shrungarik kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shrungarik kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

स्पर्श

फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या

ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या

धूप जळे तिमिराचा पवनी
विनिद्रनयना व्याकुळ अवनी
पिकुनी लावल्या नक्षत्रांच्या द्राक्ष लता पिवळ्या

भुई वाळुची संगमरवरी
तीवर काळ्या फेनिल लहरी
व्यथेतुनी सुख मंथित ग्रंथित झाल्या मधुर निळ्या

सुटल्या अवचित जटिल समस्या
फुटला रव स्मरकुटिल रहस्या
जननांतरिच्या स्मृतिच्या ज्योती पाजळल्या सगळ्या

द्रवली नयने, स्रवली हृदये
दो चंद्राच्या संगम-उदये
दुणी पौर्णिमा, रसा न सीमा, उसळ्यांवर उसळ्या


कवी - बा. भ. बोरकर

नको स्पर्श चोरू

नको स्पर्श चोरू..नको अंग चोरू..
सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू !

तुझ्या पैजणांचा असा नाद येतो..
प्रीतीचा ध्वनिलाही उन्माद येतो..
नको ताल चोरू, नको छंद चोरू..
नको पावलांची गती धुंद चोरू..!!

असा कैफ यावा, असा वेग यावा..
मिठीला नवा धुंद आवेग यावा..
नको प्रीत चोरू, नको राग चोरू..
गुलाबी गुलाबी नको अग चोरू..!!

खुलू दे, फुलू दे तुझी गौर काया..
पुरे दाह झाला..नको और व्हाया..
नको गाल चोरू, नको ओठ चोरू..
पिवू दे.. नशेचे नको घोट चोरू..!!


कवी - ज्ञानेश वाकुडकर

चांदणे अंथरू..

चांदणे अंथरू..चांदणे पांघरू..
देह माझा तुझा..चांदण्याने भरू !

आज दोघामधे ही हवाही नको..
बांध दोघातले दूर सारे करू !

पाहू दे, वेचू दे हा अजिंठा तुझा..
शोधता शोधता..तू नको थरथरू !

धबधब्याला कशी झेलते ही दरी..
कोसळू कोसळू अन पुन्हा सावरू !

दूर फेकून दे सर्व पाने फुले..
श्वास आता जरा रोखुनीया धरू !

ठेव राखुनिया सर्व खाणाखुणा..
निर्मितीचे उद्याच्या पुरावे ठरू !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

सत्य

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी
वाकलीस खणानारळांनी .

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .

'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..


कवी -  नारायण सुर्वे

राजसा

राजसा…
जवळी जरा बसा
जीव हा पिसा
तुम्हावीण बाई
कोणता करू शिणगार
सांगा तरी काही.
त्या दिशी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा
कहर भलताच
भलताच रंगला कात
लाल ओठात.

राजसा
जवळी जरा बसा….
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा
देह सटवार
सोसता न येइल अशी
दिली अंगार.

राजसा
जवळी जरा बसा….
मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा
हिवाळी रात.

राजसा
जवळी जरा बसा….


- ना.धों.महानोर

चिंब मिठी

सर्सर सर्सर वळवाची सर
आली अचानक धावत धावत
थेंब टपोरे माथी झेलत
झाडे वेली अवघी नाचत

अवेळीस हा पाऊस चावट
तुझ्या बटांवर होता अलगद
झाडाचा आधार चिमुकला
तिथेच तू ही होती निथळत

थरथरणारा देह तुझा तो
भिजून सारी वसने ओली
भिरभिरलेल्या त्या नजरेतच
भिती अनामिक तरळून गेली

कडाड् लखकन वीज चमकता
नकळत सारे अवचित घडले
मिठीत केव्हा अलगद दोघे
तुला- मला ना काही कळले

चिंब चिंब हा पाऊस अजूनी
तनामनाला हुरहुर लावी
पाऊस येता वळवाचा तो
चिंब मिठी ती स्मरते सारी
मोहरली काया तुझ्या स्पर्शाने
गुलाबी झाले गाल हर्षाने
मज या घडी साठवू दे मनात
वीज संचारली जशी तनात

पालवी फुटावी तशी
तुझ्यात मी संचारते
तुझ्याच सहवासात
माझ्यावरच बहरते

क्षणाक्षणात या मी बेदुन्धीत वाहते
बंद नयनांनी हि तुला पाहते
रोमांचित तुझ्या ओठांनी माझी काया
उतू जाऊ दे आज मजवरची तुझी माया

आपल्या या मिलनाला
कशाचीही तोड नसावी
तुझ्या हृदयापासून
तनात हि फक्त मीच भिनावी

नको रे जाऊ असा
सोडून इतक्यात मला
थांब अजून हि पूर्तता
नाही आली आपल्या या मिलनाला

मिता तुझ्या रे मीठीत

मिता तुझ्या रे मीठीत
जीव चोळामोळा होतो
तुझ्यावीण माझ्या मीता
दिस सरेनासा होतो

दीस सरतो कसासा
रात संपता संपेना
तुझ्या कुशीविण मीता
झोप लागता लागेना

डोळा लागता लागता
मिता स्वप्नामध्ये
येशी हळुवारशा बोटांनी
फ़ुल कळीचे करशी

फ़ुललेल्या देहानिशी
तुला घट्ट बिलगते
तुझ्या मीठीत रे मीता
अंग चोळामोळा होते…

गीत : स्वरांगी देव

आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया