समाधि


या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
हा भूमिकाभाग आहे अभागी
इथे एक आहे समाधी जुनी

विध्वंसली काळहस्तांमुळे ही
हिला या, पहा, जागजागी फटा
माती, खडे आणि आहेत काही
हिच्याभोवती भंगलेल्या विटा!

आहे जरी लेख हा, छेद गेला -
जुन्या अक्षरांतील रेघांमधून
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला
निघाला थरांतील भेगामधून

कोठून ताजी फुले, बाभळींनी -
हिला वाहिले फक्त काटेकुटे
ही भंगलेली शलाका पुराणी
कुणाचे तरी नाव आहे इथे

रानांतला, ऊन, मंदावलेला,
उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला
भुकेलाच येथे-तिथे पाहतो!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा