वेणु

हृदयंगम वाजत वेणू
स्वैर न विचरति इंद्रियधेनू।। हृदयं....।।

जीवन-गोकुळि ये वनमाळी
अमित सुखाची सृष्टी भरली
शिरि धरिन तदीय पदांबुज-रेणू।। हृदयं....।।

प्रेमळ गोपी या मम वृत्ती
वेडावुन प्रभुरूपी जाती
प्रभुविण वदति की काहिच नेणू।। हृदयं....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग (गोकुळाष्टमी), ऑगस्ट १९३२

मनमोहना

मनमोहना! भवमोचना!
भूक लागली
तव चरणांची
किति तरि साची
मम लोचना।। मन....।।

सकलकारी
तुजला बघु दे
तन्मय होउ दे
प्रियदर्शना।। मन....।।

शतजन्मावधि
मूर्ति न दिसली
मज अंतरली
अंतरमणा।। मन....।।

सोडि कठोरा!
निष्ठुरता तव
धीर न मज लव
मम जीवना!।। मन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

मनोमंदिर-राम

बाल्यापासुन
हृदयात बसुन
गोष्टी सांगे गोड
पुरवि माझे कोड
सोडुन गेला परि तो आज माझे धाम
कोठे गेला सांगा रुसुन माझा श्याम
कोठे गेला माझा मनो-मंदिर राम
हाय मी काय करू।।

सुख ओसरे
हास्य दूर सरे
खेळ संपले
बोल थांबले
माझ्या घरामधले दिवे मालवून
माझी होती नव्हती दौलत चोरून
गेला कैसा केव्हा हच्चोर पळून
हाय मी काय करू।।

आता उंदिर घुशी
येथे दिवानिशी
करितिल खडबड
करितिल गडबड
पोखरून टाकतिल माझे हृदय-राउळ
कामक्रोधा आयते मिळेल वारुळ
आत चिंतेचे शिरेल वटवाघुळ
हाय मी काय करू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, नोव्हेंबर १९३०

हृदयाकाशी मेघराशी

हृदयाकाशी मेघराशी
आल्या का जमून
हृदयाकाश त्यांच्या भारे
सारे गेले नमून।।

येणार आहे स्वामि माझा
येणार आहे राजा माझा
त्याच्यासाठी म्हणून
मनोमंदिर धुवून टाकिन
निर्मळ ठेविन करून।। हृदया....।।

कामक्रोधांच्या वटवाघळांनी
नाना वासनांच्या उंदिरघुशींनी
घाण ठेवली करून
धुवायाला मेघधारा
आल्या भरभरून।। हृदया....।।

अंतर्बाह्य होवो वृष्टी
भरो हृदय भरो दृष्टी
मळ जावो झडून
काने कोपरे शुद्ध होवो
मळ न राहो दडून।। हृदया....।।

हृदय निर्मळ शरीर निर्मळ
बुद्धि निर्मळ दृष्टी निर्मळ
जीवन निर्मळ बघून
प्रसन्न होइल प्राणसखा
हृदयिं ठेविल धरून।। हृदया....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

देवा! झुरतो तव हा दास

देवा! झुरतो तव हा दास
करितो जरि सायास।। देवा....।।

वापीजवळी बाळ जाउन
आत पाहतो डोकावून
माता येई हळूच मागुन
प्रेमे उचली त्यास।। देवा....।।

मोहाजवळी देवा जाता
का न पकडशी माझ्या हाता
असुनी सकल जगाची माता
का मजशीच उदास।। देवा....।।

धी- बलवैभव माते नलगे
जनगौरव- यश माते नलगे
एक मागणे तुजला मागे
दे निर्मळ हृदयास।। देवा....।।

लहानसा दंवबिंदु साठवी
विमल निजांतरि तेजोमय रवि
तेवि तुला मी निर्मल हृदयी
ऐशी मजला आस।। देवा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

प्रभु! सतत मदंतर हासू दे

प्रभु! सतत मदंतर हासू दे।।
तुझ्या कृपेचा वसंतवारा
जीवनवनि मम नाचू दे।। प्रभु....।।

विश्वग्रंथी पानोपानी
दृष्टि तुजचि मम वाचू दे।। प्रभु....।।

ठायी ठायी तुजला पाहुन
उचंबळुन मन जाउ दे।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

जागृत हो माझ्या रामा!

जागृत हो माझ्या रामा!
हे हृदयस्था! सुखधामा!।। जागृत....।।

तू भक्तजना आधार
तू ब्रह्मांडा आधार
हरि सकल मोहअंधार
जलदश्यामा!।। जागृत....।।

करि मन्मति निर्मळ पूत
भरि भक्ती ओतप्रोत
त्वद्ध्यान लागु दिनरात्र
सद्विश्रामा!।। जागृत....।।

लाविले तुजकडे डोळे
शतवार जाहले ओले
हे हृदय किती गहिवरले
घेता नामा।। जागृत....।।

मज नको मान धन कीर्ती
मज लौकिकाचि ना प्रीती
निज दाखव मंगल मूर्ती
पुरवी कामा।। जागृत....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०