नि:श्वासगीत

प्रेमाचें मजला नकोच आतां नांव !

कां व्यर्थ कांचणी, फसवुनि भोळा जीव ?

हांसली मंद मधु पाहुनि कोणी रमणी.

भुलविलें जिवाला कुणि साखरबोलांनीं !

रंगवीत मोहन चित्र मंद हास्याचें,

गुंगीत आठवुनि गीत गोड बोलांचे ,

कंठणे तळमळत भकास सारी रात;

ढग खिन्नपणाचे दाट हृदयिं जमतात !

हांसती पांढ्र्‍या तारा काळ्या राती

नि:श्वास सोडणे लावुनि दृष्टी वरती !

'त्या' मुखचंद्राचें एकच वेड जिवाला

लावुनी जीव हा उदास रडवा केला

तिजसाठी दुखविला बापुड्वाणा ऊर;

ती असेल चुंबित तिच्या जिवाचा प्यार !

छे ! नकोच मजला तें प्रेमाचे नांव !

बंबाळ विवळतो भोळा हळवा जीव !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २३ जुलै १९२५

सावल्यांचे गाणें

तेजाची आम्ही बाळे,

रूप जरी अमुचें काळें !

लहान वा कोणी मोठी

ससेमिरा अमुचा पाठी !

जनी स्मशानीं कुठे तरी,

अशी तरळतों पिशांपरी.

मेघांच्या काळ्या पंक्ती

निळ्या नभीं जेव्हां फिरती

राक्षसरूपांना धरुनी

मंद मंद आम्ही फिरतों;

निळ्या जळा काळें करितों

पीतारुण संध्या बघुनी

वंदन दिर्घ सरूं पडुनीं !

मग येई रजनीमाई

पदराखालिं अम्हा घेई.

चांद्ण्यांत अमुची माया

भुताटकी गमते हृदया.

पांढुरक्या तेजांतून

कुठें कुठे बसतों दडुन.

पांढुरक्या वाटेवरुनी

एकलेच फिरती कोणी,

लपत छपत पाठुनि त्यांच्य़ा

फिरत असूं आम्ही वेड्या !

पानांचें पसरुनि जाल

आणिक पारंब्या लोल,

वट कोणी ध्यानस्थ बसे;

मंद अनिल त्या डुलवितसे.

मग अमुचीं रुपे डुलति;

बाळांना बागुल दिसती



जुनाट हे पड्के वाडे,

पर्णहीन त्यांतिल झाडें

धवल चंद्रिका रंगविते;

आम्ही मग त्यांतील भुतें !

जर का कुणि चुकुनी आला

वाटसरू रात्रींमधला,

बघुनि विकट अमुचे चाळे

चरकुनि तो मागेंच वळे !

प्रेम स्थल अमुचें एक;

त्यासाठी विसरुनि भूस,

दाहि दिशा मागुनि फिरणें

ही अमुची वेडी प्रीत

झिडकारा - मारा लाथ !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ मे १९२५

एक स्वप्न

रमणिला कवळुनि हृद्यीं । असें मी जाहलों दंग ;

स्वप्न तो गूढ पाहोनी । समाधी जाहली भंग !


गुलाबी गाल रमणीचे । सुकोनी सुरकुत्या झाल्या;

मृदुल घन कृष्ण केसांच्या । लोंबती पांढर्‍या दोर्‍या!

तिच्या त्या गोठल्या नयनी । पाहिलें रूप मी माझें,

पाहुनी जीर्ण मुखडा तो । चरकुनी हृदयिं-मी लाजें.

कांहिसें चरकुनी हृदयी । रमणिला घट्ट मी धरिलें:

गळाले पाश देहाचे । शांत मग श्वासही झाले !

निसटल्या दिव्य दो ज्योती । आमुचे देह सांडून,

तळपुनी नील आकाशी । जाहल्या तारका दोन !

उराला ऊर भिडवोनी । स्तब्ध मातींत पडलेल्या

पाहुनी आपुल्या देहा । खदखदा तारका हंसल्या !

बसुनिया एअकमेकांच्या । सन्निधीं तारका गाती,

'येउं दे काळ काळाचा । तयाची कोण धरि भीती !'

स्वप्न हें गूढ पाहोनी । समाधी जाहली भंग !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ऑगष्ट १९२५

गुलाबांचा हार

गुलाबांचा घेऊनि एक हार,

ह्रदयदेवीचें गांठियलें दार.

अर्पियेला सोत्कंठ तिच्या हातीं;

(अनुष्टुप्‌) मनीं आनंदुनी गेला युवा तो प्रणयी घरा ;

शब्द हे वदली चित्तीं, हांसुनी तरुणी जरा:

"आज आहे येणार नाथ माझा ;

त्यास अर्पिन हा हार बरा ताजा !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २९ जून १९२५

संध्यासंगीत

सिंधूचे मर्मरगीत

फेंसाळे कानीं शांत.

संध्येची पिवळी माया

रंगविते डोंगर--काया.

शुभ्र अभ्र दाटे गगनीं,

मोत्यांचे चढवुनि पाणी.

फिकट पांढरा रविराणा

मंद हांसला बुडतांना !

दडले मग पिवळे किरण

तरल निळ्या पाण्यांतून.

लेवुनि तें पिवळें तेज

जग गमलें यक्षिणी-कुंज !

मधुनि मधुनि जन जे फिरती

गूढ कुणी यक्षचि गमती !

पीत विरल वातावरणीं

जिव गेला वेडावोनी !

स्वप्नफुलें रंगित फुललीं;

दिवसाही स्वप्नें दिसलीं !

नारळिच्या झाडांतून

रजनि बघे डोकावून.

रजनीची काळी काया

घट्ट ह्रुदयिं आलिंगुनिया,

रजनी-रमणीच्या ह्रुदयीं

दिवस-रमण विरुनी जाई !

काळवंडलीं हीं रानें,

झाडांचीं हिरवी पानें.

आणिक त्या काळ्या छाया

माझ्याही ह्रुदयीं शिरल्या !

ह्रुदयिं दाटली हुरहूर ;

कां न कळे दुखतो ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ११ मे १९२५

एकलेपणाची आग

एकलेपणाची आग लागली ह्रुदया ;

घनदाट दाटली विषण्णतेची छाया.

तडफडे जिवाचें पांखरु केविलवाणें,

होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें !

जोडीस शोधितें उदात्त अपुल्यावाणी;

प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी !

गुम्फीत कल्पनाजाला । गुंगणें,

गुरफटुनि त्यांत जीवाला । टाकणें,

रंगीत स्वप्नसृष्टीला । उठविणें ;

ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेडया;

ही सुवर्णलंका दिपवित अवघी ह्रुदया !

परि इंद्रजाल हें जात जघीं विरुनीया,

एकलेपणाची आग लागते ह्रुदया !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १९ जानेवारी १९२५

भावबंधन

चित्ताला रमवावया पहुडलों होतों खुल्या सैकतीं;

तों दृष्टी सहजींच जाइ वरती गंभीर नीलांबरी.

तेजाला उधळीत कोणि चमके तारा तिथें सोज्वळ,

माझी दृष्टि खिळे विशाळ गगनी त्या रम्य तारेवरी.

पाहोनी तिजला मनांत रमलों चित्तास ये शांतता,

चाटे ती जणु हांसली सुखविण्या संत्रस्त माझ्या मना !

चित्ती कांहि तरंग अद्रुत उठे - अश्रु उभे लोचनीं !

वाटे या हृदयास काय नकळे - तें जाहलें तन्मय.

ती कोठें सुरबालिका !----कुणिकडे मी येथला पामर !

नाहीं का सुरलोकिंचा रवि परी उत्फुल्लवी पद्मिनी ?

कैसा ये कवळावया धरणिला पर्जन्य पृथ्वीवरी ?

तारा स्नेहलता मधुस्मित करी--हें खूप आहे मला.

कोणी जीव कुण्या जिवावरी रमे--कैसें कुणी सांगणें !

कैसें अन्तरि भावबंधन जडे--तें अंध वेडें खरें !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात