आयुष्य-कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य-कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जगणं आहे सुंदरशी कला!

एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!

तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!

धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!

मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!

एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!


कवी - प्रल्हाद दुधाळ

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे
पण त्याला जगता आलं पाहिजे
फुल खुंटन्याआधी त्यालाही मन आहे
हे जाणता आलं पाहिजे

दुःखाची बेरीज सगळेच करतात
पण दुःखात ही हसता आलं पाहिजे
सुखात ही सगळेच हसतात
पण दुसर्याच सुखही आपलंच मानता आलं पाहिजे

जीवनाच्या वाटेवर खूप माणस मिळतात
माणसात माणूस शोधता आलं पाहिजे
अनेक नाती जोडता जोडता जीवनभर
मैत्रीचं, प्रेमाचं अतूट नात जपता आलं पाहिजे


कवी - गणेश पावले

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

सुख-दुख

       आयुष्य हे असच असतं,
       कधी फुंकर तर कधी वादळ असतं.

              कधी सुखाची शाल ओढून,
                दु:ख दबकत येत
                 तर कधी दु:खाचे काटे लावून,
                    सुख धावत येत.


                        सुखाचा उपभोग घेताना,
                            दु:ख कधी आलं हे कळत नाही
                               अन दु:खाचे काटे टोचत असताना,
                                    सुखाची वाट साहवत नाही.


                                          सुख नेहमी पाहुणा बनून येत,
                                              दोन दिवस राहून लगेच निघून जातं
                                                दु :ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
                                                 अन हृदयाला चरे पाडून जातं.

                                   दुखाची सावली सदैव जीवनाची पायवाट होते,
                                  तर सुखाची सावली उन-पावसाचा खेळ खेळते,
                                   तर कधी सुखाचा झरा वाहतो,
                                   तर कधी दुखाचा पावस होता
                                  आयुष्यात हे सुख-दुख चा खेळ चालता राहतो
                                   तर कधी आठवणी म्हणून छळत असतो,

पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

कवी - नारायण सुर्वे

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं


कवी - प्रसाद शिरगांवकर

जिना

कळले आता घराघरातुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...


कवी - वसंत बापट

याचंच नाव 'आयुष्य'

जे आपल्याला हवं असतं,

ते आपल्याला कधी मिळत नसतं,

कारण जे आपल्याला मिळतं,

ते आपल्याला नको असतं,

आपल्याला जे आवडतं,

ते आपल्याकडे नसतं,

कारण जे आपल्याकडे असतं,

ते आपल्याला आवडत नसतं,


तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो,

याचंच नाव 'आयुष्य' असतं !

जपुन ठेव

जपुन टाक पाऊल...
इथे प्रत्येक वाट आपली नसते

जपुन ठेव विश्वास...
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो

जपुन घे निर्णय...
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो

जपुन ठेव आठवण...
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो

जपता जपता एक कर...
जपुन ठेव मन कारण...
ते फक्त आपलं असतं...
दुःखाला सामोर जाण्यातच खर कौशल्य असत ...
त्यात जमिनीवरच राहून आकाशात उडायचं असत ...
आपल्या मनासारख कधीच घडत नसत ...
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असत ....
उन एकट कधीच येत नाही
ते सावलीला घेऊनच येत
फक्त ....
सावलीला प्रकट व्हायला ...
झाडाचं अस्तित्व लागत ....
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येत
दुःखाच अन सुखाच हेच नात असत .......
दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ....?
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का.....?

अरे संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आयुष्य सुंदर वाटत...

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा ...
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा ...
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव आयुष्य जास्त सुंदर बनत..........
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा...
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.........
कायमच मागण्या करण्यापेक्षा...
कधीतरी काहीतरी देऊन पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा...
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........
चारचौघात एकट बसण्यापेक्षा...
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटत........
आपल्याला कोण हवंय यापेक्षा...
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत...
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......

कोणी गेलं म्हणुन

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.