किती

आली अनंतरंगी सारी वसंत-सेना
या श्रांत शांत झोपी गेल्या परंतू मैना
आता कशी घुमावी लावण्यगीतिका ही?
आला वसंत : माझी झाली परंतू दैना!

माझ्या खुळ्या मना, रे, हा व्यर्थ सर्व दंगा!
चित्रे नको चितारू, अस्पष्ट शब्दरंगा!
कोठे सरस्वती? ही मनु कशी त्रिवेणी?
अव्यक्त राहिली का ही आरुणी अनंगा?

आता कशी पुराणी भाषा कशी धरावी?
निःशब्द जीवनाला वाचा कधी फुटावी?
सांगा, कधी निघावे हृद्बंध, विश्वदेवा?
टाकू किती उसासे? आशा किती धरावी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा