padma gole लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
padma gole लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आठवणी

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच...
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे --
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे --
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे --

पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी -- सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
-- पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी


कवियत्री - पद्मा गोळे

वाटा

हरवलेल्या वाटा....
चुकलेल्या वाटा....
रुळलेल्या वाटा....
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !


कवियत्री - पद्मा गोळे

सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !


कवयित्री - पद्मा गोळे

पांढरे निशाण

पांढरे निशाण उभारण्याची
घाई करु नकोस
मूठभर हृदया,
प्रयत्न कर
तगण्याचा, तरण्याचा.

अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे.

काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी.

वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत
ते तपासण्यासाठी नव्हे
काय होऊ शकतो
हे आजमावण्यासाठी..


कवी - पद्मा गोळे.

निरोप

बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट् कन्या
धर्मं जाणते विरांचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.


कवियत्री - पद्मा गोळे

मी एक पक्षिण

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.

गुजे आरुणि जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारीते काय विणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर

कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी

कीती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी



कवियत्री - पद्मा गोळे

आईपणाची भीती

आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती
अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती.
विचारलेस आज मला"आई कोणती वाट धरू?"
गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू.
कोणती दिशा दाखवू मी तुला? पूर्व? पश्चिम्? दक्षिण? उत्तर?
माझ्यासारख्याच भीतीने या चारी दिशा झाल्या फ़त्तर.

कोठे ज्ञान, यश, सुख? काय त्यांच्या खाणाखुणा?
या-त्या रुपात दिसतो सैतानच वावरताना.
जळी, स्थळी, आकाशीही अणूबॉम्ब झाकला आहे
प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्ताने रे माखला आहे.
आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा
द्रौणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा.

कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती
जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती.
खचू नको, शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग
कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग.
धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई
आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई.



कवियत्री - पद्मा गोळे

लेणी

समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !


कवियत्री - पद्मा गोळे

चाफ्याच्या झाडा....

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

कवियत्री - पद्मा गोळे.

जाणीव

अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ पाहून
होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिनओळखीची पाळंमुळं,
झणाणणार्‍या वीणाबिणा,
एकदोन पक्षी आभाळखुळे.

— पण खुज्या खुज्या सृष्टीतसुद्‍धा
समुद्र केव्हा वादळतात;
काळेकुट्ट ढग येतात;
वादळवारे झंजाट सुटून
ढग असे बरसतात –
असे… असे बरसतात की
खुजेपणा निघतो धुवून
क्षणभर पडतं लख्ख ऊन !

– त्या क्षणाच्या आठवणींवर
खुजा जीव जगू पहातो;
क्षणभर थोड उंच होऊन
पाऊल थोडं पुढं टाकतो !




कवियत्री - पद्मा गोळे