वही मोकळी करताना

कवितेची वहि गच्च भरून गेल्ये:
आता पाने सुटि करून मोकळे करायला हवीत...
काही अशी वार्यावर सोडून द्यावित
ज्यांची दूर विजनवासात गाणी होतील
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील
काही पाखरांना द्यावीत
त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल
त्यांनाच परत केल्यासारखी
काही ढगांवर डकवावीत
जी दीशा ओलांडताना
आपोआपच रुपांतरीत होतील...

नंतर
ज्यांची दूर विजनवासात गाणी होणार नाहीत
जी नाकारतील वाहणे नव्याने
ज्यांचा कुठल्याही कोलाहलाशी संबंध नाही
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायचा नाहीत
अशी काही पाने उरतीलच; ती सर्व
कुठल्याहि झाडाचा तळाशी ठेवावीत:
तुम्हीच झाडांचे बहर आहात.असे
मीच त्यंना कितीदा सांगितलेले आहे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा