g.di.madgulkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
g.di.madgulkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्‍त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू


गीत    -    ग. दि. माडगूळकर
संगीत    -    वसंत देसाई
स्वर    -    महेंद्र कपूर
चित्रपट    -    छोटा जवान

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

होते तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाची पाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी


कवी       -     ग. दि. माडगूळकर
संगीत    -     सुधीर फडके
स्वर       -     सुधीर फडके
चित्रपट   -    प्रपंच (१९६१)
राग        -    मिश्र पिलू

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी


कवी - ग. दि. माडगुळकर

तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली

पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा

याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचे सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
साऱ्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन्‌ गेला


गीतकार - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
गायिका - सुलोचना चव्हाण

बाबा

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


कवी - ग. दि. माडगूळकर

एका तळ्यात होती...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

कवी - ग. दि. माडगूळकर

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस


कवी - ग. दि. माडगूळकर

नदी मिळता सागरा

नदी सागरा मिळ्ता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले

सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो, जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेपायी, रुप वाफ़ेचे घेउन
नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होउन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा.


कवी - ग. दि. माडगूळकर

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा

मी देह विकुनीया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडीला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे


कवी - ग. दि. माडगूळकर