shraavan-kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shraavan-kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


कवी - बा. सी. मर्ढेकर

रानात श्रावणात

रानात श्रावणात
बरसून मेघ गेला
देहात नि मनात
लावून आस गेला ...

रानात श्रावणात
दिसतात रंग ओले
किलबिल पाखरांत
तरू तृप्त वाकलेले ...

रानात श्रावणात
दाटी नव्या तृणांची
मधु दाटल्या फुलांत
आरास भ्रमरांची ...

रानात श्रावणात
आवाज निर्झरांचे
खडकाळ डोंगरात
चैतन्य जीवनाचे ...

रानात श्रावणात
फुलली अनेक नाती
कुणी पाहिले न हात
घडवून ज्यांस जाती ...

श्रावण मासि

श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)