मालन

-१-
इवला झाला गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हालेना जरा वेलींचे पान;
निजली धरा; निजले रान,
आई, बहिणी झोपल्या घरी;
ये गऽ ये गऽ ये मागल्या दारी!
माथ्यावरती आला चंदीर
सांग, मी कसा धरावा धीर ?
भागले डोळे वाट पाहून :
प्रीतीची माझी ये गऽ मालन !

-२-
पुष्पवारती दवाचे बिंदू;
अंतराळात सुंदर इंदू;
पानोपानी की नाजूक वारा;
झीमझीम की झडीच्या धारा;
तशीच येते मूक, मोहन
अंगणातल्या वेलीमधून
शारदाची की ढवळी रात;
हासली प्रीत आतल्या आत !
दाविते कोण हंसीची मान ?
हासून येते माझी मालन !

-३-
पाहून तुझे काजळी डोळे
माझे गंऽ मन भुलले भोळे !
कपाळावरी चांदणी कोर;
मुक्त सोडला केसांचा भार;
हासणे गोड लावण्यखाणी;
कंठामधून कोकळगाणी ;
फुलांचे हार शोभले गळा;
रानराणीचा शृंगार भोळा.
कोणाचे ध्यान, कोणाचे गान,
प्रीतीचे कोण, सांग, मालन ?

-४-
एकाएकी का थांबली अशी ?
संध्येची दूर चांदणी जशी !
मूर्तच जशी हाले चाले ना !
उभी का दूर अधोवदना ?
कंपन ओठी, लाज नयनी :
बावरू नको रानहरिणी !
काय मनात भीती सारखी ;
नको गंऽ परी – होऊ पारखी !
प्रीतीला नाही भीतीचे भान ;
प्रीतीची माझी देवी मालन.

-५-
एकमेकांच्या आलिंगनात ;
भावनामय चुंबनगीत ;
एकमेकांच्या नयनांवरी
प्रीत मोहक, मूक, नाचरी;
एकमेकांचा हृदयनाद
घालत आहे एकच साद.
इवला झरा गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हासले जरा वेलीचे पान;
हासली धरा; हासले रान !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा