेत ; कधी दोन देत



कविवर्य :- नारायण सुर्वे

सत्य

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी
वाकलीस खणानारळांनी .

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .

'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..


कवी -  नारायण सुर्वे

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही।

कवी - नारायण सुर्वे

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

कवी - नारायण सुर्वे